मीठाशिवाय आपल्या आयुष्याला चवच नाही. मीठाशिवाय कोणत्याही पदार्थाला चव येऊ शकत नाही. मीठ हे आपल्या रोजच्या आहारात किती महत्त्वाचे आहे हे आपल्याला माहित आहे. कोणताही पदार्थ मीठाशिवाय बेचव लागतो. एखाद्या पदार्थात मीठ जास्त झाले किंवा मीठ कमी झाले तरच आपल्याला मीठाचे महत्त्व कळते. मीठ पदार्थाच्या चवीसाठी जितके आवश्यक असते तितकेच आरोग्यासाठीही मीठ खाणे उपयुक्त असते. मात्र ते किती, कोणते आणि कसे खावे याविषयी काही गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे. मीठामुळे आपल्याला आयोडीन आणि इतरही अनेक महत्त्वाचे घटक मिळतात. असे असले तरी मीठाचे आहारातील प्रमाण जास्त झाले तर उच्च रक्तदाब किंवा अन्य समस्या उद्भवतात. त्यामुळे शरीरातील मीठाचे प्रमाण योग्य राखणे आवश्यक असते.
आपण सगळेच रोजच्या जेवणात साधारणपणे साधे मीठ वापरतो. तसेच अनेक नमकीन पदार्थांमध्येही हे साधे मीठच वापरले जाते. मात्र साध्या मीठाच्या जास्तीच्या वापरामुळे आरोग्याचे बरेच प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सैंधव मीठ वापरण्याचा सल्ला अनेकदा डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांकडून दिला जातो. सैंधव मीठ हे गुलाबीसर रंगाचे असून ते चवीला थोडे कमी खारट असते तसेच साध्या मीठापेक्षा सैंधव मीठाची किंमतही बरीच जास्त असते. मात्र आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या सैंधव मीठ खाण्याचे फायदे समजून घेऊया...
१. सैंधव मीठामध्ये इलेक्र्टोलाइटसचे प्रमाण सामान्य मीठापेक्षा कमी असते. यामुळे हाडांचा ठिसूळपणा, सांधूदुखी या समस्या दूर राहण्यास मदत होते. शरीराला प्रमाणापेक्षा जास्त इलेक्ट्रोलाइटस मिळाले तर हाडांचे दुखणे त्रास देऊ शकते. त्यामुळे आहारात सैंधव मीठाचा वापर करावा.
२. ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे अशा व्यक्तींना नियमितपणे सैंधव मीठ खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. मीठामुळे रक्तदाबाची समस्या वाढते, मात्र मीठ पूर्ण बंद करणे शक्य नसल्याने आहारात साध्या मीठापेक्षा सैंधव मीठाचा वापर करणे केव्हाही चांगले.
३. गेल्या काही वर्षात हृदयरोग असणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. हृदयाच्या तक्रारी वाढल्या तर एकाएकी हृदयाचा झटका येऊन जीव गमावण्याची शक्यता असते. पण अशा व्यक्तींनी आहारात सैंधव मीठ खाल्ल्यास त्याची हृदयरोगाची समस्या दूर होण्यास मदत होते.
४. शरीरात असणारे सेरोटोनिन आणि मेलाटोनिन हे हार्मोन्स नियंत्रणात राहण्यासाठी सैंधव मीठ अतिशय फायदेशीर ठरते. शरीराचे सर्व कार्य सुरळीत राखण्यासाठी हार्मोन्सची पातळी चांगली असणे आवश्यक असते. हे दोन्ही हार्मोन्स संतुलित असतील तर ताणतणाव दूर होण्यास मदत होते.
५. मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी सैंधव मीठ उपयुक्त ठरते. या मीठाच्या सेवनाने आपल्याला थकवा येत नाही आणि आपण दिवसभर फ्रेश राहू शकतो. शरीराचे कार्य सुरळीत ठेवायचे असेल तर मेटाबॉलिझम चांगला असणे आवश्यक असते.