Join us   

जेवणात वरून मीठ खाताय? एका दिवसात 5 ग्रामपेक्षा जास्त मीठ खाल्ल्यास होऊ शकतात गंभीर आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2022 6:36 PM

Excess Salt Dangerous for Health आहारात मिठाचे प्रमाण अधिक ? पाच ग्रामपेक्षा जास्त मीठ खाल्ल्याने होऊ शकतील विविध आजार

मीठ जेवणात नसेल, तर जेवण रुचकर लागत नाही. कोणताही पदार्थ मिठाशिवाय बेचव आहे. हिंदीमध्ये मिठाला ‘’सबरस’’ म्हणजेच पदार्थांमधला मुख्य ‘राजा’ रस म्हटले जाते. मिठाचे योग्य प्रमाण जर शरीरात असले तर शरीरात ताकद आणि उर्जा राहते. परंतु, मीठ जर अधिक प्रमाणावर खाल्ले तर त्याचा थेट परिणाम आपल्या रक्तदाब आणि हृदयावर होतो. भारतात बहुतांश लोकं जेवणातून मिठाचे सेवन अधिक प्रमाणावर करतात. त्यामुळे उच्च रक्तदाब अथवा हायपरटेन्शनसारख्या आजारांना आपण नकळत आमंत्रण देतो. खराब जीवनशैली अथवा, आहार वेळेवर न करणे, स्ट्रेस, या कारणामुळे उच्चरक्तदाबासारखे आजार शरीरात उद्भवतात. ज्यामुळे हृदयाच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. काही लोकं जेवणावरून मीठ घालतात. हे अतिशय धोकादायक मानले जाते.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन (डब्ल्यूएचओ)च्या म्हणण्यानुसार, ‘’ एका दिवसात पाच ग्रामपेक्षा अधिक मिठाचे सेवन करू नये. जेवणातून जर अधिक मिठाचे सेवन केले तर त्याचा थेट परिणाम रक्तदाबावर होतो.’’ काही संशोधकांना असे आढळून आले की,’’अन्नामधून जास्त मीठ खाल्ल्याने रक्तवाहिन्या अरुंद होतात. ज्या थेट रक्तप्रवाहावर परिणाम करतात.’’

मिठाचे प्रमाण करा कमी

जेवणातून अधिक मिठाचे सेवन केल्याने उच्च रक्तदाब आणि हृदयविकारासारखे आजार उद्भवतात. प्रत्येक व्यक्तीने दिवसातून पाच ग्रामपेक्षा अधिक मिठाचे सेवन करू नये. अमेरिकन हार्ट एसोसिएशनच्या म्हणण्यानुसार, ‘’प्रत्येक व्यक्तीने दिवसातून साधारण दोन किंवा दीड ग्राम मिठाचे सेवन केले पाहिजे. त्याच्यापेक्षा अधिक केले तर शरीरासाठी हानिकारक आहे’’ तसेच डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, ‘’पाच ग्राम मिठात दोन ग्राम सोडियम असते. सोडियम आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे.’’

तज्ञांच्या मते, आपल्या शरीरात सोडियम आणि पोटॅशियमचे संतुलन राहणे आवश्यक असते. कमी पोटॅशियमसह जास्त सोडियमचे सेवन केल्याने आरोग्यास हानी पोहचू शकते. अन्नामध्ये मीठ जास्त असल्यास रक्तदाब, हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका वाढतो यामुळे हाडे देखील कमजोर होतात.

डब्ल्यूएचओच्या (WHO) आकडेवारीनुसार, बहुतांश लोक दररोज सरासरी 9 ते 12 ग्रॅम मिठाचे सेवन करतात. संस्थेने असा अंदाज लावला आहे की, मिठाचा वापर शिस्तबद्ध पातळीवर कमी केल्यास जागतिक पातळीवर 2.5 मिलियन मृत्यू रोखता येऊ शकतात.

मिठाचे फायदे व दुष्परिणाम

मीठ हा आपल्या रोजच्या आहाराचा अविभाज्य भाग बनला आहे. मिठाचे योग्यप्रमाणावर सेवन केल्याने आपल्या शरीराला उर्जा मिळते. शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते. तर थायरॉईडला योग्यप्रकारे कार्य करण्यास देखील मदत करते. एवढेच नव्हे तर ज्या लोकांना लो बीपीची समस्या असते त्यांच्यासाठी मीठाचे सेवन करणे फायदेशीर ठरते.  पण जर ते जास्त प्रमाणात खाल्ले तर नकळत आरोग्यास मोठे नुकसान होऊ शकते. यामुळे हृदयरोग, स्ट्रोक, उच्च बीपी आणि किडनीचे आजार होण्याचा धोका अनेक पटींनी वाढू शकतो.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइलअन्न