आपल्या शरीरातील जवळपास ६० टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला असतो. शरीरातील सर्व क्रिया व्यवस्थित होण्यासाठी आणि रक्ताच्या निर्मितीसाठी पाण्याची आवश्यकता असतेच. पाणी प्यायल्याने आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. दिवसभरातून शरीरात ३ ते ४ लिटर पाणी जायला हवे तरच तब्येत चांगली राहते हे आपल्याला माहित आहे. म्हणजेच दिवसभरात ८ ते १० ग्लास पाणी प्यायला हवे असे तज्ज्ञ सांगतात. असे असले तरी प्रमाणाबाहेर पाणी पिणे आरोग्यासाठी घातक असते हे लक्षात घ्यायला हव (Disadvantages Of Drinking Too Much Water). पाणी कमी प्यायल्यास आरोग्याच्या ज्या समस्या उद्भवतात त्याबद्दल आपण नेहमी बोलतो. पण हेच पाणी जास्त प्यायल्याने किडणीवर ताण येतो आणि त्यामुळे शरीरातील सोडीयमच्या प्रमाणात वाढ होऊ शकते. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. शिखा शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, प्रमाणाबाहेर पाणी प्यायले तर किडणीच्या कार्यात अड़थळा येतो आणि त्यामुळे नसांना सूज येऊन शारीरिक तक्रारी निर्माण होतात.
जास्त पाणी पिण्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम
१. शरीरातील इलेक्र्टोलाइटस कमी होतात - जास्त प्रमाणात पाणी प्यायल्यास शरीरातील इलेक्ट्रोलाइट लेव्हल कमी होते. या लेव्हल्स हलल्यामुळे सांधेदुखी, क्रॅम्प येणे अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळे इलेक्र्टोलाइल लेव्हल नीट ठेवायची असेल तर प्रमाणात पाणी प्यायला हवे.
२. हायपोनाट्रेमिया - पाण्याचे म्हणजेच शरीरात द्रवाचे प्रमाण जास्त झाले तर शरीराच्या कार्यात अडथळा येतो. पाण्याचे प्रमाण जास्त झाले तर शरीरातील मीठाचे प्रमाण कमी होते आणि मळमळ, उलटया, थकवा, वात यांसारख्या समस्या उद्भवतात. या सगळ्याला वैद्यकीय भाषेत हायपोनाट्रेमिया म्हणतात.
३. सतत लघवी लागणे - आपण जास्त प्रमाणात पाणी प्यायलो की शरीर त्याला आवश्यक तेवढेच पाणी ठेवते आणि बाकी बाहेर टाकते. मात्र आपण शाळा, कॉलेज, ऑफीस किंवा इतर कोणत्याही ठिकाणी बाहेर असलो की सतत वॉशरुमला जाणे म्हणावे तितके सोयीचे नसते. अनेकदा दर अर्धा तासाला वॉशरुमला जाणाऱ्यांना लघवीवर नियंत्रण राहणेही अवघड होते.
४. थकव्याचे महत्त्वाचे कारण - जास्त प्रमाणात पाणी पिणे आपल्याला थकवा आणणारे असते. किडणीला प्रमाणापेक्षा जास्त काम करावे लागत असल्याने हा थकवा येतो. तसेच पाण्याचे प्रमाण जास्त झाले तर हार्मोन्सचे असंतुलन झाल्याने शरीर थकल्यासारखे होते.
५. कॅन्सर होण्याची शक्यता - अनेक देशांमध्ये पाणी साफ करण्यासाठी क्लोरीनचा वापर केला जातो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार आपण दिर्घकाळ क्लोरीन असलेले पाणी पित राहीलो तर अशावेळी ब्लॅडर आणि अंडकोषाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. त्यामुळे पाणी य़ोग्य प्रमाणात पिणे केव्हाही चांगले.