कॉफीच्या सेवनानं शरीराला होणारे फायदे आणि दुष्परिणाम अनेकदा तुम्ही वाचले असतील. काही अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार कॉफी जास्त प्रमाणात घेतल्यानं अनिद्रा, डेमेंशिया तसंच वंध्यत्वाचा सामना करावा लागू शकतो. पण खरचं कॉफी शरीरासाठी इतकी नुकसानदायक आहे? याबाबत तज्ज्ञांच्या एका गटानं नाही असं उत्तर दिलंय. त्यांच्या म्हणण्यानुसार कॉफी शरीरासाठी नुकसानकारक नसून भरपूर फायदे देणारी आहे. अलिकडेच तज्ज्ञांनी कॉफीच्या सेवनाच्या फायद्यांवर प्रकाश टाकला आहे.
यूरोपियन सोसाइटी ऑफ कार्डियोलॉजीच्या वार्षिक बैठकीत प्रस्तुत करण्यात आलेल्या अभ्यासातील रिपोर्टमध्ये संशोधकांनी सांगितले की, योग्य प्रमाणात सेवन केल्यास कॉफीचे अनेक फायदे मिळू शकतात. योग्य प्रमाण म्हणजेच दिवसातून दोन ते तीन कप. या संशोधनानुसार कॉफीचे सेवन हृदयरोगामुळे होणारा तरूणांमधील मृत्यूचा धोका १२ टक्क्यांनी कमी करते. इतकंच नाही तर डायबिटीससारख्या गंभीर आजारांवर फायदेशीर ठरते.
कॉफी पिण्याचे फायदे
कॉफीचे संभाव्य आरोग्यदायी फायदे जाणून घेण्यासाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा अभ्यास केला गेला. यासाठी संशोधकांनी ४.६८ लाखांपेक्षा जास्त लोकांच्या माहितीचे विश्लेषण केले. एमआरआय स्कॅन रिपोर्टच्या आधारे तज्ज्ञांनी स्पष्ट केले की दिवसभरातून २ ते ३ कप कॉफी पित असलेल्यांच्या हृदयाचे आरोग्य चांगले राहते. कॉफीचे फायदे फक्त हृदयापुरता मर्यादित न ठेवता तज्ज्ञांनी इतरही फायदे सांगितले.
डायबिटीसचा धोका टळू शकतो
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कॉफी डायबिटीस टाईप २ चा इतिहास असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. २०१७ मध्ये केलेल्या अभ्यासानुसार, जे लोक दिवसातून चार ते सहा कप कॉफी पितात त्यांना मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका कमी असतो, ज्यामुळे अशा लोकांमध्ये टाइप -२ डायबिटीसचा धोकाही कमी होऊ शकतो.
कॅन्सरचाही धोका टळतो
संशोधकांचे म्हणणे आहे की कॉफी प्यायल्यानं यकृताच्या कॅन्सरचा धोकाही कमी होतो. २०१९ मध्ये झालेल्या अभ्यासानुसार, कॉफीचे नियमित सेवन यकृताच्या कॅन्सरचा धोका कमी करू शकते. इटालियन संशोधकांना एका अभ्यासात असे आढळून आले की जे लोक दिवसातून तीन कप कॉफी पितात त्यांच्यात यकृताच्या कॅन्सरचा धोका 50 टक्के कमी असतो.
मानसिक आरोग्यही चांगलं राहतं
अनेक प्रकारचे मानसिक आजार टाळण्यासाठी कॉफी फायदेशीर असल्याचा दावा केला जात आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की कॉफी पिणाऱ्यांना अल्झायमर आणि डिमेंशियाचा धोका कमी असू शकतो. हे दोन्ही न्यूरोडिजेनेरेटिव्ह डिसऑर्डर आहेत, ज्यांची प्रकरणे अलीकडच्या काळात झपाट्याने वाढत आहेत. अनेक अभ्यासांच्या निष्कर्षांवर आधारित, शास्त्रज्ञ म्हणतात की जे लोक नियमितपणे कॉफी पितात ते अल्झायमर आणि डिमेंशियाचा धोका 65 टक्क्यांपर्यंत कमी करू शकतात.