Join us   

तब्येतीच्या 'या' ५ समस्या छळतात? त्यावर एकच उपाय सकाळी लवकर उठा, सुर्यप्रकाशात फिरायला जा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 6:50 PM

बहुतांश महिलांना येणारी एक अडचण म्हणजे सकाळच्या वेळी स्वत:साठी अजिबात वेळ न मिळणे. म्हणूनच तर अनेक महिलांचे सुर्यप्रकाशात फिरणे होत नाही आणि त्यामुळेच मग त्यांना आरोग्याच्या 'या' काही समस्या छळू लागतात. 

ठळक मुद्दे कार्यक्षमता वाढविण्यासाठी सकाळी लवकर उठून फिरायला जाणे गरजेचे आहे. 

आजकाल प्रत्येकाचा दिनक्रम अतिशय व्यस्त झाला आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या वेळा सांभाळताना घरातल्या महिलेच्या अक्षरश: नाकीनऊ येतात. सकाळची त्यांची सुरुवातच मुळात कामांची उजळणी करत आणि पटापट हात चालवत करावी लागते. सकाळचे चहा- पाणी, नाश्ता, प्रत्येकाचे डबे असे सगळे सांभाळत कधी सुर्य प्रखर होऊन जातो, ते कळतही नाही. यात जर महिला वर्किंग वुमन असेल तर मग सकाळच्या वेळी तिच्यामागची गडबड खूप जास्त वाढलेली असते. अशा धांदलीत मग अनेक जणींचे सुर्यप्रकाशात जाऊन फिरणे होत नाही. त्यामुळे मग आरोग्याच्या काही समस्या छळू लागतात. 

 

अभिनेत्री करिश्मा कपूर हिने नुकतीच एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. यामध्ये तिने सकाळचे कोवळे ऊन अंगावर घेतानाचा तिचा फोटो शेअर केला आहे. 'Sunshine is my favourite filter' अशी कॅप्शन तिने या फोटोला दिली असून यामध्ये करिश्मा अतिशय आकर्षक दिसते आहे. कोवळ्या सुर्यप्रकाशात तिचा चेहरा अतिशय उजळून गेला असून खूपच तजेलदार दिसत आहे. करिश्माप्रमाणे प्रत्येक जणीने आरोग्यासाठी काही वेळ तरी सकाळचे कोवळे ऊन अंगावर घेतलेच पाहिजे. कोवळ्या ऊनाचे लाभ मिळवायचे असतील तर सकाळी ६: ३० ते ८: ३० ही वेळ सर्वोत्तम मानली गेली आहे.

 

सुर्यप्रकाशात फिरल्यामुळे दूर होतात या तक्रारी १. व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन डी ची कमतरता भरून काढण्यासाठी सकाळच्या वेळचे कोवळे ऊन अंगावर घेणे हा सगळ्यात उत्तम, सोपा आणि तेवढाच प्रभावी उपाय आहे. व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे हाडांच्या तक्रारी, निरुत्साह, केसगळती अशा अनेक समस्या छळतात. हे सगळे त्रास कमी करणारा एक उत्तम उपाय म्हणजे सकाळी लवकर उठून सुर्यप्रकाश फिरायला जाणे. 

२. हार्मोन्सचे संतुलन चांगले राहते ताज्या हवेतील ऑक्सिजन मिळाल्यामुळे मन आणि शरीर दोन्हीही प्रफुल्लित होते. सकाळचे कोवळे ऊन आणि आजूबाजूला दिसणारी हिरवळ यामुळे शरीरातील हार्मोन्स संतुलित राहण्यास मदत होते.

 

३. ताणतणाव दूर होतात सकाळी कोवळ्या उन्हात आणि मोकळ्या हवेत फिरल्यामुळे मन प्रसन्न होते. सकारात्मकता मिळते. यामुळे मनावरचे ताणतणाव विसरले जातात आणि मन शांत होण्यास, एकाग्रता वाढण्यास मदत होते. त्यामुळे सकाळच्या कोवळ्या ऊनात फिरण्यासाठी मुलांनाही बाहेर नेले पाहिजे. 

४. निद्रानाश निद्रानाशाचा त्रास ज्यांना होत असेल त्यांनी सकाळी लवकर उठून सुर्यप्रकाशात फिरून यावे. यामुळे मनावरचा ताण कमी होतो. चांगला व्यायाम होतो. त्यामुळे रात्री झोपदेखील चांगली लागते, असे तज्ज्ञ सांगतात. 

 

५.कार्यक्षमता  सकाळी वॉकिंगसाठी जे लवकर उठतात, ते आपोआपच लवकर झोपतात. त्यामुळे रात्रभर पुरेशी झोप होऊन मेंदू आणि शरीराचा आराम होतो आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही अधिक उत्साहाने उठता. त्यामुळे कार्यक्षमता वाढविण्यासाठी सकाळी लवकर उठून फिरायला जाणे गरजेचे आहे.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स