कोरोना काळात ताप आला किंवा अगदी अजूनही वातावरण बदलामुळे शरीराचं तापमान वाढलं की आपण सर्रास डोलो ६५० (Dolo 650) नावाची गोळी घेतो. काही वेळा डॉक्टर ही गोळी घ्यायला सांगतात तर काही वेळा आपण मनानेच ओव्हर द काऊंटर हे औषध घेतो. सध्या या औषधावरुन बऱ्याच चर्चा रंगल्याचे चित्र आहे. हे औषध तयार करणारी मायक्रो लॅब्स लिमिटेड ही कंपनी आपल्या गोळीचा जास्तीत जास्त खप व्हावा यासाठी डॉक्टरांना कोट्यवधी रुपयांची गिफ्टस देत असल्याचा आरोप कंपनीवर ठेवण्यात आला आहे. हा वाद न्यायालयात गेला असून त्यावर सुनावणी सुरू आहे. याविषयी इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्याचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांना विचारले असता त्यांनी डॉक्टर डोलो ६५० हे औषध रुग्णांना का घेण्यास सांगतात याबाबतची तथ्ये सांगितली (Dolo 650 Tablet for Fever Medicine Expert opinion)...
१. यापूर्वीचे ब्रॅण्ड्स क्रोसिन, कॅलपॉल हे ओव्हर द काऊंटर म्हणजे प्रीस्क्रिप्शन शिवाय मिळण्यावर बंदी आली. त्यामुळे डॉक्टरांनी ती लिहिणे थांबवले याचवेळेस डोलो हे मायक्रो कंपनीचे औषधं प्रीस्क्रिप्शन वर लिहिण्याचे औषध म्हणून उपलब्ध झाले. त्यामुळे त्यामुळे डॉक्टरांनी ते लिहिण्यास सुरुवात केली.
२. इतर कोणत्याही औषधापेक्षा डोलो हे नाव लिहायला आणि लक्षात ठेवायला, विशेषत: फोनवर सांगायला सोपे असल्याने पेशंट्सनी ते मोठ्या प्रमाणात वापरायला सुरुवात केली.
३. २०२०मध्ये कोरोनाची महामारी आल्यावर, त्यात ताप येणे आणि अंग दुखणे ही मुख्य लक्षणे असल्याने डोलो मोठ्या प्रमाणात वापरले गेले. इतकेच नाही तर कंपनीने भारतभरात मोठ्या प्रमाणात हे औषध उपलब्ध करुन दिले, त्यामुळे मागणी वाढली.
४. पूर्वी Paracetamol हे औषध 500 मि. ग्रॅम मध्ये मिळायचे, ते दिवसांतून 3 ते 4 वेळा द्यावे लागायचे. मात्र डोलो हे 650 मि. ग्रॅम paracetamol असल्याने ते दिवसातून केवळ 2 वेळच द्यावे लागते, त्यामुळे पेशंट्सची आणी डॉक्टरांची त्याला जास्त पसंती मिळाली.
५. Paracetamol 650 मि ग्रॅम हे औषधं केवळ तापासाठीच नव्हे तर ताप असताना आणि ताप उतरल्यावर हातपाय दुखणे या त्रासासाठी उत्तम परिणाम करते. त्यातील अँटी इन्फलेमेटरी गुणधर्मामुळे हा फायदा होतो.
का सुरू झाला डोलोचा वाद...
मायक्रो लॅब्स लिमिटेड, डोलो बनवणारी कंपनी बाजारात अनेक प्रकारची औषधे बनवते आणि विकते. कंपनी तापाचे औषध डोलो-650 हे सर्वात लोकप्रिय आहे. विशेषत: कोविड-19 च्या काळात या औषधाचे नाव सर्वांनाच परिचित झाले आणि त्या काळात ज्याला ताप आला त्याने हे औषध नक्कीच घेतले. कंपनीचा व्यवसाय ५० देशांमध्ये पसरलेला आहे. ६ जुलै रोजी प्राप्तिकर विभागाने ९ राज्यांमध्ये असलेल्या ३६ ठिकाणी छापे टाकले तेव्हा कंपनी प्रथम प्रकाशझोतात आली. आयकर विभागाच्या छाप्यांमध्ये इतरही अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आयकर विभागाच्या चौकशीत मायक्रो लॅबने ३०० कोटी रुपयांचा कर चुकवल्याचे समोर आले आहे. यासोबतच कंपनीने आयकर कायद्याच्या कलम-194C चे उल्लंघन केले आहे. आयकर विभागाने छापेमारी दरम्यान १.२० कोटी रुपयांची रोख आणि १.४० कोटी रुपयांचे दागिनेही सापडले."