Paracetamol Safety Tips: डोकं दुखत असेल, ताप आला असेल, अंगदुखी होत असेल किंवा सर्दी-पडसा झाला असेल जास्तीत जास्त लोक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घरीच पॅरासिटोमॉल घेऊन मोकळे होतात. भारतात तर या टॅबलेटचा खूप जास्त वापर बघायला मिळतो. लोकांच्या घरात किंवा बॅगमध्ये पॅरासिटोमॉल असतेच असते. पण त्यांना हे माहीत नाही की, पॅरासिटोमॉल खाऊन त्यांचं लिव्हर डॅमेज होऊ शकतं. सध्या सोशल मीडियावरही याची चांगलीच चर्चा रंगली आहे. अमेरिकन डॉक्टर पालानीअप्पन मनिकम यांनी एका पोस्टद्वारे सांगितलं की, भारतीय लोक डोलो ६५० म्हणजेच पॅरासिटोमॉल असलेली टॅबलेट लोक कॅडबरी किंवा जेम्ससारखे खातात. जे खूप घातक आहे.
देशातील प्रसिद्ध लिव्हर डॉक्टर शिवकुमार सरीन यांनी न्यूज एजन्सी ANI ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, प्रमाणापेक्षा जास्त पॅरासिटोमॉल खाल्ल्यानं लिव्हरचं नुकसान होऊ शकतं. नेहमी नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पॅरासिटोमॉल घेणं चांगली सवय नाही. अमेरिका आणि यूरोपमध्ये लिव्हर फेलिअरचं सगळ्यात मोठं कारण पॅरासिटोमॉल आहे. लिव्हरमध्ये ग्लूटाथिओन नावाचं तत्व असतं, जे त्याला डॅमेज होण्यापासून वाचवतं. ग्लूटाथिओनच पॅरासिटोमॉलला न्यूट्रिलाइज करतं आणि लिव्हरचं होणारं नुकसान टाळतं. जेव्हा एखादी व्यक्ती दारू पिते तेव्हा ग्लूटाथिओनचं प्रमाण कमी होतं. लठ्ठपणामुळे ग्लूटाथिओन कमी होतं. जर तुमच्या शरीरात ग्लूटाथिओनचं प्रमाण कमी असेल आणि अशा स्थितीत तुम्ही जास्त पॅरासिटोमॉल घेत असाल तर लिव्हर डॅमेज होऊ शकतं.
डॉक्टर सरीन म्हणाले की, पॅरासिटोमॉल घेण्याची एक क्षमता असते. जास्त प्रमाणात घ्याल तर लिव्हर नक्कीच खराब होईल. सामान्यपणे दिवसातून पॅरासिटोमॉलच्या २ ते ३ इतक्या टॅबलेट घ्याव्या. त्याऐवजी अर्धी अर्धी टॅबलेट ३ ते ४ वेळा घेऊ शकता. यानं लिव्हरचं नुकसान होणार नाही. पॅरासिटोमॉल केवळ तापाचं औषध नाहीये, ते एक पेनकिलर आहे. त्यामुळे याचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नये.
हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, जास्तीत जास्त औषधं आपल्या लिव्हरमध्ये मेटाबॉलाइज होतात. आपलं लिव्हर औषधं, केमिकल्स आणि इतर टॉक्सिन्सना सोडून शरीराच्या बाहेर काढतं. जेव्हा आपण कोणतंही औषध घेतो तेव्हा ते थेट लिव्हरमध्ये जाऊन मेटाबॉलिक प्रोसेसमधून जातं. त्यामुळे औषधं नेहमीच खाल्ली तर याचा लिव्हरवर अधिक दबाव पडतो. ज्यामुळे लिव्हर डॅमेज आणि हेपेटायटिस यांसारख्या समस्या होऊ शकतात.