Join us   

गणपतीत कितीही ठरवलं तरी गोड खाणं होतंच, मधुमेहींनी अशी घ्या काळजी - आहारतज्ज्ञ सांगतात ६ महत्त्वाच्या टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2022 4:02 PM

Diet Tips For Diabetic Patient In Ganpati Festival : डायबिटीस असणाऱ्यांनी गणपती उत्सवात गोड पदार्थ खाताना काय काळजी घ्यावी याविषयी...

ठळक मुद्दे गोड खाल्ले तर आहारात कॅलरीज जास्त असणारे पदार्थ टाळा. बटाटा, गव्हाच्या पिठाच्या पोळ्या, पांढरा भात असे पदार्थ खाणे टाळा.व्यायामाने हॉर्मोन्स सुधारतात आणि शरीरातील इन्शुलिनची पातळीही वाढण्यास मदत होते.

मधुमेह म्हणजे गुंतागुंतीची समस्या. हा आजार नसून जीवनशैलीविषयक समस्या असल्याने वेळीच योग्य ती काळजी घेतली तर आपल्याला त्रास होत नाही. मात्र आहार, व्यायाम, औषधोपचार यांबाबत पुरेशी काळजी घेतली नाही तर मात्र रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते आणि आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होतात. सणवार म्हटल्यावर मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना स्वत:वर जास्त नियंत्रण ठेवावे लागते. कधी बाप्पाचा प्रसाद म्हणून तर कधी सगळे दणकून मोदकांवर आडवा हात मारत असल्याने मधुमेह असणाऱ्यानाही खाण्यावर फारसे नियंत्रण ठेवता येत नाही. आता गोड खावे की नाही, तर हो अवश्य खावे. पण कधी, किती आणि कसे खायचे याचे भान आपल्याला असायला हवे. अन्यथा आपल्या तब्येतील आणि पर्यायाने आपल्या कुटुंबियांनाही त्याचा त्रास झाल्याशिवाय राहत नाही. तेव्हा डायबिटीस असणाऱ्यांनी गणपती उत्सवात गोड पदार्थ खाताना काय काळजी घ्यावी याविषयी आहारतज्ज्ञ दिप्ती काबाडे सांगतात (Diet Tips For Diabetic Patient In Ganpati Festival)...

१. ज्यांची शुगर नेहमीच प्रमाणाबाहेर असते आणि औषधांनी सुद्धा ती नियंत्रणात राहत नाही अशांनी गोड पदार्थ खाण्याचा मोह शक्य तितका टाळावा. य़ासाठी सगळ्यांसोबत जेवायला न बसता शक्यतो आधी किंवा नंतर जेवायला बसावे. आरती झाल्यावर प्रसादाच्यावेळी आरतीच्या ठिकाणी न थांबता तिथून चटकन बाहेर पडावे.

२. अनेकदा आपण गोड पदार्थ हे जेवताना खातो. काही वेळा सकाळी ब्रेकफास्टच्या वेळीही आरतीचा प्रसाद म्हणून गोड पदार्थ खाण्यात येतात. मधुमेहींनी मुख्य आहारासोबत गोड पदार्थ न खाता खायचेच असतील तर ब्रेकफास्ट आणि लंच या दोघांच्या मधली वेळ म्हणजेच साधारण ११ च्या दरम्यान खावेत.    ३. गोड पदार्थ खाताना त्यासोबत इतर कोणताही पदार्थ खाऊ नये. काही वेळा कमी कॅलरीज असलेला एखादा पदार्थ आणि गोड सोबत खाल्ले तर काही होत नाही असा आपला समज असतो. मात्र फळ, ज्यूस, चिवडा, चिप्स, ताक असे कोणतेच पदार्थ गोड पदार्थासोबत खाऊ नयेत. 

४. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी दुपारच्या नंतर म्हणजेच संध्याकाळी स्नॅक्स म्हणून किंवा रात्रीच्या जेवणाच्या वेळी गोड खाणे शंभर टक्के वर्ज्य करावे. कारण संध्याकाळी आपला मेटाबॉलिझम नैसर्गिकरीत्या मंद होतो. अशावेळी मधुमेहींनी गोड खाल्ले तर साखरेचे नियमन अपूर्ण राहिल्याने रक्तातील साखर जास्त प्रमाणात वाढण्याची शक्यता असते.

(Image : Google)

५. जितक्या कॅलरीज घेतल्या जातात त्याहून जास्त बर्न करण्याचा नियम नेहमी पाळा. म्हणजेच व्यायामावर जास्त भर द्या. नियमित व्यायामाने हॉर्मोन्स सुधारतात आणि शरीरातील इन्शुलिनची पातळीही वाढण्यास मदत होते.

६. ज्या दिवशी गोड पदार्थ खाणे होईल त्या दिवशी इतर आहार अगदी कमी प्रमाणात घ्या. तसेच गोड खाल्ले तर आहारात कॅलरीज जास्त असणारे पदार्थ टाळा. बटाटा, गव्हाच्या पिठाच्या पोळ्या, पांढरा भात असे पदार्थ खाणे टाळा. त्याऐवजी ज्वारीची भाकरी, ब्राऊन राइस आणि इतर कोणत्याही भाज्या खा.

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समधुमेहगणेशोत्सव