सणसमारंभ म्हटले की गोडधोड, तळलेले पदार्थ ओघानेच पानात येतात. या दिवशी सुट्टी असल्याने आपणही दणकून जेवतो. कुटुंबातील सगळे जण किंवा मित्रमंडळी एकत्र असल्यानेही नेहमीपेक्षा ४ घास जास्तच खाल्ले जातात. गणपती बाप्पा येणार म्हटल्यावर काही वेळा नेहमीची जेवणाची वेळही टळून जाते. या सगळ्या गोष्टींचा आपल्या पचनशक्तीवर वाईट परीणाम होतो. कधी आपल्याला अपचन झाल्यासारखं होतं तर कधी अॅसिडीटी आणि गॅसेसमुळे आपण हैराण होतो. पोट ठिक नसले की आपण अस्वस्थ होऊन जातो आणि काय करायचे ते आपल्याला कळत नाही. आपला मूड फ्रेश राहण्यासाठीही आपले पोट साफ असणे गरजेचे असते. पण तुम्हाला पचनाशी निगडीत तक्रारी असतील तर काय करावे याबाबत प्रसिद्ध आहारतज्ज्ञ लवनीत बत्रा काही महत्त्वाच्या टिप्स सांगतात. यामध्ये त्या ५ औषधी वनस्पतींची माहिती देतात, ज्या वनस्पती पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी उपयुक्त आहेत (Effective Herbs Shared by Lavneet Batra for Digestive Problems).
१. त्रिफळा
त्रिफळा हे तीन वनस्पतींचे मिश्रण असते. यामध्ये आवळा, बिभितकी आणि हरीतकी यांचा समावेश असतो. बिभितकी आणि हरीतकी या पचनक्रिया सुरळीत होण्यास अतिशय उपयुक्त अशा वनस्पती आहेत. तर आवळा पोटातील अॅसिड नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त असतात.
२. ज्येष्ठमध
ही आयुर्वेदातील एक अतिशय उपयुक्त अशी वनस्पती आहे. पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी आणि पोटाला आराम मिळण्यासाठी ज्येष्ठमध अतिशय फायदेशीर ठरतो. यामध्ये असणारे घटक पोटातील आम्ल नियंत्रणात ठेवण्याचे आणि पचन सुधरवण्याचे काम करतात.
३. पुदिना
पुदिन्यामध्ये मेन्थॉल नावाचा एक घटक असतो जो पचनक्रियेतील अडथळे दूर करण्यास उपयुक्त ठरतो. पचनक्रियेत सहभागी असणाऱ्या स्नायूंना आराम मिळावा यासाठी पुदिना फायदेशीर असतो.
४. आलं
आल्यामध्ये असणारे जिंजेरॉल आणि शोगाल्स हे घटक पोटाचे आकुंचन आणि प्रसरण होण्यास उपयुक्त ठरतात. मळमळ होणे, गॅसेस, पायात पेटके येणे, सूज येणे यांसारख्या समस्यांवर आले अतिशय फायदेशीर ठरते.
५. कोरफड
कोरफड ही नैसर्गिक लॅक्सिटीव्ह म्हणून ओळखली जाते. पचन मार्गात आलेली सूज कमी कऱण्यासाठीही कोरफडीचा अतिशय चांगला उपयोग होतो. कोरफड आरोग्याच्या तसेच सौंदर्याच्या बऱ्याच तक्रारींवर उपयुक्त असणारी एक अतिशय महत्त्वाची औषधी वनस्पती आहे.