डायबिटीस ही हळूहळू शरीर पोखरणारी समस्या आहे हे आपल्याला माहित आहे. डायबिटीस म्हणजेच शुगर सतत वाढत असेल तर आपल्या शरीरातील अवयव हळूहळू खराब होत जातात. याचा सगळ्यात जास्त परीणाम हा आपल्या डोळ्यांवर होतो. डोळे हा अतिशय नाजूक अवयव असल्याने डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक असते. एकदा दृष्टी खराब व्हायला लागली की दिसणे कमी होत जाते आणि काही दिवसांनी अजिबात दिसेनासे होते. शुगर डोळ्यांच्या आरोग्यासाठी घातक असल्याने शुगर असणाऱ्यांनी वेळीच डोळ्यांची पुरेशी काळजी घ्यायला हवी. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण आटोक्यात ठेवणे. याबरोबरच डोळ्यांचे कार्य सुरळीत चालावे यासाठी आवर्जून ४ गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे. त्या गोष्टी कोणत्या, समजून घेऊया (Diabetic Patient How To Take Care Of Eyes)...
१. धूम्रपान टाळावे
धूम्रपान हे आरोग्यासाठी चांगले नसते हे आपल्याला माहित आहे. पण आपल्याला जर डायबिटीस असेल तर धूम्रपान करणे आरोग्यासाठी जास्तच घातक ठरु शकते. धूम्रपानामुळे शिरा, धमन्या आणि कोशिका यांना हानी पोहोचते डायबिटीसमुळे हे प्रमाण वाढत जाते. त्यामुळे तुम्हाला धूम्रपान सोडायचे असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
२. व्यायाम
डायबिटीसमुळे डोळ्यांवर परिणाम होतो हे जरी खरे असले तरी व्यायामामुळे ही समस्या कमी होण्याची शक्यता असते. व्यायाम हा केवळ डायबिटीससाठी किंवा डोळ्यांच्या समस्यांसाठी उपयुक्त असतो असे नाही तर आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी व्यायाम करायलाच हवा.
३. आहार उत्तम हवा
आपला आहार हा आपले आरोग्य चांगले राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतो. व्हिटॅमिन ए, सी, इ, बेटा केरोटीन, ल्यूटेन, ओमेगा ३ फॅटी अॅसिड, झिंक हे घटक डोळ्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आवश्यक असतात. त्यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्या, मासे, आक्रोड-बदाम, डाळी, कडधान्ये यांचा योग्य प्रमाणात समावेश असायला हवा.
४. नियमित तपासणी
डायबिटीस असेल तर वर्षातून किमान एकदा डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करायला हवी. म्हणजे आपल्याला जर मोतीबिंदू, काचबिंदू किंवा डायबिटीसमुळे दृष्टी कमी होण्याची काही समस्या असेल तर वेळीच त्याचे निदान होते आणि उपचार करता येतात. या सगळ्या गोष्टी समजायला उशीर झाला तर डोळ्यांच्या समस्या वाढू शकतात