Join us   

कोबी-फ्लॉवर-सफरचंद खाऊन वजन कमी होते का? आहारात नियमित 6 गोष्टी, करा हेल्दी वेटलॉस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2021 11:22 AM

संतुलित आहार, व्यायाम, पुरेशी झोप यांमुळे तब्येत चांगली राहीलच पण वजनही घटण्यास मदत होईल...

ठळक मुद्दे कोणते पदार्थ ठरतात वजन कमी करण्यास उपयुक्त...योग्य आहार आणि व्यायामामुळे आरोग्याच्या बऱ्याच तक्रारी होतात दूर

वाढलेले वजन कमी करणे ही सध्या अनेकांच्या आयुष्यातील एक मोठी समस्या बनली आहे. सतत बसून काम, व्यायामाचा अभाव आणि जंक फूडचे सेवन, व्यसने, ताणतणाव अशा जीवनशैलीमुळे शरीरावर चरबी वाढते. पण एकदा वाढलेली चरबी काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही. वाढलेले वजन दिसायला तर वाईट दिसतेच पण आरोग्यासाठीही ते धोकादायक असते. मग हे वजन कमी करण्यासाठी काही ना काही उपाय केले जातात. पण त्याचा म्हणावा तसा उपयोग होईलच असे नाही. संतुलित घरचा आहार, पुरेशी झोप आणि व्यायाम या गोष्टींचा दैनंदिन जीवनात समावेश केल्यास आरोग्याच्या बहुतांश तक्रारी दूर होऊ शकतात. आपण खात असलेल्या पदार्थांमधील काही पदार्थ आपले वजन वाढण्यास कारणीभूत असतात तर काही पदार्थांमुळे वाढलेले वजन कमी करण्यास मदत होते. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. हंसाजी योगेंद्र सांगत आहेत वजन कमी करण्यासाठी मदत कऱणारे हे पदार्थ नेमके कोणते...

१. मध - झोपताना मध खाल्ल्यास शरीरातील फॅटस बर्न होण्यासाठी त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. झोपल्या झोपल्या आपले शरीर सर्वाधिक फॅटस बर्न करते. तसेच मधामुळे यकृतातून जास्त ग्लुकोज निर्मिती होते. या ग्लुकोजमुळे मेंदूतील शर्करेचे प्रमाण योग्य राहते आणि फॅट बर्निंग हार्मोन्स तयार करण्यासही त्याची मदत होते. त्यामुळे झोपण्यापूर्वी १ चमचा मध खाल्ल्यास त्याचा अतिशय चांगला फायदा होतो. हा मध तुम्ही दुधात घालूनही घेऊ शकता कारण झोपण्यापूर्वी दूध पिणेही आरोग्यासाठी चांगले असते. 

२. चिया सीडस - चिया सीडस आरोग्याच्या अनेक तक्रारींवर उपयुक्त असतात. त्याचप्रमाणे वजन कमी करण्यासाठीही त्यांचा उपयोग होतो. झोपेतून उठल्या उठल्या चहा किंवा कॉफी घेण्याऐवजी पाण्यात अर्धे लिंबू, चिमूटभर मीठ आणि एक चमचा चिया सीडस घालून हे प्यायला हवे. मात्र यासाठी चिया सीडस अर्धा तास पाण्यात भिजत ठेवाव्यात. हे प्यायल्यामुळे आपण दिवसभर जास्तीचे खातो त्यावर नियंत्रण येते. 

३. जीरा पाणी - जीरे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असून वजन कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. जीरा पाणी प्यायल्याने तुमची भूक कमी होते आणि फॅट बर्निंग प्रोसेस वेगाने होण्यास सुरुवात होते. एक चमचा जीरे एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी झोपेतून उठल्यावर हे पाणी प्या, त्यासोबत थोडेसे जीरेही चावून खा. यामुळे तुमचे वजन कमी होण्यास नक्की मदत होईल. 

४. कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली - तुमच्या रोजच्या आहारात कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली यांसारख्या भाज्यांचा समावेश ठेवा. या भाज्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते तर कॅलरीज आणि कार्बोहायड्रेटसचे प्रमाण अतिशय कमी असते. तसेच या भाज्या खाल्ल्यामुळे तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे दिवसातून एकदा तरी बाऊलभरुन या भाज्या खायलाच हव्यात. 

५. सफरचंद - रोज एक सफरचंद खाल्ले तर तुम्हाला डॉक्टरकडे जावे लागणार नाही ही म्हण आपल्याला माहित आहे. तसेच सफरचंद खाल्ल्यामुळे तुमचे वाढलेले वजन कमी होण्यास उपयोगी ठरेल. सालासकट सफरचंद खाल्ल्यास तुम्हाला तृप्त झाल्यासारखे वाटेल आणि शरीराला असणारी फायबर्सची गरजही पूर्ण होईल. सफरचंदात कॅलरीजचे प्रमाणही कमी असते त्यामुळे वजन कमी होण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो. तसेच पोट भरलेले राहते. 

६. लोह, झिंक आणि सेलिनियम फूडस - हे तिन्ही घटक असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश असणे अत्यावश्यक आहे. यामुळे तुमची थायरॉईड अॅक्टीव्हीटी वाढवण्यास मदत होते. तुमची थायरॉईड अॅक्टीव्हीटी चांगली असेल तर तुमचा मेटाबॉलिझम चांगला राहतो आणि वाढलेल्या कॅलरीज बर्न होण्यास त्याची मदत होते. दाणे, सुकामेवा यांमध्ये हे तिन्ही घटक पुरेशा प्रमाणात असतात. त्यामुळे सकाळच्या नाश्तामध्ये सुकामेव्याचा समावेश असायला हवा. रात्रभर काजू, बदाम, आक्रोड, पिस्ता पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी उठल्यावर हे खा. त्यामुळे वजन कमी होण्यास निश्चितच मदत होईल. 

टॅग्स : आरोग्यवेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सआहार योजना