दिवाळीचा पहिला दिवा म्हणजेच वसुबारस. यालाच गोवत्स द्वादशी म्हणूनही ओळखले जाते. पूर्वीच्या काळी घरातील स्त्रिया गायीला नैवेद्य दाखवल्याशिवाय स्वत: जेवत नसत. गाय देवासमान असल्याने तिची पूजा करण्याला कायमच विशेष महत्त्व असते. हल्ली आपण शहरामध्ये राहत असल्याने गायीची पूजा करणे होत नाही. मात्र गोमातेला वंदन करुनच सर्व चांगल्या गोष्टींची सुरुवात केली जाते (Diwali first day importance of Vasubaras Naivedya of millet bajra and gawar vegetable diet tips).
गायीला आपल्या संस्कृतीत देव मानलेले असल्याने गायीची पूजा करुन तिला नैवेद्य दाखवून मग आपण तो खाण्याची प्रथा आहे. त्यामुळे वसुबारसेमागे धार्मिक आणि आरोग्याच्यादृष्टीनेही विशेष महत्त्व आहे हे आपण लक्षात घ्यायला हवे. आपल्याकडे प्रत्येक सणाला केल्या जाणाऱ्या पदार्थांना अर्थ असन बदलते ऋतू, आरोग्य यादृष्टीने त्याचा विचार केला जातो. वसुबारसेलाही गायीला बाजरीची भाकरी आणि गवारीच्या भाजीचा नैवेद्य दाखवला जातो. नैवेद्य म्हणून हे पदार्थ करण्यामागे नेमके काय शास्त्र आहे हे समजून घेऊया..
बाजरीचे महत्त्व
बाजरी हे एक तृणधान्य असून आहारात तृणधान्यांचा समावेश असणे अतिशय गरजेचे असते. थंडीच्या दिवसांत बाजरी आवर्जून खाल्ली जाते कारण ती उष्ण असते. थंडीपासून रक्षण होऊन आपल्या शरीरालाही चांगली उष्णता मिळावी म्हणून बाजरी खाण्याला विशेष महत्त्व आहे. गायीने जास्तीत जास्त दूध द्यावे म्हणून तिला बाजरी आणि गुळाचा आहार दिला जातो. ज्याप्रमाणे गायीला बाजरी-गुळातून पोषण मिळते त्याचप्रमाणे आपल्यालाही यातून चांगले पोषण मिळते. म्हणून थंडीच्या काळात आवर्जून बाजरीचे पदार्थ खाल्ले जातात. यामध्ये भाकरी, खिचडी, वडे यांचा समावेश होतो.
गवारीतून मिळते भरपूर पोषण
गवार ही वातूळ भाजी म्हणून ओळखली जात असली तरी तिच्यात प्रोटीन, फायबर्स, कार्बोहायड्रेटस, व्हिटॅमिन्स हे सगळे मुबलक प्रमाणात असते. याशिवाय गवारीमध्ये फॉस्फरस, कॅल्शियम, लोह आणि पोटॅशियमही मोठ्या प्रमाणात आढळून येते.हाडांच्या मजबुतीसाठी, डायबिटीस, हृदयाचे आरोग्य, रक्तदाब, त्वचाविकार यांवर गवारीची भाजी वरदान मानली गेली आहे. हिवाळ्यात भाज्या मुबलक प्रमाणात मिळतात त्यामुळे सर्वच प्रकारच्या भाज्या भरपूर प्रमाणात खाल्ल्या जातात.