Join us   

डॉक्टर, गुगल तर सांगतेय माझ्या आजाराची लक्षणं डेंजर आहेत! - असं तुम्हीही डॉक्टरांना सांगता का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2022 4:38 PM

गुगलवरुन आपल्या आजाराविषयी माहिती घेणं वेगळं आणि स्वत:च स्वत:वर उपचार करणं, तब्येतीशी खेळ करणं धोक्याचं.

ठळक मुद्दे स्वत:च्या तब्येतीशी खेळणं टाळा..

-नितांत महाजन

खरंखरं सांगा, डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी तुम्ही आपली लक्षणं गुगलवर टाकून आपल्याला काय झालंय याचा अंदाज घेता का? आजारी असाल, ताप असेल, रक्त-लघवी तपासणीचे रिपोर्ट आलेले असतील तर आपल्या रिपोर्टवरचे आकडे टाकून त्याचा अर्थ काय, उपाय काय, लक्षणं काय, औषधं काय हे सगळं तुम्ही तपासून पाहता का? बहुतांश लोक पाहतात म्हणून तर शेकडोनं गुगल सर्च सापडडतात. काही लोक डॉक्टरने आपल्या आजाराचं निदान केल्यावर ते योग्य आहे का? कोणतं औषध कशासाठी दिलं आहे, त्याचे साइड इफेक्टस काय हे पाहतात. काहीजण तर डॉक्टरकडे जाण्याऐवजी स्वत:च गुगल करुन मोस्ट कॉमन मेडिसिन घेऊनही टाकतात. आणि अनेकदा त्याचं टेंशन येतं. इतर आजारी लोकांचे अनुभव वाचतो. घाबरतो. घरातल्यांना घाबरवतो. आपल्याला काहीतरी गंभीरच आजार झालेला आहे असंही आपल्याला वाटतं. आणि परिणाम आपण स्वत:ला गुगल डॉक्टर समजू लागतो.

(Image : Google)

बघा तुम्ही साधं डोकं दुखलं, पित्त झालं, जुलाब झाले, पाठदुखी तरी अनेकजण गुगल करतात. आणि घरगुतीच्या नावा‌खाली गुगलवर असलेले उपाय करुन पाहतात. स्वत:च्या मनानं औषधं घेतात. त्यानंतर डॉक्टरांना प्रश्न विचारुन विचारुन भंडावून सोडतात. याचा अर्थ आपण आपल्या आजारासंदर्भात अधिक माहिती अधिक घेऊ नये असं नाही. पण आपल्या डॉक्टरलाही काही कळतं, रिपोर्टचं को रिलेशन असतं, औषधं ते विचार करुन देतात असा विचारच मागे पडतो. आणि वाढत राहतो आपला भयगंड. काहीजण इतरांना फुकट सल्ले देतात. त्यांनाही आपलं गुगल ज्ञान वाटतात. त्यातून जे गुंते होतात ते वेगळे. त्यामुळे माहिती घेणं आणि योग्य माहिती मिळणं यात फरक आहे यातलं तारतम्य ठेवून मग माहिती घ्यावी. नाहीतर आपल्यावर लाइफस्टाइल प्रयोग करण्यातच तब्येतीची हेळसांड होण्याचं भय असतं. स्वत:च्या तब्येतीशी खेळणं टाळा..सेल्फ मेडिकेशन अर्थात स्वत:च्या मनानं औषधं घेणं धोक्याचंच असतं.

टॅग्स : आरोग्यगुगल