Join us   

अमेरिकन प्रिव्हेन्टीव टास्क फोर्स सांगतेय ॲस्पिरिनचे साइड इफेक्टस; तुम्हीही सर्रास ही गोळी घेता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2021 4:01 PM

संशोधनामुळे सतत नवनवीन गोष्टी समोर येत असतात. याआधी आरोग्याच्या काही तक्रारींवर उपयुक्त असलेले औषध इतर बाबतीत मात्र धोक्याचे ठरु शकत असल्याचे नुसकतेच समोर आले आहे. भारतात सर्रासपणे घेतली जाणारी अॅस्पिरीनच्या औषधाविषयी...

ठळक मुद्दे पेनकीलर आणि रक्त पातळ करणारे हे औषध काहीसे धोकादायक असल्याचा अभ्यास एक समस्या दूर करताना दुसरी उद्भवायला नको

आपल्याला भविष्यात काही होऊ नये म्हणून घाबरणारे आणि डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेणारे अनेक जण असतात. हृदयाशी संबंधित आजार उद्भवू नयेत म्हणून डॉक्टरही काही रुग्णांना काही औषधे लिहून देतात आणि नियमितपणे घ्यायला सांगतात. अॅ‍स्पिरिन ही अशीच एक गोळी आहे. मधुमेह, रक्तदाब यांसारख्या समस्या असणाऱ्या रुग्णांना डॉक्टरांकडून ही गोळी घेण्यास सांगितले जाते. तर काही वेळा रुग्ण स्वत:हूनच आपल्या तुटपुंज्या माहितीवर मेडिकलमध्ये जाऊन गोळी आणतात आणि घेतात. मात्र अॅ‍स्पिरिन ही गोळी आरोग्याच्या इतर समस्यांसाठी घातक ठरु शकते असे नुकतेच समोर आले आहे. ज्यांना आतापर्यंत एकदाही हार्ट अॅटॅक किंवा स्ट्रोक आलेला नाही त्यांनी ही गोळी घेण्याची आवश्यकता नसल्याचे अमेरिकेच्या प्रिव्हेंटीव्ह टास्क फोर्सने सांगितले आहे. 

( Image : Google)

याबाबतचा एक ड्राफ्ट सदर यंत्रणेने नुकताच तयार केला असून त्यात त्यांनी या गोळीबद्दल नव्याने माहिती दिली आहे. याआधी अॅ‍स्पिरिन ही गोळी ५० ते ६० वर्षाच्या वयाचे लोक नियमितपणे घेऊ शकतात असे म्हटले होते. मात्र तसे नसून ज्यांना आधी हार्ट अॅटॅक किंवा स्ट्रोकचा त्रास झालेला नाही अशांनी ही गोळी जास्त प्रमाणात घेतल्यास त्यांना धोका निर्माण होऊ शकतो असे या नवीन ड्राफ्टमध्ये म्हणण्यात आले आहे. अॅ‍स्पिरिन हे औषध पेन किलर म्हणून उपयोगी आहे. या औषधामुळे रक्त पातळ होत असून त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे रक्तवाहिन्या मोकळ्या राहून हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण कमी होते. 

( Image : Google)

असे असले तरीही या औषधाचे काही तोटे असल्याचे नुकतेच समोर आले आहे, त्यामुळे तुम्ही नियमितपणे हे औषध घेत असाल तर तुमच्या तज्ज्ञांशी याबाबत चर्चा करणे गरजेचे आहे. अॅ‍स्पिरिन औषधामुळे रक्तस्त्रावाचा धोका वाढत असल्याचे त्यांनी आपल्या नवीन ड्राफ्टमध्ये म्हटले आहे. ज्यांना रक्तदाब, मधुमेह, कोलेस्टेरॉल, लठ्ठपणा यांसारखे आजार आहेत त्यांच्यासाठी ही नवी गाईडलाइन अतिशय महत्त्वाची आहे. वय वाढते त्याप्रमाणे ही गोळी घेणाऱ्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे ही गोळी घेणाऱ्यांनी डॉक्टरांचा वेळीच सल्ला घेणे आवश्यक आहे असेही यामध्ये म्हणण्यात आले आहे. अॅ‍स्पिरिनची गोळी हार्ट अॅटॅकशिवाय काही प्रकारच्या कॅन्सरमध्येही उपयुक्त ठरत असल्याचे याआधी म्हणण्यात येत होते, मात्र आता रुग्णांनी ही गोळी वैद्यकीय तज्ज्ञांच्या मदतीने घ्यायला हवी.      

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सऔषधं