लॉकडाऊन किंवा एरवीही सततची बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि आहाराच्या चुकीच्या पद्धती यांचा शरीरावर विपरीत परिणाम होतो. यामुळे अनेकांना सध्या वजनवाढीची समस्या भेडसावते. वजन एकदा वाढायला सुरुवात झाली की झपाझप वाढते पण कमी होताना मात्र खूप वेळ जातो. वजन कमी करणे ही मोठी समस्या असली तरी योग्य ते नियोजन आणि सातत्य यामुळे आपण ही गोष्ट नक्कीच साध्य करु शकता. वजनाचे मॅनेजमेंट करण्यासाठी काही ठराविक गोष्टी नियमित करण्याची आवश्यकता असते. या गोष्टी कोणत्या वेळेला, किती प्रमाणात आणि कशापद्धतीने करायच्या याची माहिती असायला हवी. यासाठी आवश्यक आहे ठराविक मॉर्निंग रुटीन फॉलो करण्याची. पाहूयात मॉर्निंग रुटीन म्हणजे नक्की काय आणि त्यात आपण कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी....प्रसिद्ध योगतज्ज्ञ डॉ. हंसाजी योगेंद्र यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स सांगतात...
१. दिवसाची सुरुवात वेट लॉस ड्रिंकने करा - आपल्यातील अनेक जण सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पोटी चहा घेतात. कॅफेन असलेल्या पेयाने दिवसाची सुरुवात करणे योग्य नाही. त्यामुळे आपण दिवसाची सुरुवात वेट लॉस ड्रींकने करायला हवी. त्यामुळे प्रतिकारशक्ती तर वाढेलच आणि वाढलेली जास्तीची चरबी कमी होण्यासही मदत होईल.
अ) आपण लिंबू पाणी चिया सीडसबरोबर घेऊ शकतो. अर्धा चमचा चिया सीडस रात्रभर किंवा एक तास पाण्यात भिजवून ठेवा. कोमट पाणी घेऊन त्यामध्ये एक चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस घाला. हे एकत्र करा आणि त्यामध्ये भिजलेल्या चिया सीडस घाला. चिया सीडसमुळे तुमचे पोट काही काळासाठी भरलेले राहते आणि त्यामुळे तुम्हाला पुढचा काही वेळ भूक लागत नाही. त्यामुळे तुम्ही जास्त खात नाही. तर लिंबू पाण्यामुळे तुमचे फॅटस बर्न व्हायला मदत होते.
ब) पाण्यात सफरचंदाची फोड आणि दालचिनी घालून ते पाणी पिल्याने वजन कमी होण्यास फायदा होतो. उन्हाळ्यात याचा अतिशय चांगला फायदा होतो.
क) जीरा पाणी हेही वजन कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरु शकते. पचनाच्या तक्रारींवर जीरा पाणी अतिशय चांगले असल्याने गॅसेस, बद्धकोष्ठता, अॅसिडीटी यांसारख्या पचनाशी निगडीत तक्रारी दूर होण्यास मदत होऊ शकते. पचनाच्या तक्रारी दूर झाल्या की वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे जीरा पाणी हा उत्तम उपाय आहे. एक ग्लास पाण्यात साधारण एक चमचा जीरे रात्रभर भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर ते पाणी ३ ते ५ मिनीटे उकळा आणि गाळून प्या.
२. चालायला जा - दररोज मॉर्निग ड्रींक घेतल्यानंतर ३० ते ४० मिनीटे न चुकता चालायला जा. चालण्याच्या व्यायामामुळे वजन कमी होण्यास मदत होते. ब्रिस्क वॉक म्हणजेच थोडे वेगाने चालावे, त्यामुळे आपल्याला आतून फ्रेश वाटते. ब्रेकफास्टच्या आधी चालल्यामुळे तुमचे फॅटस योग्य पद्धतीने बर्न होतात. तसेच सकाळी चालण्यामुळे आपल्याला सूर्यप्रकाशही मिळतो. म्हणून वजन कमी करायचे असल्यास सकाळी लवकर उठून चालायला जाणे सर्वात उत्तम आहे.
३. योगासने करा - चालून आल्यानंतर न चुकता रोज किमान २० मिनीटांसाठी योगासने करा. त्यामुळे तुमच्या स्नायूंची ताकद तर वाढेलच पण शरीर लवचिक होण्यासही त्यामुळे मदत होईल. योगासनामुळे जास्तीच्या कलरीज बर्न व्हायलाही मदत होईल. तज्ज्ञांच्या सल्ल्याने तुमच्या शरीराला झेपेल, आवश्यक असेल अशी आसने निवडा आणि नियमितपणे ती करा. शरीराला आकार येण्यास त्याचा निश्चित फायदा होईल.
४. प्रोटीन रीच ब्रेकफास्ट घ्या- चालणे आणि योगासने झाल्यावर तुम्ही फ्रेश होऊन हेल्दी ब्रेकफास्ट करणे आवश्यक आहे. उत्तम आरोग्यासाठी शरीराला प्रोटीनची आवश्यकता असते. तुमच्या दिवसाच्या पहिल्या आहारात प्रोटीन योग्य प्रमाणात असेल तर तुमचे पोट दिर्घ काळासाठी भरलेले राहते आणि तुम्ही नकळत दिवसभर कमी खाता. तसेच प्रोटीनमुळे तुमची ऊर्जा दिर्घकाळ टिकून राहण्यास मदत होते. स्नायूंची झीज भरुन येण्यासही प्रोटीन उपयुक्त ठरतात. यामध्ये तुम्ही फळे किंवा सुकामेवा घालून ओटमिल, मूग डाळीचा डोसा, पनीर पराठा, नाचणी, ज्वारी, बाजरीची धिरडी यांचा समावेश करु शकता.