मायग्रेन किंवा अर्धशिशीचा त्रास अनेकांना होतो. जीवनशैलीतील चुकीच्या पद्धतींमुळे होणारा हा त्रास वेळीच योग्य ती काळजी घेतली तर आटोक्यात आणता येतो. बदलती जीवनशैली, आहार-विहार, व्यायामाचा अभाव आणि इतरही अनेक कारणांनी ही समस्या वाढल्याचे दिसते. अगदी महाविद्यालयीन वयातील मुलींपासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत अनेकांना वारंवार हा समस्या उद्भवते. एकदा ही डोकेदुखी सुरू झाली की त्याचा इतका त्रास होतो की व्यक्ती हैराण होते. यामध्ये डोक्याचा अर्धा भाग इतका दुखतो की काही सुधरत नाही. सुरूवातीला हे दुखण्याचे प्रमाण कमी असते मात्र काही वेळाने ते वाढत जाते. काहींना हे इतके जास्त होते की कालांतराने मळमळ, उलटी असेही त्रास होतात.
( Image : Google)
मायग्रेनवर (Migraine)अद्याप कोणताही औषधोपचार उपलब्ध नसला तरीही डोकेदुखीची औषधे मायग्रेन झाल्यावर सर्रास घेतली जातात. मात्र असे करताना वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे कधीही फायद्याचे ठरते. मायग्रेनचा झटका आल्यास डोकेदुखीबरोबरच डोळ्यापुढे अंधारी येणे, प्रकाशवलय दिसणे, अशा समस्याही उद्भवू शकतात. जीवनशैली हे मुख्य कारण असलेल्या या समस्येमध्ये मायग्रेनचे अटॅक आल्याचीही अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. या त्रासाचे प्रमाण जास्त असल्यास वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेणे केव्हाही फायदेशीर ठरते. एकदा ही डोकेदुखी सुरू झाली की काम, खाणे-पिणे, दैनंदिन व्यवहार असे काहीही सुचेनासे होते. त्यामुळे हा त्रास उद्भवूच नये यासाठी वेळीच योग्य ती काळजी घेतलेली केव्हाही चांगली. पाहूयात मायग्रेनच्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी काही सोपे उपाय…
१.आहारातील पथ्ये हा मायग्रेनवरील उपचार नसला, तरी मायग्रेनच्या लक्षणांना कारणीभूत ठरणारे अन्नपदार्थ ओळखणं आणि ते टाळणं मायग्रेनच्या झटक्यांना प्रतिबंध करण्यात उपयुक्त ठरु शकतात. त्यामुळे ट्रिगर्स ओळखणं महत्त्वाचं. साधारणपणे केळी, चॉकलेट, चीज, मायोनीज, कॅफीन, मद्य इत्यादींचा समावेश होतो.
२.चायनिज, तेलकट पदार्थ, जंक फूड, आंबवलेले पदार्थ, पॅकेट फूड तसेच अन्नपदार्थ टिकविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पदार्थांच्या सततच्या सेवनाने मायग्रेनचा त्रास होण्याची शक्यता असते.
३.अपुरी झोप हे मायग्रेनचे आणखी एक महत्त्वाचे कारण ठरु शकते. व्यक्तीला साधारणपणे ७ ते ८ तासांची झोप आवश्यक असते. मात्र दीर्घकाळ पुरेशी झोप न मिळाल्यास मायग्रेनचा त्रास सतावू शकतो.
(Image : Google)
४.शरीरातील सर्व प्रकारच्या हार्मोन्सचे कार्य सुरळीत राहणे उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असते. हे कार्य बिघडल्यानेही मायग्रेनसारखा त्रास होऊ शकतो.
५.व्य़ायामामुळे शारीरिक संतुलन चांगले राहतेच मात्र मानसिक संतुलनही चांगले राहण्यासही मदत होते. त्यामुळे नियमित व्यायाम हा मायग्रेन टाळण्यासाठी उत्तम उपाय ठरु शकतो.
६.काहीवेळा डोकेदुखी ही पोटाशी निगडित असते. अन्नाचे योग्य पद्धतीने पचन होणे आवश्यक असते. त्यामुळे पचनक्रिया चांगली राहण्याचे प्रयत्न करणे हा मायग्रेनवरील एक चांगला उपाय असू शकतो.
७.कोणतेही व्यसन हे मायग्रेनचे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. सततच्या व्यसनामुळे डोकेदुखी सतावू शकते. त्यामुळे व्यसन टाळणे केव्हाही हिताचेच.
८. मायग्रेनचा त्रास होत असेल तर योग्य वैद्यकीय मदत घेणं सगळ्यात महत्त्वाचं.