वजन कमी करायचं असलं की तरुणी वेगवेगळे उपाय करताना दिसतात. यात चहाप्रेमी असलेले लोक ग्रीन टी आवर्जून घेतात. ग्रीन टी घेतल्याने वजन कमी होते हे आपल्याला माहित असते. पण हा ग्रीन टी नेमका कसा, कधी घ्यायचा याबाबतही पुरेशी माहिती असायला हवी. वजन कमी करायचंय म्हणून चुकीच्या पद्धतीने ग्रीन टीचे सेवन केल्यास त्याचे आरोग्यावर दुष्परिणामही दिसून येतात. अँटीऑक्सिडंटस जास्त प्रमाणात असल्याने ग्रीन टी आरोग्यासाठी लाभदायक ठरतो आणि वजन कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. असे असले तरी तो कोणत्या वेळेला आणि किती प्रमाणात घ्यावा याचे काही नियम आहेत. त्यानुसार ग्रीन टी घेतल्यास निश्चितच फायदा होऊ शकतो.
एका दिवसात ३ कपांहून जास्त ग्रीन टी प्यायल्याने रात्री झोप येण्यास त्रास होऊ शकतो. ग्रीन टीमध्ये लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ आहे. ज्यामुळे शरीरातील आवश्यक पोषक घटक बाहेर फेकले जातात. हे शरीर शुद्ध राहण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. रिकाम्या पोटी ग्रीन टी पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे तुम्ही झोपेतून उठल्यावर ग्रीन टी पीत असाल तर तसे करु नका. जेवणाच्या २ तास आधी किंवा नंतर ग्रीन टी पिऊ शकता. जेवणानंतर ग्रीन टी प्यायल्याने शरीरातील पोषक घटकांचे प्रमाण कमी होते आणि लोह आणि खनिजे शोषण्यास अडथळा निर्माण होतो. पाहूयात याविषयीचा अभ्यास काय सांगतो...
१. ओहियो स्टेट विद्यापीठात करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, ग्रीन टीमुळे वजन कमी तर होतेच पण आरोग्य सुधारण्यासही मदत होते.
२. आठ आठवड्यांसाठी, प्राण्यांचा एक मोठा गट दोन गटांमध्ये विभागला होता. अर्ध्या प्राण्यांनी चरबी वाढवण्यासाठी तयार केलेला उच्च चरबीयुक्त आहार घेतला आणि अर्ध्यांना नियमित आहार देण्यात आला. तसेच प्रत्येक गटात, अर्ध्या प्राण्यांना त्यांच्या जेवणासह ग्रीन टीचा अर्क देण्यात आला. सर्व प्राण्यांसाठी शरीरातील चरबीयुक्त ऊतींचे वजन, इन्सुलिन प्रतिरोध आणि इतर घटक मोजले गेले.
३. यातील सर्वेक्षणानुसार ज्या उंदरांना ग्रीन टीसह उच्च चरबीयुक्त आहार देण्यात आले होते, त्यांच्या शरीराचे वजन ग्रीन टी न घेतलेल्या उंदरांपेक्षा 20 टक्के कमी होते तसेच त्यांचा इंसुलिन प्रतिरोधही कमी होता.
४. ग्रीन टी हा पाण्यासारखा पिणे अजिबात योग्य नाही, ते आहारासाठी घातक ठरु शकते. उंदरांना ज्याप्रमाणे दिवसभरात आहारासोबत थोड्या प्रमाणात ग्रीन टी दिला, तसा तो घेणे आरोग्यासाठी चांगले असते. ३ मध्यम आकाराच्या कपांपेक्षा जास्त ग्रीन टी पिणे योग्य नाही.
५. ग्रीन टी मुळे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत होते, तसेच टाइप २ मधुमेहाचा धोकाही कमी होण्यास मदत होते.