Join us   

मुलांना साधा सर्दी-खोकला आहे की न्यूमोनियाचा धोका? पालकांनी वेळीच ओळखायला हवं कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2024 4:23 PM

मुलांना सतत सर्दी-खोकला होत असेल तर पालकांनी काय करायला हवे?

डाॅ. संजय जानवळे हे थंडीचे दिवस आहेत. बच्चेकंपनी सध्या सर्दी, खोकल्याने हैराण झाली आहे. अशात देशात आणि राज्यात ‘जेएन-१’ हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आल्यामुळे कोरोना पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. सर्दी खोकला, सोलवटलेला घसा आणि वाहणारे नाक हे बहुतेक वेळा आपले आपण बरे होतात; पण कधी कधी त्यातून न्यूमोनिया होतो. सर्दी-खोकल्याचे रूपांतर गंभीर आजारात होत आहे आणि दवाखान्यात नेण्याची गरज आहे, हे पालकांना योग्य वेळी कळले तर मुलांचा न्यूमोनियापासून बचाव करता येईल.

आजार गंभीर होतो आहे हे कसं ओळखायचं? १. मुलांचे वय, खोकल्याचा कालावधी, मुलाने अंगावर पिण्याचे थांबवले आहे का? मुलाला ताप आला आहे का? असल्यास किती दिवस? यावरून आजाराच्या गांभीर्याविषयी कल्पना येते. २. श्वासाचा वेग वाढणे, छातीचे स्नायू आत ओढले जाणे हे गंभीर आजाराचे लक्षण! ३. उदा. दोन महिन्यांच्या आतील मुलांचा श्वसनवेग मिनिटाला ६० पेक्षा अधिक, दोन महिने ते एक वर्ष वयातील मुलाचा श्वसनवेग मिनिटाला ५० पेक्षा अधिक तर एक ते पाच वर्ष वयोगटात तो प्रतिमिनिट ४० पेक्षा असणे. त्याचबरोबर श्वास आत घेताना छातीच्या खालच्या भागातील फासळ्या व स्नायू आत ओढले जाणे, हे गंभीर आजारांचे लक्षण असते.

(Image :google)  

४. सर्दी -खाेकला, वाहते नाक घराच्या घरी काहीच औषधी न वापरता बरे होतात. बाजारात विकली जाणारी सर्दी-खोकल्यावरची बहुतेक सर्व औषधे एक तर निरुपयोगी किंवा अपायकारक असतात. ताप, खोकला व सर्दी आहे; न्यूमोनिया नाही, अशा मुलांवर घरगुती उपचार करता येतात.

पालकांनी अशावेळी काय करावे?

१. मुलांचा आहार चालू ठेवा. अंगावरचे पिणाऱ्या मुलाला सर्दी-खोकला झाल्यावर पाजणे कठीण जाते; पण अंगावरचे दूध पिण्याने जंतुसंसर्गाचा सामना करण्यासाठी मदत होते. म्हणून त्याला अंगावर पाजण्याचे पुन्हा-पुन्हा, चिकाटीने प्रयत्न केले पाहिजेत. २. मुलाचे चोंदलेले नाक साफ केले, तर त्याला दूध ओढण्यास मदत होते. जर मूल दूध ओढू शकत नसेल, तर स्तन पिळून त्यातले दूध स्वच्छ वाटी-चमच्याने पाजावे.

 

(Image :google)  

 

३. अंगावर न पिणाऱ्या मोठ्या मुलांना चुचकारून थोडे-थोडे अन्न परत परत खायला द्यावे. ४. मूल आजारातून बरे झाले, की त्याला निदान एक आठवडाभर तरी रोज नेहमीपेक्षा अधिक एक वेळा जेवण द्यावे. ५. आजारी पडण्यापूर्वी मुलाचे वजन जेवढे होते, तेवढे परत होईपर्यंत मूल पूर्णपणे बरे झाले आहे, असे म्हणता येणार नाही. सर्दी-खोकला झालेल्या मुलांना भरपूर पाणी वा पातळ पदार्थ द्या. ६. नवजात अर्भकांना, लहान मुलांना आपल्या शरीराचे तापमान योग्य मर्यादेत राखता येत नाही. म्हणून त्यांना उबदार कपड्यांत गुंडाळून ठेवले पाहिजे. मात्र, ते खूपच घट्ट व गरम होईल, असे नसावेत. वातावरण उबदार असावे, पण गरम नको.

७. ताप येणे, हे नेहमीच गंभीर आजाराचे लक्षण असते, असे नव्हे. मुलाला ताप आलाच, तर तो तातडीने कमी करण्यासाठी 'पॅरासिटॅमाॅल' द्यावे व त्याचे अंग सतत कोमट पाण्याने ताप असेपर्यंत पुसत रहावे. ८. मुलाचे नाक स्तनपानापूर्वी व झोपण्याआधी पुसून साफ करावे. त्यामुळे दमट वातावरणात मुलाला श्वास घेणे सोपे जाते. दिवसातून दोन-तीन वेळा मुलाच्या खोलीतील दारे-खिडक्या उघडी ठेवून मुलाच्या खोलीतली हवा ताजी ठेवावी. मात्र सर्दी-खोकला झालेल्या मुलाच्या अंगाला वारा लागू देऊ नये. ९. स्वयंपाकाच्या, ध्रूम्रपानाच्या वा इतर कुठल्याही धुराने भरलेल्या वा धुरकट खोलीत मूल राहत वा झोपत असेल, तर त्याला न्यूमाेनिया होण्याची शक्यता अधिक असते. विशेषत: तंबाखूच्या धुराने मुलाच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम होतात.

(Image :google)

 

१०. मुलाच्या जवळपास शिंकणे वा थुंकणे अतिशय धोकादायक असते. सर्दी-खोकला झालेल्या प्राैंढांनीही लहान मुलांपासून दूर राहावे. ११. न्यूमोनियापासून बचाव करण्यासाठी लहान मुलांना कमीत कमी पहिले सहा महिने केवळ स्तनपान करा. १२. सर्व मुलांना पौष्टिक आहार द्या. त्यांचे संपूर्ण लसीकरण करा. स्तनपानाने मुलांचे रोगांपासून संरक्षण होते. न्यूमोनिया होणाऱ्या मुलांमध्ये स्तनपान करणाऱ्या मुलांपेक्षा बाटलीने पिणाऱ्या मुलांच्या संख्या सरासरी दुप्पट असते. म्हणून पहिल्या फक्त स्तनपानच करू द्यावे, हे या बाबतीत विशेष महत्त्वाचे आहे. १३. हिरव्यापालेभाज्या व पिवळी केशरी रंगाची फळे यातून मिळणाऱ्या 'अ' जीवनसत्वामुळे न्यूमोनियापासून रक्षण होण्यास मदत होते.

(एम. डी. बालरोगतज्ज्ञ) dr.sanjayjanwale@icloud.com

टॅग्स : लहान मुलंआरोग्य