Join us   

न धुता, वारंवार एकच मास्क वापरताय? खराब मास्क वापरणं अत्यंत घातक, मास्क धुण्याची सोपी पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2022 4:36 PM

कोणते मास्क कधी धुवायला हवे, कसे धुवावे याविषयी...

ठळक मुद्दे न धुतलेले मास्क वापरल्याने कोणते त्रास उद्भवतात...मास्क धुण्याची योग्य पद्धत कोणती? जाणून घेणे महत्त्वाचे...

कोरोनाचा धोका टळला आणि सगळे सुरळीत सुरू झाले असे वाटत असतानाच पुन्हा ओमिक्रॉन या कोरोनाच्या नवीन विषाणूमुळे पुन्हा एकदा या संसर्गाची धास्ती वाढल्याचे चित्र आहे. पुन्हा लॉकडाउन लागणार का, गर्दीवर निर्बंध येणार का यांसारखे प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात आहेत. बाकी काहीही असले तरी आपण आपली योग्य ती काळजी घेणे आपल्या हातात आहे. त्यामुळे त्या बाबतीत तरी दुर्लक्ष करुन चालणार नाही. या काळजीपैकी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण वापरत असलेले मास्क. हे मास्क आता आपल्या अत्यावश्यक गोष्टींपैकी एक झाले आहे. आपण घरातून बाहेर पडताना ज्याप्रमाणे मोबाइल, चावी, रुमाल, डबा घेतला का हे तपासतो, त्याचप्रमाणे आता मास्क घेतले का हे न चुकता तपासतो. इतकेच नाही, तर मास्क खराब झाले, तुटले किंवा कुठे विसरले तर पंचाईत होऊ नये म्हणून आपण आणखी दोन जास्तीचे मास्क आपल्या पर्समध्ये किंवा बॅगमध्ये आवर्जून ठेवतो. 

अनेकींना मास्कमुळे लिपस्टीक लावता येत नसल्याचे दु:ख असले तरी मास्कच्या आतही लिपस्टीक लावणाऱ्या अनेक महिला आहेत. या लिपस्टीकमुळे, गाडीवरुन जाताना उडालेल्या धुळीने, कधी शिंका किंवा खोकला आला की, सर्दी झाली असेल तर किंवा अगदी थंडीच्या दिवसांत गारठ्यामुळे नाकातून पाणी आले तर हे मास्क खराब होते. पण गडबडीत आपण हे खराब झालेले मास्क वापरत राहतो. मास्क वारंवार धुवायला हवे किंवा जास्तच खराब झाले असेल तर बदलायला हवे हे आपण विसरतो. मात्र अशाप्रकारे खराब झालेले मास्क वापरल्याने आरोग्याला वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. एकीकडे कोरोनापासून वाटण्यासाठी आपण मास्क वापरत असताना या खराब झालेल्या मास्कमुळे आरोग्याला दुसऱ्याच समस्या उद्भवतील असे व्हायला नको. 

(Image : Google)

खराब मास्क वापरल्यास उद्भवणाऱ्या तक्रारी

१. आपल्यापैकी अनेकजण वापरत असलेला मास्क हे वेगवेगळ्या प्रकारच्या कापडांचे असतात. या मास्कच्या छिद्रांमध्ये घाण अडकते. असेच घाण अडकलेले मास्क वारंवार वापरत राहिल्यास आपल्याला कमी ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो आणि श्वसनाच्या तक्रारी उद्भवण्याची शक्यता वाढते. त्यामुळे ठराविक काळानंतर मास्क बदलणे किंवा धुणे आवश्यक आहे. 

२. अस्वच्छ मास्कमुळे घसा खवखवण्याची समस्या उद्भवू शकते. मास्कमध्ये अडकलेले धुलीकण श्वास घेताना किंवा बोलताना आपल्या घशात जातात. हे कण घशात चिकटून राहिल्याने घसा खराब होण्याची शक्यता असते. यामध्ये खोकला येणे, घशाला खाज सुटल्यासारखे वाटणे, घसा खवखवणे. घसा दुखणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे मास्क वेळच्या वेळी धुतलेला केव्हाही चांगला. 

३. मास्क जास्त काळ वापरल्यास त्यातील धुलीकण पोटात जातात. त्यामुळे पोट खराब होण्याचीही शक्यता असते. आपण दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी फिरतो, तेथील घाण मास्कला लागते आणि ती श्वासावाटे पोटात जाते. ही घाण शरीरासाठी घातक असल्याने पोटदुखी किंवा पोट खराब होण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे स्वच्छ मास्क वापरणे आरोग्यासाठी चांगले असते.  

कोणत्या प्रकारचे मास्क कधी धुवावे...

१. कापडाचा मास्क हा काही काळानंतर खराब होतो. त्यामुळे हा मास्क साधारणपणे ३ महिनेच वापरावा. त्यानंतर तो बाद करावा. अनेकदा आपल्या मास्कचे इलॅस्टीकही खराब झालेले असते, त्यामुळे मास्क खाली घसरते. पण घाईत आपण पहिले मास्क बाद करुन नवीन मास्क घेणे विसरतो आणि तेच मास्क दिवसेंदिवस वापरत राहतो. मात्र असे करणे चुकीचे आहे. 

२. तुम्ही एन ९५ हे वैद्यकीय मास्क वापरत असाल तर निश्चितच ती चांगली गोष्ट आहे. या मास्कमुळे तुमचे जास्त चांगल्या पद्धतीने संरक्षण होते. असे असले तरीही हे मास्कही ठराविक काळाने खराब होतेच. त्यामुळे हे मास्कही जास्तीत जास्त २ महिन्यांपर्यंतच वापरावे. 

३. तसेच तुम्ही सर्जिकल थ्री लेयर मास्क वापरत असाल तर ते दर तीन ते चार तासांनी बदलायला हवे. आपण चांगले म्हणून हे मास्क घेतो. पण ते ठराविक काळच वापरायचे असते हे आपल्याला माहित नसते. त्यामुळे आपण कित्येक दिवस आणि आठवडे हेच मास्क वापरत राहतो पण तसे करणे चुकीचे असून ते आरोग्यासाठी योग्य नसते. 

(Image : Google)

मास्क धुण्याची योग्य पद्धत कोणती? 

- मास्क काळे झाले किंवा खराब झाले की आपण ते धुवायला घेतो. अनेकदा आपण ते इतर कपड्यांबरोबर भिजवतो किंवा मशीनला लावतो. पण असे करणे योग्य नाही. त्यामुळे मास्कमध्ये असलेले विषाणू सर्वत्र पसरतात. तसेच इतर कपड्यांचा मळ मास्कला लागू शकतो. त्यामुळे मास्क वेगळे ठेऊन वेगळे धुणे गरजेचे आहे.  

- मास्क इतर कपड्यांप्रमाणे साध्या पाण्याने साबण लावून ब्रशने घासून धुवायला हवे असा आपला समज असतो. त्यामुळे आपण मास्कचे कापड साबण लावून घासतो. पण तसे करणे योग्य नाही. मग मास्क धुण्याची योग्य पद्धत कोणती? 

- मास्क स्वच्छ होण्यासाठी १० मिनीटे गरम पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर साबण लावून मास्क साफ करा. त्यानंतर धुतलेले मास्क इतर कपड्यांप्रमाणे वाळत न घालता ते कडक उन्हात वाळत घाला. वाळल्यानंतर हे मास्क घरात अशा ठिकाणी ठेवा ज्याठिकाणी आपला किंवा इतर कोणाचाही सतत हात लागणार नाही.    

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सस्वच्छता टिप्स