सकाळी घरातील सगळ्यांचे करता करता अनेकदा बायकांना खायलाही वेळ होत नाही. मग कधी मुलांना खायला भरवताना, तर कधी स्वयंपाक करता करता काहीतरी खाल्ले जाते. नवऱ्याची ऑफीसला जायची घाई, त्याचा डबा, मुलांची शाळेची घाई, घरातील ज्येष्ठांचा नाश्ता-पाणी आणि इतर कामे करुन ऑफीसला जायच्या घाईत नाश्त्याला म्हणावे तितके महत्त्व दिले जात नाही. मग पटकन काहीतरी खाल्ले जाते आणि सगळे आवरले की घरातून बाहेर पडताना आंघोळ केली जाते. पण घाईघाईत तुम्ही असे करत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही हे वेळीच लक्षात घ्या. पूर्वी झोपेतून उठल्यावर पारोशी कामे, मग आंघोळ आणि मग नाश्ता, स्वयंपाक ही कामे केली जात. पण आता जशा महिला नोकरीसाठी घराबाहेर पडायला लागल्या तशा बऱ्याच गोष्टी बदलल्या. नाश्ता झाल्यावर आंघोळ केल्याने शरीरावर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात.
१. खाल्ल्यानंतर आंघोळ केल्यामुळे शरीराचे तापमान कमी होते. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शरीराच्या अन्नपचनाशी संबंधित नसलेल्या म्हणजेच हात, पाय, चेहरा या भागातील रक्तप्रवाह वाढतो, त्यामुळे अस्वस्थता वाटू शकते.
२. पोटाच्या भागातील रक्त अन्न पचनासाठी काम करत असते. पण आंघोळ केल्यामुळे शरीराचे तापमान कमी होते आणि हे रक्त शरीराच्या इतर भागात वाहू लागते. त्यामुळे अन्नपचनात अडथळे येतात आणि अन्नपचन क्रिया योग्यरितीने होत नाही.
३. नाश्ता झाल्यावर गरम पाण्याने आंघोळ केल्यास रक्तप्रवाह पोट सोडून इतर भागांमध्ये जातो आणि रक्त शरीराच्या इतर कामांसाठी वापरले जाते. त्यामुळे काहीवेळा मेंदूला रक्तपुरवठा कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे कधीतरी आंघोळीनंतर चक्कर आल्यासारखे वाटू शकते.
४. खाल्ल्यानंतर त्याची पचनक्रिया होण्यासाठी शरीराला पुरेसा कालावधी देणे आवश्यक असते. त्यामुळे खाल्ल्यानंतर लगेच व्यायाम करु नये, लगेच झोपू नये किंवा कष्टाची कामेही करु नयेत असे म्हटले जाते त्याला हेच कारण आहे.
५. जेवणानंतर शरीरातील अग्नि सक्रीय होतो, त्यानंतर लगेचच आपण अंगावर पाणी घेतल्याने हा अग्नी मंद होतो आणि अन्नपचनाच्या क्रियेत अडथळा येतो. अन्नाचे योग्य पद्धतीने पचन न झाल्यास पचनाच्या आणि पर्यायाने आरोग्याच्या तक्रारी उद्भवतात.
६. जेवणानंतर आंघोळ केल्याने शरीरावर ताण येण्याची शक्यता असते. भरलेल्या पोटी अंगावर पाणी पडल्याने उलट प्रतिक्रिया होऊ शकते. त्यामुळे कार्डिअॅक अरेस्टचाही धोका उद्भवू शकतो.
७. खाल्ल्यानंतर साधारण दिड ते दोन तास आंघोळ करु नये अन्यथा अॅसिडीटी, लठ्ठपणा, अपचन यांसारख्या तक्रारी उद्भवतात.