आहार हेच औषध असतं हे आपल्याला माहित असतं. पण रोजच्या धावपळीत आहाराकडे योग्य लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. काहीबाही खाल्लं जातं आणि मग पचनाच्या (digestion problems) समस्या निर्माण होतात. पचन व्यवस्था सतत बिघडलेली असल्यास त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. छोट्या मोठ्या आरोग्य समस्या बिघडलेल्या पचनामुळे निर्माण होतात. खराब पचनामुळे निर्माण झालेल्या आरोग्य समस्यांवर औषधोपचार केल्यानं त्या समस्या तात्पुरत्या सुटल्यासारख्या वाटतील पण मूळ समस्येवर काही कामच केलं नसल्यानं त्या पुन्हा तीव्रतेनं डोकं वर काढतील हेच खरं. आरोग्याची गाडी व्यवस्थित रुळावर चालण्यासाठी पचन व्यवस्था नीट असणं ( healthy digestion) आवश्यक आहे. पचन व्यवस्था सुदृढ राखण्यासाठी औषधांपेक्षाही योग्य आहाराचा ( diet for digestion) फायदा होतो. आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश असावा असं तज्ज्ञ म्हणतात. फायबरमुळे पचन व्यवस्था चांगली राहाते. असे फायबरयुक्त पदार्थ ( food for improve digestion) कोणते हे समजून घेणं आणि त्यांचा आपल्या दिवसभराच्या आहारात समावेश करणं आवश्यक आहे.
Image: Google
1.पपई
पचन सुधारण्यासाठी नाश्त्याला पपई खाणं फायदेशीर मानलं जातं. पपई हे बारमाही फळ आहे. पपईमध्ये फायबर आणि प्रथिनांचं प्रमाण चांगलं असतं. पपई रोजच्या आहारात असल्यास पचनक्रिया सुधारते.
Image: Google
2. सफरचंद
अपचन, पोटात गॅस होणं यासारख्या पचनाशी निगडित समस्या असतील तर रोजच्या आहारात सफरचंद हवंच. सफरचंदातून प्रथिनं, फायबर आणि जीवनसत्वं शरीरास मिळतात. तसेच सफरचंदात खनिजं आणि पोटॅशियम असतं. या दोन घटकांमुळे बध्दकोष्ठतेची समस्या सुटते. पचन नीट होण्यासाठी सफरचंदातील गुणधर्म मदत करतात.
Image: Google
3. काकडी
काकडीमध्ये इरेप्सिन नावाचं विकर असतं. हे विकर पचनास मदत करतं. काकडीतील गुणधर्मांमुळे पोटातील आम्लं, गॅस्ट्राइटिस आणि पेप्टिक अल्सर या समस्या असल्यास त्यावर आराम मिळतो.
Image: Google
4. केळं
पचन सुधारण्यास केळाचा चांगला उपयोग होतो. केळामध्ये फायबरचं प्रमाण चांगलं असतं. यामुळे पोट स्वच्छ होण्यास मदत होते. सकाळी नाश्त्याला किंवा संध्याकाळी स्नॅक्स म्हणून केळं अवश्य खायला हवं असं तज्ज्ञ म्हणतात.
Image: Google
5. आलं
आलं हे आयुर्वेदिक गुणांनी समृध्द असतं. आलं घालून केलेला चहा प्याल्यानं रोगप्रतिकारशक्ती वाढते. आल्याचा रस घालून पाणी प्याल्यानं शरीरावरील चरबी कमी होते. आल्यामुळे पचनाशी निगडित समस्या सुटतात. आल्याचा समावेश रोजच्या आहारात असल्यास पोटात गॅस धरत नाही.
Image: Google
6. बडीशेप
बडीशेप हा मसाल्याचा घटक आहे. पदार्थांचा स्वाद वाढवण्यासाठी बडीशेप घातली जाते. चव सुधारण्याचा गुणधर्म असलेली बडीशेप आरोग्यास गुणकारी आहे. बडीशेपामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते. मौखिक आरोग्य जपलं जातं. जेवणानंतर बडिशेप खाल्ल्यानं पचन सुधारतं. बडीशेपातील फायबरमुळे पोट साफ होण्यास मदत होते.
Image: Google
7. चिया सीड्स
चिया सीड्समधे फायबरचं प्रमाण खूप असतं. चिया सीड्स भिजवून त्यांचं सेवन केल्यानं चयापचय क्रिया सुधारते, पचन नीट होतं. वजन कमी करण्यासाठी आणि नियंत्रित ठेवण्यासाठी चिया सीड्स मदत करतात त्यामुळे त्या आपल्या रोजच्या आहारात असायला हव्यात असं तज्ज्ञ म्हणतात.