जेवण जास्त झालं किंवा खाल्लेलं अन्न नीट पचलं की आपल्याला ढेकर येतात. ढेकर आलेलं चांगलं असतं असं म्हटलं जातं. याचं कारण म्हणजे पोटातील अनावश्यक गॅस यामुळे बाहेर पडण्यास मदत होते. असे असले तरी सतत ढेकर येत असतील तर आपल्याला वैताग येतो. हे ढेकर थांबवण्यासाठी नेमकं काय करायचं हेही आपल्याला समजत नाही. इतकंच नाही तर अनकेदा आपल्याला खूप करपट ढेकर येतात. असे करपट ढेकर आले की आपलं तोंड तर आंबट होऊन जातंच पण घशात अॅसिडीक पदार्थ आल्यानं नकोसं वाटतं. पोट बिघडणे, अपचन, अॅसिडीटी यांसारख्या पचनाशी निगडित समस्यांमुळे करपट ढेकर येण्याचा त्रास होतो. तुम्हाला सतत अशाप्रकारचा त्रास होत असेल तर काही घरगुती उपायांनी या समस्येवर तोडगा काढता येतो. पाहूयात हे उपाय कोणते आणि ते कसे करायचे...
१. वेलची
गोड पदार्थांचा स्वाद वाढविण्यासाठी वापरली जाणारी वेलची दिसायला अतिशय लहान दिसते. पण यामुळे पदार्थाची चव वाढण्यास मदत होते. नैसर्गिक माऊथ फ्रेशनर म्हणूनही वेलचीचा उपयोग केला जातो. एक वेलची चावून चावून खाल्ली आणि त्यावर पाणी प्यायले तर करपट ढेकरांचा त्रास कमी होण्याची शक्यता असते.
२. बडीशोप
जेवण झाल्यानंतर खाल्लेले अन्न पचावे यासाठी आपण आवर्जून बडीशोप खातो. बडीशोपमध्ये अँटीऑक्सिडंटस आणि खनिजे असतात ज्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे चांगले पचन होते. जेवण झाल्यावर बडीशोप आणि साखर खाल्ल्यास पचनक्रियेला गती मिळते आणि करपट ढेकर येण्याचा त्रास कमी होतो. त्यामुळे जेवण झाल्यावर आवर्जून बडीशोप खायला हवी.
३. आहाराबाबत लक्षात ठेवा
घरी बनवलेला समतोल आणि पौष्टिक आहार घ्या. जंक फूड्स, मसालेदार खाणे, हातगाडीवरील पदार्थ यामुळे पोट बिघडण्याचे प्रमाण वाढते. अशामुळेही करपट ढेकर येण्याची शक्यता वाढते. दिवसातून फक्त दोनदा भरपूर जेवण घेण्याऐवजी, चार-चार तासांनी थोडे थोडे खा, त्यामुळे पोटाला खाल्लेले अन्न पचण्यासाठी वेळ मिळतो आणि पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. बराच काळ उपाशी राहण्यानेही अपचन किंवा असिडीटीचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे पूर्ण उपाशी राहू नका.
४. आलं
आलं पदार्थांचा स्वाद वाढविण्यासाठी अतिशय उपयुक्त असते. त्याबरोबरच आल्याचा औषध म्हणूनही उपयोग होतो. कच्च्या आल्यामध्ये थोडे मीठ घालून ते खाल्ल्यास त्यामुळे पोटातील अॅसिडीक गॅसेस कमी होण्यास मदत होते. आलं चवीला तिखट लागत असलं तरी तुम्हाला करपट ढेकर येत असतील तर हा उपाय आवर्जून करुन बघा.
५. या गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या
अनेकांना जेवल्यावर लगेच आडवे होण्याची सवय असते. मात्र अशामुळे खाल्लेल्या अन्नाचे पचन न होता ते पोटात साचून राहते आणि सडल्यासारखे होते. त्यामुळे करपट ढेकर येतात, त्यामुळे जेवण झाल्यावर शतपावली करण्याची सवय ठेवा. शरीराची हालचाल झाल्यामुळे अन्नपचन तर होतेच आणि करपट ढेकरही येत नाहीत. तसेच जेवल्या जेवल्या अजिबात पाणी पिऊ नका. त्यामुळे शरीरातील अॅसिड बाहेर येतात आणि जळजळ होते. जेवल्यानंतर किमान अर्धा ते एक तासाने पाणी प्यायला हवे.