Join us   

अवेळी झोपणे-उशीरा उठण्याने वाढत्या वजनासह गंभीर स्ट्राेकचाही धोका, रिसर्चचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2023 3:02 PM

Different Sleep timing can cause health issues according to Research : सोशल जेटलॅग म्हणजे काय? रोज रात्रीची जागरणं आणि सकाळी उशीरा उठणं तुमचं आयुष्य कमी करतंय..

रात्री उशीरा झोपणे आणि सकाळी उशीरा उठणे हा अनेकांच्या जीवनशैलीचा भाग असतो. त्यात काय नवल असं आपल्याला सुरुवातीला वाटू शकतं. पण झोपण्याची वेळ योग्य नसेल तर त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. नुकत्याच केलेल्या एका संशोधनातून ही बाब समोर आली असून उशीरा झोपल्यामुळे त्याचे शरीरावर काय परीणाम होतात हे या संशोधकांनी सांगितले आहे. अवेळी झोपल्याने आणि उठल्याने पोटात तयार होणारे बॅक्टेरीया जंक फूडची मागणी करतात आणि त्यांची ही मागणी पूर्ण केल्यामुळे व्यक्तीला लठ्ठपणा, कोलेस्टेरॉल, मधुमेह यांसारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते. लंडनमधील किंग्ज कॉलेजच्या संशोधकांनी याविषयी सविस्तर अभ्यास केला असून त्यांनी याविषयीची अतिशय महत्त्वाची माहिती मांडली आहे (Different Sleep timing can cause health issues according to Research). 

(Image : Google)

यासाठी त्यांनी जवळपास १ हजार वयस्कर व्यक्तींचा अभ्यास केला. विकेंड सोडून उरलेल्या दिवशी वेगवेगळ्या वेळी झोपणे आणि उठणे याला त्यांनी सोशल जेटलॅग असे म्हटले आहे. आरोग्याला हानी पोहोचवणाऱ्या जीवाणूंना उत्तेजित करण्याचे काम या जेटलॅगमुळे होऊ शकते. या जीवाणूंच्या ६ पैकी ३ प्रजाती या पोषण नसलेला आहार, लठ्ठपणा, जळजळ, स्ट्रोकचा धोका यांच्याशी संबंधित आहेत. झोपेमधील केवळ ८० मिनीटांचे अंतरही व्यक्तीच्या पोटातील जीवाणूंवर परीणाम करणारे ठरु शकते. त्यामुळे झोपेच्या वेळेबाबत प्रत्येकानेच योग्य ती काळजी घ्यायला हवी. साधारण १० ही झोपण्यासाठीची योग्य वेळ असून आरोग्य उत्तम ठेवायचे असेल तर किमान १० ते ११ च्या मधे झोपायला हवे. 

(Image : Google)

अनेकदा रात्री जागल्यानंतर आपल्याला मधेच भूक लागल्यासारखे वाटते आणि मग नकळत आपण चिप्स, बिस्कीटे, फरसाण यांसारख्या अनावश्यक गोष्टींवर ताव मारतो. इतकेच नाही तर रात्री जागून गप्पा मारणारे, वाचन करणारे किंवा मोबाइल पाहणारेही आपल्या आजुबाजूला असतात. अशा लोकांना रात्रीच्या वेळी चहा किंवा कॉफी पिण्याची तल्लफ होते. एकदा ही तल्लफ झाली की मग ते घेतल्याशिवाय आपल्याला काही सुधरत नाही. त्यामुळे मग पोटात जळजळ होणे, अॅसिडीटी यांसारख्या समस्या कालांतरने मागे लागतात. रात्रीचे जागणे यादृष्टीने चांगले नसल्याने वेळीच या गोष्टींचा विचार करणे आणि नियमितपणे ठराविक वेळेला झोपून ठराविक वेळेला उठणे केव्हाही हिताचेच असते.  

 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल