हसरा चेहरा कोणाला नाही आवडत. पण हसताना पिवळे दात दिसले की चारचौघात लाजिरवाणे वाटते. दुधासारखे पांढरे दात तुमचे व्यक्तिमत्व वाढवतात. पण बिघडलेल्या जीवनशैलीमुळे आपण दातांकडे फार लक्ष देत नाही. काही लोकं २ मिनिटंही सरळ दात घासत नाही. ज्यामुळे दातांवर पिवळट थर तर साचतेच, शिवाय दात किडतात. अशा स्थितीत आपल्याला लाख मोलाची स्माईल लपवावी लागते.
जर टूथपेस्टनेही दात चमकत नसतील तर, मिठाचा वापर करून पाहा. आता तुम्ही म्हणाल मीठ फक्त जेवणाची चव वाढवते. पण याचा वापर आपण दात चमकवण्यासाठी देखील करू शकता. मीठ ओरल हेल्थसाठी फायदेशीर ठरते. मीठाने दात स्वच्छ केल्याने दातांचा पिवळेपणा दूर होतो. यामुळे दात चमकदार आणि हिरड्या निरोगी राहतात. मीठ तोंडाची पीएच पातळी मेंटेन करते. ज्यामुळे दातांमध्ये बॅक्टेरिया जमा होत नाही. मिठाचा वापर दातांसाठी कशा पद्धतीने करावा पाहूयात(Does brushing with salt help remove yellow stains).
दात चमकवण्यासाठी मिठाचा कसा असा वापर
मीठ आणि मोहरीचे तेल
ऑन्ली माय हेल्थ या वेबसाईटनुसार, दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी मीठ फायदेशीर ठरू शकते. यासाठी एका वाटीत चिमुटभर मीठ घ्या, त्यात मोहरीचे तेल मिक्स करा. आता हे मिश्रण बोटावर घ्या, व याने दात स्वच्छ घासून काढा. त्यानंतर पाण्याने गुळण्या करा. याच्या नियमित वापराने दातांवर साचलेली घाण साफ होईल. व दात मोत्यासारखे चमकतील.
मीठ आणि बेकिंग सोडा
दातांवरील पिवळेपणा दूर करण्यासाठी आपण मीठ आणि बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. यासाठी चिमुटभर मिठात, बेकिंग सोडा मिक्स करा. आता हे मिश्रण टूथब्रशच्या मदतीने दातांवर लावा. २ ते ३ मिनिटे ब्रशने दात घासून काढा. त्यानंतर पाण्याने गुळण्या करा. यामुळे दात चमकदार तर होतीलच, पण श्वासाच्या दुर्गंधीपासूनही सुटका मिळेल.
मीठ आणि लिंबाचा रस
लिंबूमध्ये सायट्रिक ऍसिड असते, जे नैसर्गिक ब्लीचिंग एजंट म्हणून काम करते. दातांवरील पिवळेपणा दूर करण्यासाठी आपण मीठ आणि लिंबाच्या रसाचा वापर करू शकता. यासाठी एका वाटीत चिमुटभर मीठ घ्या, त्यात लिंबाचा रस आणि पाणी घालून मिक्स करा. तयार पेस्ट बोटांवर घ्या, व दातांना स्वच्छ घासून काढा. आठवड्यातून २ वेळा याचा वापर केल्यास दात चमकदार होतील.