Join us   

टाच खूप दुखतेय? बघा वजनाचा काटा नाहीतर चपलेचे माप, चुकीची लाइफस्टाइल टाचदुखी वाढवते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 3:48 PM

खूप वेळ बसून मग उभे राहिले की टाचांमधून एक सणक जाते. दोन- तीन पाऊलं लंगडत लंगडत चालावी लागतात आणि मग कुठे नीट चालता येते. अशी समस्या आता अवघ्या पंचवीशीतील तरूणींनाही जाणवायला लागली आहेत. याचे सगळ्यात मुख्य कारण आहे चुकीची लाईफस्टाईल.

ठळक मुद्दे पुर्वी टाचदुखी साधारण चाळीशीनंतर सुरू व्हायची. पण आता मात्र  अगदी पंचविशीतल्या तरूणीही टाचदुखीची तक्रार करत आहेत. असं का होत असेल बरं ?

सध्याची आपली जीवनशैली खूपच धावपळीची आणि दगदगीची आहे. कोरोनाने थोडी उसंत दिली पण आता पुन्हा नव्या ध्येयांमागे प्रत्येकाचे पळणे सुरू झाले आहे. या सगळ्या नादात तब्येतीकडे  दुर्लक्ष होते  आणि आरोग्याच्या अनेक समस्या डोके वर काढू लागतात. अशीच एक बहुतांश महिलांना सतावणारी समस्या म्हणजे कमालीची टाचदुखी. पुर्वी टाचदुखी साधारण चाळीशीनंतर सुरू व्हायची. पण आता मात्र  अगदी पंचविशीतल्या तरूणीही टाचदुखीची तक्रार करत आहेत. असं का होत असेल बरं ?

 

टाचदुखीची कारणे १. वजन वाढतंय... सामान्यपणे जेव्हा आपल्या पायांवर आपल्या शरीराचा अतिरिक्त भार येऊ लागतो तेव्हा टाचा किंवा गुडघे दुखायला लागतात. त्यामुळे टाचा दुखायला लागल्या असतील, तर सगळ्यात आधी वजन काट्यावर उभे रहा आणि वजनाचा काटा स्थिर आहे की उजव्या बाजूला झुकत चाललाय, हे तपासून घ्या. वाढत्या वजनामुळे जर टाचा दुखत असतील, तर व्यायाम करून वजन कंट्रोल करणे, हा त्यावरचा सगळ्यात सोपा उपाय आहे. 

 

२. चपलांचं माप चुकतंय टाच दुखीचं सगळ्यात कॉमन असणारं दुसरं कारण म्हणजे चपलांचं चुकलेलं माप. बऱ्याचदा चप्पल घेताना आपण आपल्यासाठी कोणती चप्पल आरामदायक आहे, हे पाहण्यापेक्षा आपल्या पायात कोणती चप्पल छान दिसते आहे, हे पाहून चपलांची, सॅण्डलची निवड करतो. इथेच तर सगळे चुकते. कधीकधी एखादी चप्पल किंवा सॅण्डल इतकी आवडून जाते की मग ती आपल्या मापात थोडी मागे- पुढे असली तरी आपण ती निभावून नेतो आणि दुखणे अंगावर ओढून घेतो. कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली तर आपापल्या शहरातील स्ट्रिट मार्केटमधून चपलांची खरेदी करतात. अशा लोकल मार्केटमध्ये चपला स्वस्त मिळत असल्याने खिशाला परवडतात आणि चपलांची पण भरपूर व्हराईटी जमा करता येते. पण या सगळ्या नादात टाचेचे दुखणे मात्र मागे लागते. त्यामुळे चपलांची योग्य निवड करायला हवी.

 

३.  खूप वेळ उभे राहताय.... खूप वेळ उभे राहणे हे देखील टाचदुखीचे कारण आहे. आधी स्वयंपाक करताना ओट्याजवळ दीड- दोन तास उभे राहायचे, नंतर सगळी आवराआवरी आणि घरकामही बऱ्याचदा उभ्या उभ्याच केले जाते. यानंतर ऑफिसमध्ये अनेकींना उभे रहावे लागते. चुकीच्या चपला, वाढलेलं वजन आणि खूप वेळ उभं राहणं या तिन्ही समस्या जर एकत्र आल्या तर तीव्र टाचदुखी होऊ शकते. 

 

४.​​​​​​​ व्हिटॅमिन्स​​​​​​​ आणि कॅल्शिअमची कमतरता  आपल्या आहाराकडे दुर्लक्ष करणे, हा बहुसंख्य महिलांचा गुणधर्म. शरीरामध्ये व्हिटॅमिन्स आणि कॅल्शिअमची कमतरता निर्माण झाली, तरी टाचदुखीचा त्रास होऊ शकतो.  त्यामुळे अशा परिस्थितीत  डॉक्टरांच्या  सल्ल्याने व्हिटॅमिन्स आणि कॅल्शियम कसे वाढेल, याकडे लक्ष दिले पाहिजे. 

 

५. व्यायामाचा अभाव किंवा चुकीच्या पद्धतीने उभे राहणे ज्या महिला अजिबातच चालत नाहीत किंवा थोडफारही व्यायाम करत नाहीत, अशा महिलांना टाचदुखीचा त्रास होऊ शकतो. चुकीच्या पद्धतीने उभे राहिल्यानेही टाच दुखते. बऱ्याचदा आपण दोन्ही पायांवर समान भार देऊन उभे राहण्याऐवजी एकाच पायावर ओझे टाकतो आणि उभे राहतो. ही सवय अत्यंत चुकीची आहे. 

 

टाचदुखीवर घरगुती उपाय १. टाचदुखी कमी करण्यासाठी रोज टाचेवर बर्फ चोळावा. २. टाचांचे दुखणे वाढले असल्यास तेलाने नियमित मालिश करावी. मसाज करण्यासाठी मोहरीचे तेल वापरले तर अधिक उत्तम. ३. टाच दुखत असल्यास अगदी कडक पाण्यात मीठ टाकावे आणि त्या पाण्यात पाय बुडवून ठेवावेत. पाणी कोमट होईपर्यंत पाय बुडवून ठेवावे.  ४. टाचांना आंबेहळदीचा लेप लावला तरी टाचेचे दुखणे कमी होते.  ५. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन्स असणाऱ्या पदार्थांचे सेवन करा.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स