Health Tips : शुगर म्हणजेच साखरेचा वापर रोज सगळ्याच घरांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो. आरोग्याची काळजी घेणारे लोक साखर कमी खातात, तर जास्तीत जास्त लोक जास्त खातात. मग ती चहाच्या माध्यमातून असो वा गोड पदार्थांच्या माध्यमातून असो. आपण नेहमीच ऐकतो की, साखर जास्त खाल्ल्यानं वेगवेगळ्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. पण तरीही लोकांना साखर खाण्याची सवय झालेली असते. इथे साखरेचा अर्थ केवळ साखर नाही तर वेगवेगळे गोड पदार्थ असा आहे. जेवढी जास्त साखर खाल तेवढा टाइप २ डायबिटीस, लठ्ठपणा, हृदरोग, त्वचे विकारांचा धोका वाढतो. त्यामुळे साखर कमी खाल्ली पाहिजे. जर तुम्ही काही दिवस साखर खाणं पूर्णपणे बंद केलं तर आरोग्याला इतके फायदे मिळतील ज्यांची तुम्ही कल्पनाही केली नसेल. अशात २ आठवडे म्हणजे १४ दिवस साखर खाणं बंद केलं तर काय होईल हे जाणून घेऊ.
१४ दिवस साखर न खाण्याचे फायदे
अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये Gastroenterologist असलेले डॉक्टर सौरभ सेठी (Dr. Saurabh Sethi) यांनी एका व्हिडिओद्वारे साखर न खाण्याच्या फायद्यांबाबत माहिती दिली आहे.
पोटावरील चरबी होईल कमी
डॉक्टरांनी सांगितलं की, तुम्ही जर केवळ १४ दिवसांसाठी साखर खाणं बंद केलं तर तुमच्या पोटावर वाढलेली चरबी कमी करण्यास मदत मिळेल. इतकंच नाही तर लिव्हरवर जमा झालेली चरबी देखील साखर खाणं बंद केल्यावर कमी होईल.
पोट चांगलं राहील
तुम्ही जर १४ दिवसांसाठी साखर खाणं बंद केल तर तुमच्या आतड्यांचं आरोग्य चांगलं राहतं. साखर खाणं सोडल्यानं हेल्दी बॅक्टेरिया रीस्टोर होतात, ज्यामुळे पोटाचं आरोग्य चांगलं राहतं.
अॅक्ने होतील दूर
जर साखरेला रोजच्या आहारातून बाहेर काढलं तर चेहऱ्यावरील अॅक्ने किंवा रेड स्पॉट कमी होतात. त्यामुळे चेहरा आणखी फ्रेश आणि चमकदार दिसतो.
चेहऱ्याचा शेपही होईल नॅचरल
जर तुमच्या चेहऱ्यावर सर्कल दिसत असतील किंवा चेहऱ्यावर सूज आल्यासारखी वाटत असेल तर तुम्ही साखर खाणं लगेच बंद केलं पाहिजे. साखर खाणं बंद कराल तर चेहऱ्याचा शेप नॅचरल होईल.
एका दिवसात किती साखर खावी?
nhs.uk नुसार, वयस्कांनी एका दिवसात ३० ग्रॅमपेक्षा अधिक फ्री शुगर खाऊ नये. त्याशिवाय ७ ते १० वर्षाच्या मुलांनी रोज २४ ग्रॅम आणि ४ ते ६ वर्षाच्या मुलांनी १९ ग्रॅमपेक्षा अधिक साखर खाऊ नये.
एक चमचा साखरेमध्ये जवळपास २० कॅलरी असतात. जर तुम्ही जास्त साखर किंवा गोड खात असाल तर जास्त कॅलरी इनटेक करता. अशात तुमचं वजन वाढण्याची समस्या होऊ शकते.