डायबिटीसचा आजार जगभरातील लोकांमध्ये वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकड्यांनुसार भारतात डायबिटीच्या रुग्णांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. खराब जीवनशैली आणि पौष्टिक आहाराच्या कमतरतेमुळे सर्वाधिक लोकांना या आजाराचा सामना करावा लागत आहे. डॉक्टरांच्या मते, डायबिटीसच्या उपचारासह योग्य आहाराद्वारे या गंभीर आजारावर नियंत्रण ठेवता येते. याबाबत नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात शास्त्रज्ञांना आढळले की, आहारात विशिष्ट प्रकारच्या धान्यांचे प्रमाण वाढवून, या गंभीर आजारावर नियंत्रण मिळवता येऊ शकते.
'इंटरनेशनल क्रॉप्स रिसर्च इंस्टीट्यूट फॉर द सेमी-एरिड ट्रॉपिक्स' (आईसीआरआईएसएटी) द्वारे अलिकडेच करण्यात आलेल्या संशोधनानुसार मिलेट्स म्हणजेच ज्वारी, बाजरी इत्यादी पदार्थांचा आहारात समावेश केल्यानं डायबिटीसला नियंत्रणात ठेवता येऊ शकतं. ११ देशात करण्यात आलेल्या संशोधनात तज्ज्ञांना दिसून आले की, या प्रकारच्या धान्यांचा आहारात समावेश करणारे लोक डायबिटीस टाईप २ च्या आजारापासून लांब राहतात.
फ्रंटियर्स ऑफ न्यूट्रिशन जर्नलमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, बाजरी या धान्याचा आहार घेतल्याने डायबिटीस आणि इतर रोगाचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते. शास्त्रज्ञांना अभ्यासादरम्यान आढळले की या प्रकारच्या आहारामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असल्याने डायबिटीसच्या रुग्णांसाठी ते खूप फायदेशीर मानले जाऊ शकते. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार जे लोक आनुवंशिकदृष्ट्या डायबिटीसला बळी पडतात ते देखील अशा आहाराचे सेवन करून धोका कमी करू शकतात.
कमी ग्लायसेमिक इंडेक्सचा आहार का महत्वाचा?
भारतीय राष्ट्रीय पोषण मंडळाचे प्रतिनिधी आणि अभ्यासाच्या लेखकांपैकी एक डॉ.राज भंडारी म्हणाले की, "बाजरीचा ग्लायसेमिक इंडेक्स तांदूळ, गहू आणि मक्याच्या तुलनेत कमी असल्याचे आढळून आले आहे. याच कारणामुळे डायबिटीसच्या नियंत्रणात ठेवण्यात याचा वापर खूप फायदेशीर ठरू शकतो.''
दुसरीकडे, आयसीआरआयएसएटीच्या वरिष्ठ पोषण शास्त्रज्ञ आणि अभ्यासाचे प्रमुख लेखक डॉ एस अनिता सांगतात की, "अनेक जर्नल्समध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासासह या अभ्यासाचे परिक्षण करताना आम्हाला आढळले की बाजरीयुक्त आहार घेतल्यानं डायबिटीसचा धोका कमी होतो. ज्या लोकांना या प्रकारची समस्या आहे त्यांनी आहारात अशा पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे.''
या व्यतिरिक्त, बाजरीत कोलेस्टेरॉल कमी करणारे गुणधर्म देखील आहेत, जे हृदयाचे आरोग्य सुधारते. बाजरी-आधारित आहार हा अँटिऑक्सिडंट्स, प्रथिने आणि आहारातील फायबरचे समृद्ध स्रोत म्हणून ओळखला जातो. नियमित बाजरीचं सेवन केल्यानंतर शरीरावर खूपच चांगला परिणाम होतो. शरीराची हाडे मजबूत होतात आणि सर्दीचाही त्रास होत नाही. इतकंच नाही बाजरीचे सेवन केल्यानं रक्तदाब नियंत्रणात राहतो. उर्जेचं एक चांगले स्त्रोत आहे. यात मॅग्नेशियम आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे रक्तदाब सामान्य राहण्यास मदत होते. सामान्य रक्तदाब हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो.
बाजरी कशी खावी?
अनेकजण बाजरीची भाकरी बनवून खातात. पण तुम्हाला भाकरी आवडत नसेल तर बाजरी भिजवून त्याची खिचडीसुद्धा तुम्ही खाऊ शकता. HealthifyMe calorie counter नुसार एका बाजरीच्या भाकरीत ९७ कॅलरीज असतात. बराचवेळ भूक लागू नये यासाठी तसंच रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी हा एक उत्तम मार्ग आहे. पण गरजेपेक्षा जास्त सेवन करणं शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं. गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानं बाजरीचे सेवन करावे.