रात्री झोपताना बऱ्याच जणांना लघवीला जाऊन मग झोपण्याची सवय असते. झोपेत लघवीसाठी जाग येऊ नये हाच त्यामागील मुख्य उद्देश असतो. मात्र तरीही रात्री लघवीसाठी वारंवार उठावे लागते. आतआ असे होण्यामागे नेमके काय कारण असते आणि महिलांमध्ये ही समस्या जास्त प्रमाणात का दिसून येते याविषयी समजून घेऊया. लघवीला उठलं की अनेकदा झोपमोड होते आणि मग लगेच झोप लागत नसल्याने झोप अर्धवट होते. वय जसं वाढतं तशी ही समस्या वाढत जाते. मात्र अनेकदा कमी वयाच्या व्यक्तींनाही रात्री एकदा का होईना लघवीसाठी उठावे लागते. याला नॉक्चरनल युरीया किंवा नॉक्चुरीया असं म्हटलं जातं. यामागे काही नेमकी कारणं असतात ती समजून घेतली तर उपचार करणे सोपे होते (Do You Also go to Washroom many times in the Night) .
याबाबत प्रसिद्ध जनरल फिजिशियन डॉ. अविनाश भोडंवे महत्त्वाची कारणं व उपाय सांगतात....
१. डायबिटीस असेल आणि रक्तातील साखरेची पातळी जास्त असेल तर वारंवार लघवीला उठायला लागते. यासाठी शुगर नियंत्रणात ठेवणे हा सर्वोत्तम उपाय आहे.
२. महिलांना युरीन इन्फेक्शन वारंवार होते, त्यामुळेही सतत लघवी लागण्याची समस्या उद्भवते. सतत युरीन इन्फेक्शन होत असेल तर त्यासाठी काही वैद्यकीय तपासण्या करुन त्याचे निदान करावे लागते. मात्र हे इन्फेक्शन वेळीच आटोक्यात येणे गरजेचे असते.
३. पाळी गेलेल्या म्हणजेच पोस्ट मेनोपॉज नंतर स्त्रियांचा युरीन पास करण्याचा वॉल्व घट्टसर होतो. त्यामुळे लघवी पास करताना ती पूर्णपणे पास होत नाही. मूत्राशय पूर्ण रिकामं न होता काही लघवी त्यामध्ये शिल्लक राहते आणि मग वारंवार लघवीला जावे लागते. यामध्ये सिस्टोस्कोपी करुन वॉल्व नीट होण्यासाठी उपचार दिले जातात.
४. सिस्टायटीस म्हणजेच युरीनरी ब्लॅडरला सूज किंवा इन्फेक्शन असते. यामुळेही लघवीला वारंवार जावे लागू शकते. यासाठी सूज का आली आहे त्यामागचे कारण शोधून त्यावर वेळीच योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे असते.
५. बीपीचा त्रास असेल तर त्यावर देण्यात आलेल्या काही औषधांचा परीणाम म्हणूनही वारंवार लघवी लागण्याची शक्यता असते. त्यामुळे नेमके कारण लक्षात घेऊन मगच या समस्येचे नेमके निराकरण करणे शक्य होते.