आपल्यातील बहुतांश जण सध्या कॉम्प्युटरवरचे काम करतात. सकाळी ९ किंवा १० वाजता सुरु झालेला दिवस संध्याकाळी ७ किंवा ८ कधी कधी त्याहून उशीरा संपतो. इतके तास सलग एकाच पोझिशनमध्ये बसून आपले शरीर दुखायला लागते. दिवसा आपल्याला हे फारसे जाणवत नाही. पण रात्री पाठ टेकवली की आणि सकाळी झोपेतून उठताना स्नायूंना आलेला ताण आपल्याला जाणवल्याशिवाय राहत नाही. आता नोकरी करतो आणि त्याचा पगार मिळतो म्हटल्यावर लॅपटॉपवर बसून काम कऱण्याला पर्याय नाही. पण अशाप्रकारे सतत अंगदुखी होणेही चांगले नाही. सुरुवातीला थोड्या प्रमाणात उद्भवणारी ही अंगदुखी कालांतराने वाढत जाते आणि ती कमी होण्यासाठी काय करावे हे आपल्याला काही केल्या कळत नाही. घरातली कामे, स्वयंपाक, बाहेरची कामे आणि ऑफीस या सगळ्या धावपळीत आपल्याला व्यायामाला वेळ मिळतोच असे नाही. पण मग ही अंगदुखी होऊ नये म्हणून कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची याविषयी...
१. बसण्याची स्थिती तपासा
आपल्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरची जागा आणि आपली बसण्याची जागा योग्य आहे की नाही हे तपासा. आपली मान, हात यांना काही वेळाने अवघडल्यासारखे होत असेल तर आपली खुर्ची, स्क्रीन यांची व्यवस्था थोडी बदलून बघा. अनेकदा मान खूप खाली किंवा वर राहत असल्यानेही मानेचे दुखणे सुरू होते. इतकेच नाही तर खुर्चीची ठेवण योग्य नसेल तर आपले पायही जमिनीला टेकत नाहीत आणि पाठही मागे टेकलेली राहत नाही. त्यामुळे पाठीचे आणि पायांचे दुखणे सुरू होते. म्हणून आपण काम करत असलेली स्स्टीम आणि बसण्याची पद्धत योग्य आहे ना हे तपासून घ्या.
२. स्ट्रेचिंग करा
ठराविक वेळाने जागेवरुन उठून स्ट्रेचिंग करा. सध्या आपल्यातील अनेक जण घरातून काम करता. किंवा ऑफीसमध्ये जात असतील तरीही तासनतास एकाच जागेवर बसल्याने शरीर अवघडते. कामाचा व्याप जास्त असला तर आपल्याला खायचे- प्यायचेही भान राहत नाही. असे असले तरी आपले शरीर चांगले असेल तरच आपण काम करु शकतो. त्यामुळे काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. त्यामुळे ठराविक काळाने जागेवरुन उठून किंवा बसल्या बसल्या सोपी स्ट्रेचिंग आवर्जून करा. त्यामुळे आखडलेले स्नायू मोकळे होण्यास मदत होईल.
३. किमान व्यायाम
आपण कितीही धावपळीत असलो तरी खाणे, आंघोळ करुन स्वत:चे आवरणे या गोष्टी ज्याप्रमाणे नित्यनेमाने करतो. त्याचप्रमाणे आठवड्याच्या सात दिवसांपैकी किमान ३ ते ४ दिवस तरी व्यायाम करा. हा व्यायाम चालणे, स्ट्रेचिंग, सूर्यनमस्कार, योगा अशा कोणत्याही स्वरुपाचा असेल. त्यासाठी दिवसातून २० मिनीटे नक्की काढा.
४. मसाज
मसाज घेणे ही काहीतरी फार मोठी गोष्ट आहे असे आपल्यातील अनेकांना वाटते. पण आखडलेले स्नायू मोकळे होण्यासाठी मसाज गरजेचा असतो. त्यामुळे महिन्यातून एकदा तुम्ही तज्ज्ञ व्यक्तीकडून मसाज नक्की घेऊ शकता. आयुर्वेद आणि निसर्गोपचार यांमध्ये मसाजला विशेष महत्त्व असून त्यामुळे शरीर मोकळे होण्यास मदत होते. हा मसाज तेलाचा, गरम वाफेचा किंवा मातीचा असा विविध प्रकारचा असतो. आपल्या शरीराला कोणत्या प्रकारचा मसाज गरजेचा आहे याबाबत योग्य ती माहिती घेऊन मसाज घ्यायला हरकत नाही.