पाणी पिणं हा आपल्या आहाराचा एक मुख्य भाग आहे. जेवताना, नाश्ता करताना किंवा काही खाताना छान बसून निवांत खातो. कारण तशा पध्दतीनं खाल्लं तर त्याचा उपयोग होतो. नाहीतर घाईघाईत, धावतपळत, उभ्या उभ्या खाण्याचे दुष्परिणाम माहिती असतात. पण पाणी पिण्याच्या बाबतीत मात्र निष्काळजीपणा बाळगला जातो. घाई आहे म्हणून बहुतांश वेळा पाणी उभ्यानं पटपट पिलं जातं. लहान मुलं, महिला या तर बहुतांशवेळा उभ्यानंच पाणी पिण्याचं काम उरकतात पण अशा प्रकारे पाणी पिण्याची सवय आरोग्यावर घातक परिणाम करते.
आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून तर उभ्या उभ्या पाणी पिणं ही अगदीच चुकीची सवय आहे. उभ्याने पाणी पिताना ते ज्या वेगानं शरीरात खाली सरकतं त्या वेगाचा परिणाम आरोग्यावर होतो. पाणी पिणं ही साधी गोष्ट नाही. कमी किंवा जास्त पाणी पिणं, बसून किंवा उभ्यानं पाणी पिणं या पाणी पिण्याशी निगडित सवयी शरीरावर आणि एकूणच आरोग्यावर घातक परिणाम करतात. उभ्या उभ्या पाणी पिण्याच्या या एका सवयीने अनेक समस्या उद्भवतात; म्हणून ही सवय असेल तर लगेच बदलण्याचा सल्ला आयुर्वेद तज्ज्ञ देतात.
Image: Google
उभ्याने पाणी पिणं घातक..का?
1. उभ्यानं पाणी पिण्याची सवय पचन व्यवस्था आणि इतर शेजारच्या अवयवांना नुकसान पोहोचवते. आणि उभ्यानं पाणी पिल्यानं ते शरीराकडून नीट ग्रहणही केलं जात नाही. त्याचा परिणाम आरोग्यविषयक समस्या उद्भ्वण्यावर होतो.
2. उभ्यानं पाणी पिल्यानं ते सरळ खालच्या दिशेने सरकतं. त्यामुळे आवश्यक पोषक घटक आणि जीवनसत्त्व यकृत आणि पचन व्यवस्थेपर्यंत पोहोचूच शकत नाही. उभ्यानं पाणी पिण्याचे दुष्परिणाम फुप्फुसं आणि हदयावरही होतात. त्याचा परिणाम म्हणजे शरीरातील ऑक्सिजनचा स्तरही गडबडतो.
3. घरातील जेष्ठ मंडळी तरुणांना, लहानांना उभ्यानं पाणी पिताना टोकतात. नळे भरतील असं म्हणतात. तज्ज्ञ म्हणतात की, उभ्यानं पाणी पिल्यानं पोटातल्या नसांवर ताण येतो. नसांवर ताण आला की शरीरातील द्रव पदार्थांचंही संतुलन बिघडतं. यामुळे शरीरात विषारी घटक वाढतात. अपचनासारखे त्रास होतात. उभ्यानं पाणी पिण्याच्या सवयीमुळे शरीरातील आतील यंत्रणा विस्कळित होते, त्याचा परिणाम चेहेर्याची त्वचा खराब होण्यावरही होतो.
4. संधिवाताला आमंत्रण देणारी चुकीची सवय म्हणून उभ्यानं पाणी पिण्याकडे पाहिलं जातं. संधिवाताला कारणीभूत ठरणारे शरीराच्या आतील द्रव पदार्थ सांध्यांमधे साचून राहातात. सांध्यांवर त्याचे दुष्परिणाम होवून सांधे दुखायला लागतात.
5. उभ्यानं पाणी पिल्यानं शरीरात आम्लाचं प्रमाण वाढतं. आम्लं वाढलं की पोटात वायुच्या समस्या निर्माण होतात आणि पोटाचे विकारही उद्भवतात.
Image: Google
अभ्यास काय सांगतो?
उभ्यानं पाणी पिण्याच्या सवयीचा शरीरावर नेमका काय परिणाम होतो याचा अभ्यासही करण्यात आला आहे. हा अभ्यास सांगतो उभ्यानं पाणी पिण्याची सवय संपूर्ण शरीरावर परिणाम करते. या सवयीमुळे हदयाशी आणि फुप्फुसाशी संबंधित विकार होतात. त्यामुळे ही वाईट सवय बदलण्याचा सल्ला आयुर्वेदतज्ज्ञ देतात.