अनेकदा आपण बाथरुमला जातो आणि आपल्या लक्षात येतं की आपले इनर्स ओले झालेत कींवा आपल्याला डिसचार्ज होतोय. प्रत्येकीला अशाप्रकारे डिसचार्ज होतो आणि ते अतिशय सामान्य आहे. आपल्या व्हजायनाच्या आत अशाप्रकारचे बॅक्टेरिया असतात ज्यामुळे ती स्वच्छ राहण्यास मदत होते. व्हजायना स्वच्छ झाल्यानंतर जो खराब भाग असतो, तो शरीर स्वत:हून बाहेर टाकते यालाच आपण पांढरं जाणं किंवा डिसचार्ज असं म्हणतो. आता हा डिसचार्ज म्हणजे शरीराने आपल्याला दिलेले एकप्रकारचे गिफ्ट आहे असे आपण समजायला हवे. याचे कारण म्हणजे त्यावरुन आपली तब्यते बिघडली की चांगली आहे हे आपल्याला अगदी सहज ओळखता येते. तेव्हा डिसचार्जच्या बाबतीत तो किती प्रमाणात झालेला चांगला, त्याचा रंग कसा असावा, या डिसचार्जला सतत वास येत असेल तर काय? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेणे गरजेचे आहे. अन्यथा वेळीच डॉक्टरांकडे धाव घेण्याशिवाय पर्याय नाही. तेव्हा या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायला हवीत...
याकडे आवर्जून लक्ष द्या
१. तुम्हाला खालच्या भागात आग होत असेल
२. तुम्हाला खालच्या भागात सतत खाज येत असेल
३. डिसचार्ज झाल्यानंतर एकप्रकारचा वेगळा वास येत असेल
४. प्रमाणापेक्षा जास्त डिसचार्ज होत असेल
५. अजिबातच डिसचार्ज होत नसेल
....तर अजिबात दुर्लक्ष करु नका
१. डिसचार्जचा रंग - साधारणपणे हा डिसचार्ज चिकट असतो. काहीवेळा तो क्रिमसारखा असू शकतो. त्याचा रंग पांढरा असतो कींवा काही वेळा हा घटक पारदर्शक असू शकतो. आपल्या पाळीच्या सायकलच्या मधल्या काळात हा काही प्रमाणात घट्ट असू शकतो. फिकट ग्रे रंग ते पांढरा रंग हा यामध्ये सामान्य मानला जातो. यापेक्षा डिसचार्जचा रंग वेगळा असला तर नक्कीच या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे. कारण धोक्याची घंटा असू शकते.
पाहूया कोणत्या रंगाचा डिसचार्ज काय दर्शवतो -
अ) लाल रंगाचा डिसचार्ज - याचा अर्थ काही दिवसांतच तुमची पाळी येणार आहे. पाळीच्या वेळी अंगावरुन जाणारे रक्त या डिसचार्जमध्ये मिसळल्याने तो लाल रंगाचा दिसतो. त्यामुळे या बाबतीत जास्त काळजी करणयाचे कारण नाही. पण पाळी येऊन गेल्यानंतर पुढील पाळी येण्याला बरेच दिवस बाकी असतील आणि लाल रंगाचा डिसचार्ज झाला तर आतमध्ये काही जखम झालेली असण्याची शक्यता असते. अशावेळी वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.
ब) ब्राऊन डिसचार्ज - पाळीच्या आधी रक्त डिसचार्जमध्ये मिसळल्याने या डिसचार्जचा रंग काहीसा ब्राऊन होतो. तसेच व्हजायनामध्ये वेगवेगळे रासायनिक घटक असल्याने हा रंग ब्राऊन असू शकतो. हे केवळ पाळीच्या आधी किंवा नंतर होऊ शकते. मात्र पाळीची इतर कोणतीही लक्षणे किंवा तारीख नसताना अशाप्रकारे ब्राऊन डिसचार्ज झाला तर डॉक्टरांना दाखवायला हवे.
क) इतर कलरचे डिसचार्ज - काही जणींना पिवळा, हिरवा आणि अगदी निळ्या रंगाचाही डिसचार्ज होतो. अशावेळी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. काही वेळा शारीरिक संबंधातून झालेल्या संसर्गामुळे हिरवा किंवा पिवळ्या रंगाचा डिसचार्ज होऊ शकतो.
२. डिसचार्जचा पॅटर्न - काहीवेळा तुम्हाला होत असलेला डिसचार्ज हा पाण्यासारखा किंवा चिकट न होता तो काही प्रमाणात घट्ट असतो. त्यामुळे तो दह्यासारखा भासतो. अशावेळी तुम्हाला फंगल इन्फेक्शन झाले आहे हे वेळीच ओळखायला हवे. असे झाले असेल तर तुम्हाला खालच्या भागात खूप खाज येते. तुम्हाला खालच्या भागात सतत जोरात खाजवावेसे वाटते. अशावेळी अंगावर न काढता त्वरीत डॉक्टरांकडे जायला हवे. त्यामुळे ही समस्या वेळीच दूर होण्यास मदत होईल.
३. डिसचार्जला येणारा विचित्र वास - तुमच्या डिसचार्जला अमोनियासारखा किंवा माशांसारखा वास येत असेल तर तुम्हाला त्वरीत डॉक्टरकडे जायला हवे. कारण डिसचार्जला अशाप्रकारे वास येण्याचे मुख्य कारण म्हणजे व्हजायनातील चांगले बॅक्टेरीया मृत पावलेले असतात आणि केवळ वाईट बॅक्टेरीया याठिकाणी राहीलेले असतात. त्यामुळे डिसचार्जच्या माध्यमातून तुम्हाला इन्फेक्शन झाले आहे हे लक्षात येते. अशावेळी फार वाट न पाहता डॉक्टरांचा सल्ला घेणे उपयुक्त ठरते.