लघवीला लागणे ही नैसर्गिक क्रिया असली तरी रात्रीच्या वेळी सतत लघवीला उठावे लागणे हे कंटाळवाणे असू शकते. यामुळे झोपमोड होत असल्याने आपल्याला रात्रीच्या वेळी उठायचा कंटाळा येतो. एकत्र कुटुंब असेल तर अशाप्रकारे सारखे उठून लघवीला जाणे अनेकांसाठी लाजीरवाणेही वाटू शकते. मात्र लघवी दाबून ठेवणे शक्य नसल्याने आपण वैतागत का होईना रात्री लघवीसाठी उठतोच. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फर्मोशनने केलेल्या अभ्यासानुसार, ४० वर्षाच्या वरील ६९ टक्के पुरुष आणि ७६ टक्के महिला रात्रीच्या वेळी लघवीसाठी उठतात. तर ३० वर्षे वयाच्या ३ पैकी १ जण रात्रीत किमान दोन वेळा लघवीला जातात असे यामध्ये नोंदवण्यात आले आहे.
रात्री लघवीला जास्त का जावे लागते?
रात्री झोपायच्या पूर्वी आपण भरपूर पाणी प्यायलेलो असल्याने झोपेत लघवी लागणे अतिशय सामान्य आहे असे अनेकांना वाटते. पण असे नेहमी असतेच असे नाही. तुम्ही झोपताना भरपूर पाणी पित असाल तर तुम्हाला कधीतरीच लघवीला जावे लागते. मात्र तुम्ही नियमित लघवीसाठी उठत असाल तर त्यामागे काही वैद्यकीय कारणही असू शकते हे लक्षात घ्यायला हवे. इतकेच नाही तर आपल्याला नियमीत रात्रीच्यावेळी लघवीला उठावे लागत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
रात्री सतत लघवीला उठावे लागण्याची कारणे
१. वय
रात्रीच्या वेळी वारंवार लघवीला जावे लागणे हे आपल्या वयावर अवलंबून असते. वयाची ५० वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तींमध्ये सतत लघवीला जावे लागण्याचे प्रमाण जास्त असते. याचे कारण म्हणजे त्यांच्या प्रोस्टेट ग्रंथींची वाढ झालेली असते. सतत लघवी लागण्याचे हे एक महत्त्वाचे कारण असू शकते.
२. डायबिटीस
ज्यांना डायबिटीससारखी समस्या आहे अशा वयाची ५० किंवा ६० वर्षे झालेल्या व्यक्तींना रात्रीच्या वेळी वारंवार लघवीला लागते. सध्या डायबिटीसची समस्या कमी वयातील व्यक्तींमध्येही वाढलेली असल्याने रात्री उठणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे.
३. गर्भधारणा
रात्री सतत लघवीला लागणे ही गर्भधारणेची सुरुवातीची लक्षणे आहेत. हे असामान्य नसून गर्भाची जसजशी वाढ होत जाते तेव्हाही ब्लॅडरवर दाब येत असल्याने सतत लघवीला लागते. अनेकदा लघवी लागल्यासारखी वाटते पण होत नाही असेही होते.
४. युरीनरी ट्रॅक इन्फेक्शन
आपल्याला युरीनरी ट्रॅकचे इन्फेक्शन झाले असेल तर दिवसा आणि रात्री अशा दोन्ही वेळेला वारंवार लघवीला जावे लागते. यामध्ये पोटदुखी, ताप येणे, थकवा येणे, लघवीला वेगळाच वास येणे अशा समस्या उद्भवतात. यामध्ये खालच्या भागात खाज येणे, आग किंवा जळजळ होणे अशी लक्षणेही दिसून येतात.