कोलेस्टेरॉल ही गेल्या काही वर्षात अतिशय सामान्य समस्या झाली आहे. अगदी कमी वयातील व्यक्तींनाही कोलेस्टेरॉलची समस्या उद्भवत असल्याचे दिसते. शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढली की हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये एकप्रकारचा थर जमा होतो आणि त्यांना रक्तपुरवठा तसेच ऑक्सिजन न मिळाल्याने हृदयाच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. बरेचदा कोलेस्टेरॉल वाढल्याचे आपल्याला कळत नाही. म्हणूनच वयाच्या चाळीशीनंतर आपण स्वत:हून नियमितपणे काही तपासण्या करायला हव्यात (Diet Tips To Control Cholesterol level) .
व्यायामाचा अभाव, चुकीची आहारपद्धती, ताणतणाव यांमुळे कोलेस्टेरॉलची समस्या निर्माण होते. काहीवेळा ही समस्या अनुवंशिकतेमुळेही उद्भवते. मात्र संतुलित जीवनशैलीच्या मदतीने ही समस्या कमी करता येऊ शकते. त्यासाठीच आहारात काही बदल करण्याची आवश्यकता असते. वेळीच योग्य ती काळजी न घेतल्यास भविष्यात या समस्या गंभीर रुप धारण करतात. पाहूयात कोणत्या पदार्थांमुळे कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते.
१. ओटस
नाश्त्याला ओट्स किंवा दलिया यांसारखे काही खाल्ल्यास त्याचा कोलेस्टेरॉल कमी होण्यास फायदा होतो. १ वाटी ओटसमधून आपल्याला १ ते २ ग्रॅम सोल्यूबल फायबर्स मिळतात. आहारात फायबरचे प्रमाण चांगले असेल तर कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. यासाठी ओटसमध्ये केळं किंवा स्ट्रॉबेरी घालायला हवे.
२. बार्ली
बार्ली हे एकप्रकारचे अतिशय उत्तम असे धान्य आहे. यामध्ये फायबर चांगल्या प्रमाणात असल्याने कोलेस्टेरॉल नियंत्रणात आणण्यासाठी बार्लीचा आहारात समावेश करायला हवा. हृदयाशी संबंधित समस्या असतील तर आहारात आवर्जून बार्ली घ्यायला हवी.
३. शेंगा
शेंगा प्रकारात राजमा, मटार, ब्लॅक बिन्स, पावटा यांसारख्या बऱ्याच शेंगांचे प्रकार येतात. पोट भरलेले राहण्यासाठी या शेंगा आहारात आवर्जून घ्यायला हव्यात. यामध्येही सोल्यूबल फायबरचे प्रमाण चांगले असल्याने हृदयविकार असलेल्यांनी आहारात याचा समावेश करायला हवा.
४. वांगं आणि भेंडी
वांगं आणि भेंडी या भाज्या काहींना खूप आवडतात तर काहींना अजिबात आवडत नाहीत. मात्र या भाज्यांचा आहारात समावेश केल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो. कमी कॅलरीज आणि फायबरचे प्रमाण जास्त असल्याने कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यास या भाज्या उपयुक्त असतात.
५. नटस
बदाम, आक्रोड, शेंगादाणे यांसारखे दाणे किंवा सुकामेवा स्वरुपात मोडणारे प्रकार नियमित आहारात असायला हवेत. हृदयाचे कार्य चांगले ठेवण्यासाठी आवश्यक असणारे सर्व घटक या नटसमधून मिळतात.