Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > आषाढी एकादशी : उपवासाला काय खावे काय अजिबात खाऊ नये? पित्ताचा त्रास टाळायचा तर..

आषाढी एकादशी : उपवासाला काय खावे काय अजिबात खाऊ नये? पित्ताचा त्रास टाळायचा तर..

Diet Tips Ashadhi Ekadashi Upwas Fasting : आषाढी एकादशीचा उपवास करताना आहाराबाबत कोणती काळजी घ्यायला हवी याबाबत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2023 09:37 AM2023-06-28T09:37:52+5:302023-06-28T10:20:07+5:30

Diet Tips Ashadhi Ekadashi Upwas Fasting : आषाढी एकादशीचा उपवास करताना आहाराबाबत कोणती काळजी घ्यायला हवी याबाबत

Diet Tips Ashadhi Ekadashi Upwas Fasting : Fasting on Ashadhi Ekadashi should not be a hassle, it should be a pleasure...Valuable advice of nutritionists | आषाढी एकादशी : उपवासाला काय खावे काय अजिबात खाऊ नये? पित्ताचा त्रास टाळायचा तर..

आषाढी एकादशी : उपवासाला काय खावे काय अजिबात खाऊ नये? पित्ताचा त्रास टाळायचा तर..

सुकेशा सातवळेकर 
 
पावसाळा सुरू व्हायच्या तोंडावर राज्याच्या आणखी एका गोष्टीची जोरदार चर्चा असते ती म्हणजे आषाढी वारी. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक एकादशीच्या दिवशी पंढरपूरला पोहोचतात. विठूरायाचे दर्शन मिळेपर्यंत अतिशय भक्तीभावाने उपवास करण्याची रीत आहे. या गोष्टीला धार्मिक महत्त्व असले तरी पोटाला आराम देण्याचा आणि स्वत:वर ताबा मिळवण्याचाही हेतू यामागे असावा. मोठी एकादशी म्हणून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच घरोघरी आषाढी एकादशीचा उपवास करतात. उपवास म्हणजे पोटाला आराम देणे असे असले तरी उपवासाचे पदार्थ खायला आवडत असल्याने  एकादशी दुप्पट खाशी असं मात्र होतं. यामुळे तब्येतीला त्रास होण्याची शक्यता असते. पावसाळ्यात पचनशक्ती क्षीण होत असल्याने तसेच अॅसिडीटी किंवा गॅसेसच्या समस्यांमध्ये वाढ होते. म्हणूनच एकादशीचा उपवास करताना आहाराबाबत कोणती काळजी घ्यायला हवी, उपवास करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात याविषयी (Diet Tips Ashadhi Ekadashi Upwas Fasting)...

१. जीभेवर नियंत्रण ठेवून पोटाला काही काळ विश्रांती देणे हे या उपवासाचे प्रयोजन असतं. आहारातील बंधनं पाळण्याचं प्रशिक्षण यामुळे मिळतं आणि वेळप्रसंगी आपल्या आहारावर कोणती बंधनं आली तर ते सहज शक्य होते. 

२. आता पावसाळा असल्याने हवेती आर्द्रता वाढलेली असते. त्यामुळे पचनशक्ती कमी झालेली असते. अशावेळी थोड्याच प्रमाणात आणि पचायला हलके असे पदार्थ या काळात खायला हवेत. पण त्याउलट एकादशीच्या वेळेला एकादशी आणि दुप्पट खाशी असं केलं जातं. त्यामुळे पित्ताचा त्रास वाढण्याची शक्यता असते. साबुदाणा खिचडी, वडे, पापड्या; बटाटा चिप्स, केळ्याचे चिप्स असे तळलेले पदार्थ पचायला जड तसंच वजन आणि कोलेस्टेरॉल वाढवणारे आहेत. गोड पदार्थही या दिवशी जास्त खाल्ले जातात त्यामुळेही पचनशक्तीवर ताण येण्याची शक्यता असते. 

३. उपवासाच्या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर्स यांची कमतरता असते. त्यामुळे शरीराचे योग्य पद्धतीने पोषण होत नाही. तसेच यामुळे बद्धकोष्ठता आणि पित्त होण्याची शक्यता असते. काही जण या दिवशी खाणं-पिणं एकदम वर्ज्य करतात, मात्र त्यामुळेही थकवा येण्याची शक्यता असते किंवा कुपोषण होऊ शकते. त्यापेक्षा उपवासाचे पोषक पदार्थ खायला हवेत. 

 शरीराला पोषण मिळावे म्हणून आहारात काय घ्याल? 

१. राजगिरा पीठाची भाकरी, लाल भोपळा, भेंडी, काकडी, सुरण, रताळी या भाज्या खाऊ शकतो. 

२. वऱ्याचे तांदूळ किंवा थालीपीठ केले तरी त्यातही बटाट्याबरोबर काकडी, भोपळा , रताळी, सूरण या भाज्या घालायला हव्यात. भगरीसोबत आपण आणि दाण्याचीआमटी करतो, त्याऐवजी शिंगाड्याची कढी किंवा आमसूलाचे सार करायला हवे, साधं ताकही घेता येईल. 

३. नाश्त्याला बरेच जण गरमागरम साबुदाणा खिचडी खातात. तसेच चहा किंवा कॉफीही आवर्जून घेतली जाते. त्याऐवजी उकडलेलं रताळं आणि दूध, राजगिऱ्याच्या लाह्या आणि दूध किंवा दही असं आवर्जून खायला हवं. 

४. फळं एरवीही आहारात असायलाच हवीत. मात्र उपवासाच्या दिवशी किमान २ फळं आवर्जून खायला हवीत. 

५. पाणी भरपूर पिणं गरजेचं आहे. याशिवाय ताक, कोकम सरबत, लिंबू पाणी, शहाळं पाणी आवर्जून प्यायला हवं. 

६. मधेआधे खायला राजगिरा वडी, लाडू, मनुका, खजूर असे पदार्थ घेता येतात. असा पोषक एकादशीचा उपवास केला तर तो नक्कीच मानसिक समाधान आणि पोषकता देणारा ठरु शकले.  

(लेखिका आहारतज्ज्ञ आहेत.)
 

Web Title: Diet Tips Ashadhi Ekadashi Upwas Fasting : Fasting on Ashadhi Ekadashi should not be a hassle, it should be a pleasure...Valuable advice of nutritionists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.