फ्रिज ही सध्या आपल्या सगळ्यांसाठीच किचनमधली (Kitchen Tips) एक अत्यावश्यक गोष्ट झाली आहे. भाजीपाला, फळे, दुग्धजन्य पदार्थ, उरलेले अन्नपदार्थ आणि अगदी सुकामेवा किंवा वेगवेगळे मसाले, पीठे ठेवण्याचे अतिशय उत्तम ठिकाण म्हणजे फ्रिज (Fridge). एकदा गोष्ट फ्रिजमध्ये ठेवली की ती खराब होणार नाही याबाबत आपण निश्चिंत असतो आणि त्यामुळे अनेकदा आपले स्वयंपाकाचे कामही खूप सोपे होते. दुसऱ्यादिवशी करायच्या एखाद्या पदार्थाची तयारी, पाहुणे येणार असतील तर त्यांच्यासाठी करायचे काही अशा एक ना अनेक बाबतीत फ्रिज आपल्याला अतिशय मोलाची साथ देत असतो. पण सतत ज्या फ्रिजचा आपण वापर करत असतो तो फ्रिज साफही (Fridge cleaning Tips) असायला हवा ना. अन्नपदार्थ, भाजीपाला यांसारख्या गोष्टींमुळे कधी फ्रिजमध्ये वास येतो तर कधी फ्रिजमध्ये डाग पडतात. पण नियमितपणे सोप्या पद्धतीने फ्रिज साफ केला तर आपल्यालाही छान वाटते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आरोग्यासाठी ते अतिशय चांगले असते. वीकेंडच्या महत्त्वाच्या कामांपैकी एक असलेल्या फ्रिज साफ करण्याचे काम सोपे व्हावे यासाठी सोप्या टिप्स...
१. फ्रिज साफ करण्याआधी तो पूर्णपणे रिकामा करा. फळे, भाज्या आणि इतर गोष्टी पेपरवर हवेशीर ठिकाणी काही वेळासाठी पसरवून ठेवा. त्यामुळे या वस्तूंनाही काही वेळासाठी बाहेरची मोकळी हवा मिळेल.
२. फ्रिजचे बटण स्विच ऑफ करुन तो डिफ्रॉज करा. यानंतर फ्रिजच्या खाली एक मोठे फडके घाला. म्हणजे पाणी आले तरी फरशी खराब होणार नाही.
३. आता फ्रिजमधील सर्वप्रकारचे ट्रे बाहेर काढून बाथरुममध्ये नेऊन साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवा. उन्हात किंवा मोकळ्या जागेत हे ट्रे वाळत घाला.
४. फ्रिज जास्त दिवस साफ न केल्याने किंवा इतर कारणांनी त्यामध्ये एकप्रकारचा वास येऊ शकतो. त्यामुळे बेकिंग सोड्यामध्ये लिंबू पिळून या मिश्रणाने फ्रिज स्वच्छ पुसून घ्या. त्यामुळे फ्रिजची दारे किंवा आतील भाग एकदम चकचकीत होतो आणि वास जाण्यास मदत होते.
५. फ्रिज साफ करण्यासाठी किंवा त्याच्या आतमध्ये पडलेले डाग घालवण्यासाठी थोडे कोमट पाणी घेऊन त्यामध्ये थोडे मीठ घाला. या एक साधेसे कापड घेऊन मीठाच्या पाण्याने फ्रिज पुसल्यास फ्रिज एकदम छान साफ होण्यास मदत होते.
६. जास्त डाग पडलेले असल्यास तुम्ही लिक्विड सोपचाही वापर करु शकता. मात्र फ्रिज पुसून झाल्यानंतर त्याचा दरवाजा साधारण एक तासांसाठी पूर्ण उघडा ठेवा आणि त्याला हवा लागू दया. त्यानंतर फ्रिज सुरू करुन त्याचे दार लावा. किमान १५ ते २० मिनिटांनंतर सगळे ट्रे त्यामध्ये लावून बाहेर काढलेली एक एक वस्तू व्यवस्थितपणे ठेवा. यामुळे तुम्हाला एकदम स्वच्छ आणि छान वाटेल.