शरीरातील बहुतेक रोगांची सुरुवात पोट खराब होण्यापासून होते. जर तुमचे पोट नेहमी खराब असेल तर तुम्हाला बद्धकोष्ठता, गॅस, मूळव्याध, जुलाब, वजन कमी होणे, वजन वाढणे, ऍसिडिटी यांसारख्या समस्या उद्भवतात. बद्धकोष्ठता प्रामुख्याने वातदोषाच्या असंतुलनामुळे होते. याची अनेक कारणे असू शकतात, ज्यामध्ये मन लावून न खाणे, कोरडे, थंड, मसालेदार, तळलेले आणि फास्ट फूडचे अतिसेवन, पुरेसे पाणी न पिणे, अन्नामध्ये कमी फायबर, खराब चयापचय, झोप न लागणे, रात्री उशिरापर्यंत खाणे इ. गोष्टींचा समावेश असतो. अधूनमधून बद्धकोष्ठता होणं सामान्य असले तरी हा त्रास जास्त प्रमाणात झाला तर मात्र आपल्याला अस्वस्थ व्हायला लागते. तसेच यावर वेळीच योग्य उपचार मिळत नसतील तर इतर समस्या निर्माण होण्याचा धोका वाढतो (Doctor Suggest Best Ayurvedic Home Remedy For Constipation Problem).
पोट स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी अनेक उपाय असतात. वैद्यकशास्त्रात पोटाशी संबंधित सर्व समस्यांवर वेगवेगळे उपचार आणि औषधे आहेत. पण जर तुम्हाला पोटाच्या समस्या क्षणार्धात दूर करायच्या असतील तर तुम्ही पोट निरोगी ठेवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय देखील करून पाहू शकता. आयुर्वेदीक उपचारांमुळे साईड इफेक्टस होण्याची शक्यता नसल्याने अनेक जण हे उपाय करणे पसंत करतात. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. कपिल त्यागी सांगतात, दिवसभर एका जागी एकाच पोझिशनमध्ये बसल्याने बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टीपेशनची समस्या उद्भवते. अशावेळी संडासला त्रास होणे, संडास कडक होणे, एक दिवसाआड पोट साफ होणे अशा समस्या उद्भवतात.
यासाठी नियमित व्यायाम करणे आणि आहार उत्तम असणे महत्त्वाचे आहे. मात्र तुम्हाला नियमितपणे अशी समस्या भेडसावत असेल तर आपण गरम पाणी आणि तूप यांचे सेवन करायला हवे. रात्री झोपताना गरम पाण्यात चमचाभर तूप टाकून घेतल्यास हा त्रास दूर होण्यास मदत होते. तूपामुळे आपल्या पचनसंस्थेला वंगण मिळते आणि त्यामुळे पोट साफ होण्याची क्रिया सोपी होते. तसेच गरम पाण्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. हा कॉन्स्टीपेशनसाठी सर्वात सोपा आयुर्वेदिक उपाय आहे. याशिवाय गरम पाणी आणि तूप यांच्या सेवनाने पचनाशी निगडीत बऱ्याच तक्रारी दूर होतात, त्यामुळे त्वचाही ग्लो करण्यास मदत होते.