धनत्रयोदशी हा दिवाळीतील दुसरा महत्त्वाचा दिवस. आपल्याकडील धनाची-संपत्तीची या दिवशी पूजा केली जाते. आपल्याकडील धनाची वृद्धी व्हावी या हेतूने धनत्रयोदशीला सोन्याची खरेदी करण्याची पद्धत आहे. धनाची पूजा करण्याचा, ते वाढण्यासाठी प्रार्थना करण्याचा दिवस म्हणजे धनतेरस किंवा धनत्रयोदशी. व्यापारी वर्गात हा दिवस अतिशय उत्साहात साजरा केला जातो. आपल्याकडे प्रत्येक सणाला काही विशिष्ट पदार्थ करण्याची, त्याचा नैवेद्य दाखवण्याची आणि प्रसाद म्हणून ते खाण्याची रीत आहे. त्यामागे शास्त्रीय कारणे असून ती समजून घ्यायला हवीत (Diwali Dhanteras 2024 Dhantrayodashi benefits of gul Jaggery and Dhane coriander) .
वसुबारसेला बाजरीची भाकरी आणि गवारीच्या भाजीचा नैवेद्य दाखवला जातो, त्याप्रमाणे धनत्रयोदशीला गूळ आणि धण्यांचा नैवेद्य दाखवतात. धण्याचे औषधी गुण आणि गुळाचा गोडवा जगण्यात रहावा, आरोग्य लाभावे ही त्यामागची भावना असते. तर लक्ष्मीपूजनाला लाह्या आणि बत्तासे यांचा नैवेद्य दाखवला जातो. पावसाळा संपून थंडी सुरू होण्याच्या सुरुवातीला धणे आणि गूळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्याचे नेमके फायदे काय समजून घेऊया..
धणे
अॅसिडीटी, अपचन यांसाठी धणे अतिशय चांगले असतात. पचनसंस्थेच्या तक्रारी दूर होण्यासाठी आयुर्वेदात धणे खाण्याचा सल्ला दिला जातो. आमविकार, जुलाब यांसारख्या तक्रारींवरही धणे फायदेशीर असतात. धण्यासोबत गुळ खाल्ल्याने मासिक पाळीवेळी होणारा रक्तस्त्राव कमी होतो आणि वेदनांमध्ये आराम मिळतो. याशिवाय गुळ आणि धने यांचे मिश्रण मासिक पाळी सुरू करण्यासाठी उपयुक्त आहे. पीसीओडीमध्ये महिलांसाठी देखील हे मिश्रण चांगले मानले जाते.वयामुळे किंवा सततच्या ताणामुळे, अतिरिक्त कष्ट झाल्याने थकवा आला असेल तर धणे आणि गूळ हा उत्तम उपाय सांगितला आहे.
गूळ
गूळ हे सुपरफूड केवळ चयापचय आणि प्रजनन क्षमता सुधारत नाही, तर हाडे मजबूत देखील करते. हल्ली साखर खाण्याचे प्रमाण कमी झाले आहे, त्याला पर्याय म्हणून कमी प्रमाणात गूळ खाऊ शकतो. यामध्ये व्हिटॅमिन-बी, कॅल्शियम, जस्त, तांबे आणि फॉस्फरस यांसारखी अनेक मिनसल्स आढळतात. गूळ हा लोहाचा उत्तम स्त्रोत मानला जातो. थंडीच्या दिवसांत शरीराला उष्णता तसेच ऊर्जा मिळण्याची आवश्यकता असल्याने दिवाळीपासून आहारात गुळाचा समावेश करण्यास सुरुवात केली जाते.