Join us   

रोज टीव्ही पाहत पाहतच जेवता? ५ गंभीर समस्यांचा धोका, अभ्यास सांगतात ही सवय सोडली नाही तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2022 2:14 PM

Having Dinner watching Television टीव्ही पाहता-पाहता जेवण करणे, आरोग्याच्या दृष्टीकोनातून अत्यंत वाईट सवय आहे. या सवयीमुळे विविध आजार उद्भवतात.

सध्या उपकरणांचा जमाना आहे. जेवताना देखील मनोरंजनासाठी आपण टिव्ही अथवा मोबाईल फोन घेऊन जेवत असतो. दिवसभरात धावपळ केल्यानंतर आपल्यापैकी बहुतांश जण रात्रीच्या वेळेस टीव्हीसमोर शांततेत आणि आरामात बसून जेवणाचा आस्वाद घेतो. पण टीव्ही पाहता-पाहता जेवण करणे ही आरोग्याच्या दृष्टीकोनातून अत्यंत वाईट सवय आहे. या सवयीमुळे आपल्याला लठ्ठपणा, पोटाचा त्रास, कमकुवत डोळे इत्यादी समस्या उद्भवू शकतात.

एन्व्हायर्नमेंटल जनरल ऑफ हेल्थ या प्रतिष्ठित मॅगजीनमध्ये मुलांच्या खाण्याच्या सवयींवर संशोधन करण्यात आलं आहे. यात असे सांगण्यात आलं आहे की, "टीव्ही पाहताना जेवण करणाऱ्या १० वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये लठ्ठपणाचा धोका अनेक पटींनी वाढत आहे. दुपारचे किंवा रात्रीचे जेवण करताना कुटुंबाशी संवाद साधल्यास लठ्ठपणाचा धोका कमी होतो."

हृदयरोगाचा धोका

टीव्ही किंवा मोबाईल फोन पाहताना अन्न खाल्ल्याने सर्व लक्ष स्क्रीनवर राहते, ज्यामुळे शरीरातील चयापचय मंदावते. आणि शरीरात चरबी जमा होऊ लागते. आपण किती खात आहोत याची देखील दखल आपण घेत नाही. त्यामुळे झपाट्याने वजन वाढते. अशाने हृदयाच्या निगडित समस्या, टाइप 2 मधुमेह, रक्तदाब इत्यादीसारखे अनेक गंभीर आजार होऊ शकतात.

पोटाच्या निगडित समस्या

जेवताना आपले संपूर्ण लक्ष स्क्रीनकडे असते. त्यामुळे आपण अन्न पटकन खातो आणि ते पुरेशा प्रमाणात चघळत नाही. ज्यामुळे पोटात दुखणे आदी समस्या निर्माण होतात. या सवयीमुळे अनेक पोटाच्या निगडित समस्या उद्भवू शकतात.

वजन वाढण्यास कारणीभूत

एका संशोधनात असे समोर आलंय की, टिव्ही पाहत असताना जेव्हा खाण्यापिण्याशी संबंधित जाहिरात येते, तेव्हा त्यांच्यामध्ये खाण्याची इच्छा तीव्र होते. त्यामुळे आपण सतत काही ना काही खात राहतो. याने वजन वाढते आणि मग अनेक समस्या निर्माण होतात.

झोपेचं खोबरं

रात्री जेवताना आपण टीव्ही किंवा मोबाईल फोन पाहत असाल, तर तुमची झोप खराब होऊ शकते. स्क्रीन पाहत जेवताना व्यक्ती अधिक अन्न खातो. आपण किती जेवण जेवत आहोत याचे भान नसते. रात्रीची आपली हालचाल देखील होत नाही. अशामुळे अन्न पोटात पचणे कठीण जाते. ज्याने रात्रभर त्रास होतो, आणि वेळेवर झोपही लागत नाही.

मुलांमध्ये लठ्ठपणाचा धोका

बायोमेड सेंट्रल जनरलमध्ये प्रसिद्ध झालेल्या सर्वेक्षणात, मुलांमध्ये लठ्ठपणाची तक्रार वाढत चालली आहे. भारतातील 10 ते 12% मुले लठ्ठ आहेत. जेवताना टीव्ही आणि मोबाईल फोन पाहणे हे त्याचे एक कारण आहे.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सअन्न