Join us   

डॉक्टर सांगतात, तुमच्या मुलांचे डोळे आळशी होत आहेत! हा आजार नेमका काय असतो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2022 11:34 AM

मेंदू जेव्हा एका डोळ्याकडून येणाऱ्या सिग्नलकडे दुर्लक्ष करू लागतो तेव्हा कमी पाहण्याच्या लागलेल्या सवयीमुळे डोळा आळशी होतो.

ठळक मुद्दे जेवढे वय लहान तेवढाच हा विकार होण्याची शक्यता जास्त असते.वेळेत निदान झाल्यास वेळत उपचार केल्यास ही समस्या दूर होऊ शकते.

लहान मुलांमध्ये अनेकदा आळशी डोळा म्हणजे lazy eye किंवा (Amblyopia) झाला असे आपण ऐकतो. पण डोळा आळशी होतो म्हणजे नेमके काय होत? हा त्रास लहान मुलांनाच का होतो? तो होण्यामागची कारणे आणि उपचार या सगळ्याबाबत आपण आज जाणून घेणार आहोत. या सगळ्या गोष्टींची शास्त्रीय माहिती आपल्याला सांगत आहेत नेत्रतज्ज्ञ डॉ. ऐश्वर्या मुळे. मेंदू जेव्हा एका डोळ्याकडून येणाऱ्या सिग्नलकडे दुर्लक्ष करू लागतो तेव्हा कमी पाहण्याच्या लागलेल्या सवयीमुळे डोळा आळशी होतो. हा डोळा बऱ्याचदा दिसायला सामान्य असतो पण चष्मा देऊनही या डोळ्याच्या नजरेत सुधारणा होत नाही. आळशी डोळा हा विकार लहानपणीच होतो. लहान मुलांमध्ये दृष्टी तयार होण्याची प्रक्रिया नऊ वर्षापर्यंत होते. जेवढे वय लहान तेवढाच हा विकार होण्याची शक्यता जास्त असते.

(Image : Google)

डोळा आळशी होण्याची कारणे

१. तिरळेपणा  

२. दोन डोळयातील चष्म्याच्या नंबरमधील फरक

३. जन्मजात किंवा बालपणीचा मोतिबिंदू

४. बुबुळाची अपारदर्शकता

५. पापणी खचणे / पडणे 

डोळा आळशी होतो म्हणजे नेमके काय?

जेव्हा दोन डोळयांमधील चष्म्याच्या नंबरमध्ये फरक असतो तेव्हा जास्त नंबर असलेल्या डोळयाकडून अस्पष्ट प्रतिमा मेंदूकडे पाठविली जाते. तर तिरळेपणामध्ये एकाच वस्तूच्या दोन वेगवेगळया प्रतिमा दोन्ही डोळयांकडून मेंदूला पाठवल्या जातात. त्यामधील तिरळ्या असलेल्या डोळयाकडून येणारी प्रतिमा ही आपोआपच अस्पष्ट असते ही अस्पष्ट प्रतिमा मेंदू दुर्लक्षित करतो त्यामुळे त्या डोळयाची दृष्टी कमी होते व डोळा आळशी बनतो. 

उपचार काय? 

1. लवकर उपचार न केल्यास हा आजार कायमचा जडतो व नंतर कोणतेही उपचार करून दृष्टी परत मिळवता येत नाही किंवा सामान्य होत नाही.लवकर निदान झाल्यास व लवकर उपचार केल्यास हा विकार बरा होऊ शकतो. 

2.या विकारावर उपचारांचे चांगले परिणाम मिळण्यासाठी रुग्णाचे व रुग्णाच्या नातेवाईकांचे सहकार्य गरजेचे असते. 

3.आळशी डोळा या विकारावरील सर्वात महत्त्वाचा उपचार म्हणजे रुग्णाकडून त्याच्या आळशी डोळयाकडूनच काम करून घेणे . चांगली दृष्टी परत मिळविण्यासाठी सामान्य (काम करणारा) डोळा पट्टी लावून झाकणे (पॅचींग) व आळशी डोळयाकडून काम करून घेणे. 

4.रुग्णास दृष्टीदोष असल्यास योग्य नंबरचा चष्मा देणे.

5.याशिवाय आळशी डोळा व तिरळेपणा एकत्र असल्यास शस्त्रक्रिया केली जाते, मोतीबिंदू, पापणी खचलेली असल्यास त्यावर योग्य ते उपचार वेळीच घ्यावेत. 

(Image : Google)

पॅचिंग म्हणजे काय? 

सामान्य डोळयास पट्टी लावून ठेवण्याच्या प्रक्रियेस patching असे म्हणतात. ही प्रक्रिया रुग्णाच्या वयोमानानुसार व विकाराच्या तीव्रतेनुसार काही तास किंवा काही दिवसांसाठी केली जाते. सुरुवातीला पट्टी लावून ठेवण्याच्या (पॅचिंगच्या) प्रक्रियेस सुरुवातीला मुलं प्रतिसाद देत नाहीत परंतु दृष्टीत सुधारणा होत राहिल्याने या प्रक्रियेचा स्वीकारही वाढत जातो. पट्टी लावणा-या (पॅचिंग केलेल्या) रुग्णांना वरचेवर तपासणी करत राहणे आवश्यक आहे.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सडोळ्यांची निगा