Join us   

ॲसिडिटीमुळे केस गळतात का? खूप पित्ताचा त्रास आहे आणि केसही गळतात, कारण तज्ज्ञ सांगतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2021 1:29 PM

अॅसिडीटी आणि केसांचे नेमके कनेक्शन काय?

ठळक मुद्दे कोणते उपाय केल्याने दोन्ही समस्या होतील दूर, समजून घेऊया...केसांच्या समस्येचे मूळ असू शकते पोटात...कसे ते पाहा

केसांचे सौंदर्य आपल्या एकूण सौंदर्यात भर घालत असतात. केस पांढर होणे, कोंडा होणे, फाटे फुटणे यांबरोबरच केस गळणे ही अतिशय सामान्य समस्या आहे असे आपल्याला वाटते. केस गळण्याची हवामानातील, शरीरातील पोषणमूल्ये, वेगवेगळ्या रासायनिक उत्पादनांचा केसांवर होणारा परिणाम ही कारणे आपल्याला माहित असतात. पण ॲसिडिटी हेही केस गळण्याचे एक मोठे कारण असते असे आपल्याला कोणी म्हटले तर आपल्याला खरे वाटणार नाही. पण ॲसिडिटीमुळे केस गळण्याचे प्रमाण वाढते असे आयुर्वेदात सांगितले आहे. ॲसिडिटीमुळे आरोग्याच्या इतर तक्रारी उद्भवतात त्याचप्रमाणे त्याचा केसांवरही परीणाम होतो. 

(Image : Google)

याबाबत योग व आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. पौर्णिमा काळे सांगतात, अन्नपचन संस्थेचा प्रामुख्याने पहायला मिळणारा आजार म्हणजे ॲसिडिटी होणे, यालाच आयुर्वेदात आम्लपित्त म्हणून ओळखले जाते. पित्त हे उष्ण गुणाचे असते, त्यात त्याला येणारी आम्लता. वेळेवर न जेवणे, जास्त प्रमाणात जेवणे, तिखट आंबट पदार्थ खाणे, दिवसा झोपणे, रात्री जागरण करणे, सिगारेट, तंबाखू यांसारखी व्यसने, जंक फूडचे सेवन अशीॲसिडिटीची अनेक कारणे अशतात. ॲसिडिटीमध्ये शरीरातील आम्लांचे प्रमाण वाढते आणि ही आम्ले वारंवार आमाशयात येवून आमाशयातील आतल्या स्तराला खराब करतात. तसेच कधी कधी आमाशयात आलेले आम्ल म्हणजेच ॲसिड हे द्रवस्वरुपात असते ते बराच वेळ आमाशयात पडून राहील्याने अन्नपचनाची क्रिया योग्य पद्धतीने होत नाही. या दोन्ही प्रकारात आपण घेत असलेल्या आहारातून तयार होणारे एन्झाईम, प्रोटीन, यांची मात्रा कमी होवू लागते. यामुळे केसांच्या वाढीसाठी व त्यांच्या आरोग्यासाठी उपयोगी असणारे घटक कमी मात्रेत तयार होतात. याचाच केसांची जाडी, चकाकी, रंग यावर परीणाम होतो आणि केसांशी निगडीत विविध समस्या निर्माण होतात. यामध्ये केस गळण्यापासून सुरुवात होते. 

अन्नपचनानंतर पित्त संपूर्ण शरीरात पसरायला लागले तर ते त्वचेमधे उष्णता वाढवायला लागते. त्वचेमधे जेवढी उष्णता अधिक तेवढे केसांच्या मुळांशी केसाला धरुण ठेवणारे वॅक्स सैल पडू लागते आणि याचा परीणाम केसांच्या आरोग्यावर होतो आणि ते गळायला लागतात. यामुळे केसांच्या मुळाशी नारळाचे तेल लावले जाते. ते त्वचेतील उष्णता कमी करुन केसांच्या मुळांना बळकट बनविते. आम्लपित्तामुळे आहारातील घटक रक्तामध्ये अर्धवट पचलेल्या अवस्थेतच फिरत असतात. यामुळे शरीरातील रक्ताभिसरण होताना रक्तातील अशुद्ध घटक त्वचेमधे अडकून राहतात. प्रामुख्याने केसांच्या मुळाशी ही अशुध्दी अडकली तर त्यांचे पोषण थांबू लागते परिणामी केसांची वाढ थांबते. यासाठी ॲसिडिटी होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.  

(Image : Google)

उपाय 

१. जेवण नियमित वेळेला करावे. अवेळी जेवणाऱ्यांना ॲसिडिटीचा त्रास होतो.

२. रीकाम्यापोटी चहा घेऊ नये. त्यामुळे शरीरातील पित्त खवळण्याची शक्यता जास्त असते. 

३. सोशल मीडीया, कामाचे ताण, कौटुंबिक जबाबदाऱ्या यांमुळे रात्रीचे जागरण होते, मात्र ते टाळलेले केव्हाही चांगले. 

४. केसांच्या मुळांशी नियमितपणे नारळाचे तेल लावावे.

५. आठवड्यातून एकदा नस्य हे पंचकर्मातील एक कर्म करावे. यामधे अणु तेल, पंचेंद्रीय वर्धन तेल यासारखे तेलाचे दोन-दोन थेंब नाकात सोडले जातात. त्यामुळे ॲसिडिटी कमी होण्यास मदत होते.

६. दिवसातून दोनदा तरी गुलकंद घ्यावा. यामुळे पोट शांत राहण्यास मदत होते. 

७. उपवास करताना कींवा जेवायला उशिर होणार असेल तर दूध व तूप एकत्र घ्यावे.

८. सब्जा बी दुधात घ्यावे. 

९. ॲसिडिटी शमवणाऱ्या गोळ्या सर्रास घेतल्या जातात. त्यामुळेही केस गळण्याचे प्रमाण वाढू शकते असे काही रुग्णांमधे आढळून आलेले आहे. यामुळे कोणतेही औषध रुग्णांनी मनाने न घेता डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे. 

१०. रक्ताभिसरणात अडथळा असेल, सोबतच वारंवार सर्दी व कफाचा त्रास असेल तर अशा अवस्थेत भृंगराज पासून बनवलेले तेल उपयोगी ठरते.

११. ॲसिडिटी व त्वचेतील उष्णतेमुळे केस विकार निर्माण झालेले असताना डॉक्टर आवळ्यापासून बनवलेले औषध व तेल वापरण्यास सांगतात. त्याचा चांगला फायदा होतो. दुधातून शतावरी कल्प दुधातून घेतल्यास त्याचाही ॲसिडिटीमुळे होऊ नये म्हणून फायदा होतो. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइलब्यूटी टिप्सकेसांची काळजी