Join us   

उन्हाळ्यात मुलांना खूप घामोळ्या होतात? तज्ज्ञ सांगतात 5 सोपे उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2022 4:12 PM

आधीच मुलांची घामाने चिडचिड होत असते, त्यात घामोळे आले की आणखी चिडचिड होते. उन्हाळ्यात येणाऱ्या घआमोळ्यांसाठी कोणते उपाय करावेत याविषयी...

ठळक मुद्दे घामोळी जास्तीत जास्त कोरडी राहतील असे पाहावे. यासाठी घामोळ्यांवर सतत पावडर टाकत राहावी. घामोळ्यांचा त्रास होत असेल तर दुर्वांचा रस काढून तो मुलांना १ चमचा रस दिवसातून ३ वेळा द्यावा. 

उन्हाळा म्हटला की अंगाची लाहीलाही आणि सगळीकडून वाहणाऱ्या घामाच्या धारा. यांमुळे उन्हाळ्यात उष्णतेचे अनेक विकार होतात. कधी कांजीण्या तर कधी लघवीला त्रास होणे अशा समस्या उद्भवतात. आपल्यालाच उन्हाचा इतका त्रास होतो तर लहान मुलांचे तर उकाड्यानी काय होत असेल. त्यांना तर आपल्याला काय होते सांगताही येत नाही. अनेकदा मुलांना उन्हाळ्यात घामोळे येते. घामोळ्यानी खाज येणे, अंगाची आग होणे, ठराविक ठिकाणी लाल रॅश येणे अशा समस्या उद्भवतात. या घामोळ्या साधारणपणे पाठ, पाय, हात आणि गळ्यावर येतात. डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी घामोळ्या कमी होण्यासाठी घरच्या घरी काही उपाय करणे शक्य असते. त्यामुळे आपल्या मुलांना घामोळ्या आल्या तर काय उपाय करायचे याबद्दल आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. पौर्णिमा काळे सांगतात....

(Image : Google)

घामोळ्या येण्याचे कारण 

शरीर जास्त तापमानाच्या संपर्कात येतं तेव्हा जास्त घाम येतो. अति उष्णता व दमट हवेमुळे घामाची निर्मिती करणाऱ्या नलिका जाम होतात आणि आपल्याला घामोळ्या येतात. या अडथळ्यामुळे त्वचा लालसर होऊन ती खाजवते.

उपाय 

१. सैलसर आणि सुती कपडे घाला त्यामुळे त्वचा घामाने ओलसर होणार नाही.

२. जास्तीत जास्त थंड व कोरड्या वातावरणात राहावे. जास्तीत जास्त पाणी प्यावे आणि कलिंगड, खरबूज, काकडी अशी पाणीदार फळे खावीत

३. मुले बाहेरुन फिरुन किंवा खेळून आल्यावर त्यांना आवर्जून गार किंवा कोमट पाण्याने आंघोळ घाला. 

४. एखाद्या ठिकाणी घआमोळ्या येण्यास सुरुवात झाली आहे असे वाटल्यास त्याठिकाणी कोरफडीचा गर लावणे किंवा थंड पाण्याने तो भाग धुणे यामुळे खाज कमी होण्यात मदत होते.

५. चंदन पावडर व काकडीचा रस एकत्र करुन घामोळ्यांच्या ठिकाणी लावल्यास त्याचा घामोळे जाण्यासाठी अतिशय चांगला उपयोग होतो. 

६. कडुलिंबाच्या पानात त्वचेसाठी आवश्यक असे अनेक उत्तम गुणधर्म असतात. त्यामुळे आपण गुढी पाडव्यालाही कडुलिंबाची पाने आंघोळीच्या पाण्यात घालून आंघोळ करतो. त्याचप्रमाणे घामोळी आली असल्यास अशाप्रकारे नियमितपणे आंघोळ करताना पाण्यात कडुलिंबाचा पाला घालावा. 

७. घामोळ्यांचा त्रास होत असेल तर दुर्वांचा रस काढून तो मुलांना १ चमचा रस दिवसातून ३ वेळा द्यावा. 

(Image : Google)

८. आवळा सरबत, कोकम सरबत, वाळा किंवा खसचे सरबत द्यावे त्यामुळे आग कमी होऊ शकते. 

९. घामोळी जास्तीत जास्त कोरडी राहतील असे पाहावे. यासाठी घामोळ्यांवर सतत पावडर टाकत राहावी. 

१०. मात्र घाम निर्माण करणारी नलिका संसर्गित झाली तर वैद्यकीय उपचारांची गरज पडू शकते.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहोम रेमेडीसमर स्पेशल