ज्याच्या जीवावर आपण दिवसभर उभे असतो, इकडून तिकडे धावत असतो ते पाय ठणकायला लागले की काय करावे कळत नाही. दिवसभराच्या धावपळीत पाय दुखतात हे अनेकदा लक्षातही येत नाही पण रात्री पाठ टेकली की आणि सकाळी झोपेतून उठताना हे पाय ठणकायला लागतात. मग कोणीतरी पाय चेपून द्यावेत, पायावर बसावे किंवा पाय द्यावेत असे वाटते आणि आपण घरातील कोणाला तरी तसे करायलाही सांगतो. विशेषत: महिलांच्या बाबतीत पाय दुखण्याची ही समस्या सर्रास आढळते. पाय दुखण्याची वेगवेगळी कारणे असतील तरी प्रामुख्याने सततचे उभे राहून काम, अपुरी झोप, लठ्ठपणा, चुकीच्या चप्पल वापरणे, पाणी कमी पिणे आणि जीवनसत्त्वांची कमतरता ही यामागील प्रमुख कारणे असल्याचे दिसते. अनेकदा दिवसभर खुर्चीत बसून काम असल्याने पाय तरंगलेले राहतात. त्यातही उंची कमी असेल तर आणखीनच अडचण होते. त्यामुळे शरीराचा संपूर्ण भार पेलणाऱ्या पायांची योग्य ती काळजी घ्यायला हवी. पाय दुखले म्हणून पेनकिलर घेणे सोपे आहे, पण हा उपाय योग्य नाही. पाय दुखू नयेत म्हणून कायमस्वरुपी काही उपाय करता येतात का हे पाहणे आवश्यक आहे. सध्या पायदुखीवर त्वरीत आराम मिळावा यासाठी कोणते उपाय करायचे ते पाहूया....
१. मीठाच्या पाण्यात पाय बुडवून ठेवणे
पायदुखी कमी करण्यासाठी आणि रिलॅक्सेशनसाठी मीठाच्या पाण्यात पाय बुडवून ठेवणे अतिशय उपयुक्त ठरते. एका टबात कोमट पाणी घेऊन त्यात एक वाटीभर मीठ घालावे. पाणी थोडे गरम असल्याने मीठ लगेच विरघळते. या गरम पाण्यात अर्धा ते पाऊण तास पाय बुडवून ठेवावेत. त्यामुळे पायाला चांगलाच आराम मिळतो.
२. तेलाने मसाज
अनेकदा पाय दुखत असले की आपण रात्री झोपताना पायांना तेलाने रगडून मसाज करतो. पण त्यामुळे पाय तात्पुरते दुखायचे थांबतात आणि काही वेळाने पुन्हा दुखायला लागतात. त्यामुळे मसाज करण्यापेक्षा हाताला तेल लावून पायाचे ठराविक प्रेशर पॉईंटस दाबल्यास पायांना आराम मिळण्यास मदत होते. खालून वर आणि वरुन खाली बोटांनी पाय दाबल्यास लगेचच आराम मिळण्यास मदत होते आणि तुम्हाला रिलॅक्स वाटू शकते.
३. स्ट्रेचिंग
स्ट्रेचिंग हा कोणत्याही दुखण्यावर उत्तम उपाय ठरु शकतो. आपण नसांना ताण न दिल्यामुळे त्या आखडतात आणि दुखतात. मात्र जेव्हा आपण त्यांना ताण देतो तेव्हा त्या मोकळ्या होतात आणि आपल्याला बरे वाटते. पायदुखीसाठीही काही ठराविक प्रकारचे स्ट्रेचिंग केल्यास त्याचा आपल्याला चांगलाच फायदा होतो. जमिनीवर पाठ टेकवून झोपा, पाय भिंतीला वरच्या दिशेने शरीराच्या काटकोनात टेकवून ठेवा. या पोझिशनमध्ये ८ ते १० मिनिटे राहील्याने पायांचा रक्तप्रवाह उलट्या बाजूने होतो आणि पाय दुखणे कमी होते. याच पोझिशनमध्ये पाय गुडघ्यामध्ये वाकवून झोपल्यानेही बरे वाटते. या स्थितीत तुमचा मणका जमिनीवर सरळ रेषेत असेल याची काळजी घ्या.
४. चालण्याचा व्यायाम
अनेकदा लठ्ठपणामुळे आपल्या वजनाचा भार आपल्या पायांवर येतो. त्यामुळे पाय दुखतात. मात्र चालण्यामुळे वजन कमी होण्यास मदत होतेच तर पण पायदुखी कमी होण्यासही मदत होते. याबरोबरच वेळच्या वेळी योग्य तेच जेवणे आवश्यक असल्याचे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे वजन तर वाढत नाहीच पण पायदुखीही कमी होण्यास मदत होते.
५. ताणरहित जीवन
सततचा ताणतणाव, वेगवेगळ्या गोष्टींचे टेन्शन आणि विचार यामुळेही अंग आणि पायदुखीची समस्या उद्भवू शकते. ताणामुळे अपुरी झोप आणि त्यामुळे शरीराला आवश्यक तो आराम न मिळाल्याने पायदुखीची समस्या उद्भवते. त्यामुळे कोणत्याही गोष्टींचा ताण येणार नाही याची काळजी घ्यायला हवी. तुम्ही ताणात असाल तर त्याचा परिणाम नकळत तुमच्या शरीरावर होतो आणि वेगवेगळ्या दुखण्यांच्या माध्यमातून तो समोर येतो.