लघवी लागणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण जेव्हा आहार विहारात काही चुका होतात, आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात तेव्हा लघवी या नैसर्गिक क्रियेत अडथळे निर्माण होतात. लघवीचा रंग, प्रमाण, वास यावर परिणाम होतो. लघवीला घाणेरडा वास येणं ही अशीच एक समस्या आहे. याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे आरोग्यविषयक धोका पत्करणं होय. कारण लघवीला घाणेरडा वास येणं हे धोकादायक आजारांचं लक्षणही असतं. लघवीला वास येणं ही सामान्य किंवा किरकोळ बाब म्हणून त्याकडे दुर्लक्ष होवू नये यासाठी लघवीला वास येण्याची कारणं समजून घ्यायला हवीत. लघवीला वास येण्याची विविध कारणं अभ्यासातून आणि संशोधनातून समोर आली आहेत. याकडे गांभिर्यानं बघण्याचा, त्याबाबत डाॅक्टरांचा सल्ला घेण्यास अभ्यासक आणि संशोधक सूचवतात.
Image: Google
का येतो लघवीला घाणेरडा वास?
लघवीला घाणेरडा वास येण्यामागे अनेक आरोग्यविषयक समस्यांची पार्श्वभूमी असते. त्यातली काही कारणं गांभिर्यानं समजून घेण्याची गरज आहे.
1. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन
मूत्रमार्ग, मूत्राशय किंवा किडनीत हानिकारक जिवाणुंची वाढ होते तेव्हा युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनची समस्या निर्माण होते. या समस्येत लघवी होताना वेदना होणं,लघवी करताना मूत्राशय पूर्णपणे रिकामे होण्यात अडचणी येणं, गडद, गढूळ लघवी होणं, लघवीतून रक्त जाणं, जिवाणुंचा प्रसार जर जास्त झाला तर ताप उएणं, किडनीला संसर्ग झाल्यास पाठ दुखणं ही लक्षणं तर दिसतातच सोबतच लघवीला वास येणं हे महत्त्वाचं लक्षण दिसून येतं. एरोकोक्कस युरिनेट नावाच्या जिवाणुमुळे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनमध्ये लघवीला घाणेरडा वास येतो.
2. योनीमार्गात जिवाणुसंसर्ग होणं\योनिमार्गात जिवाणू संसर्ग झाल्यास योनीमार्गात वेदना, खाज, लघवी होताना खाज येणं, पांढरा, करडा स्त्राव जाणं यासोबतच लघवीला घाणेरडा वास येणं हे महत्त्वाचं लक्षण योनीमार्गात जिवाणुसंसर्ग झाल्यास दिसून येतं.
3. मधुमेह
रक्तातील साखर वाढल्यास , मधुमेहाची समस्या असल्यास लघवीला घाणेरडा वास येतो. जेव्हा रक्तातील साखर प्रमाणापेक्षा वाढते तेव्हा लघवीला वास येण्याची समस्या निर्माण होते. मधुमेहात शरीर रक्तातील साखर पचवू शकत नाही. त्यामुळे लघवीला वास येतो. त्यामुळे या लक्षणाकडे दुर्लक्ष केल्यास मधुमेहाची समस्या गंभीर रुप धारण करु शकते. खूप थकवा येणं, तहान लागणं, वजन कमी होणं, जखम लवकर भरुन न येणं, धुसर दिसणं या लक्षणांसोबतच लघवीला वास येणं ही समस्या रक्तातील साखर वाढल्यास जाणवते.
Image: Google
4. शरीर यंत्रणा बिघडणे
2012 मध्ये झालेला अभ्यास सांगतो, की किडनी खराब झाल्यास शरीराला दुर्गंधी येणं किंवा लघवीला घाणेरडा वास येतो. 2012 मध्येच झालेला आणखी एक अभ्यास सांगतो, की यकृतासंबंधीच्या आजारातही लघवीला वास येण्याची समस्या दिसून येते.
5. लैंगिक आजार ( एसटीआय)
सेक्श्युअल ट्रान्समिटेड इंफेक्शन ( एसटीआय) अर्थात लैंगिक संबंधातून संक्रमित होणाऱ्या संसर्गामुळे लघवीला घाणेरडा वास येतो. या समस्येत मूत्रमार्गाला सूज येते. त्यामुळे लघवीचं प्रमाण कमी होण्ं, लघवी होताना जळजळणं हे त्रास होतात. यामुळेच लघवीला वास येतो असं तज्ज्ञ सांगतात. लैंगिक संबंधातून संक्रमित होणाऱ्या आजाराचं हे महत्त्वाचं लक्षण असून याकडे दुर्लक्ष झाल्यास आजार गंभीर होतो असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे.
Image: Google
6. यीस्ट इंफेक्शन
त्वचेवर कॅंडिडा नावाची बुरशी असते. महिलांमध्ये गुप्तांगाच्या त्वचेवरही या बुरशीची वाढ होते. गुप्त मार्गात ही बुरशी वाढल्यास त्याला यीस्ट इंफेक्शन असं म्हणतात. यीस्ट इंफेक्शन झाल्यास योनी मार्गाला लालसरपणा येतो, सूज येते यामुळे लघवीला घाणेरडा वास येतो.
7. गरोदरपण
गरोदरपणात लघवीला वास येतो असं तज्ज्ञ म्हणतात. गरोदरपणात शरीरात विविध हार्मोनल बदल होतात. याचा परिणाम म्हणूनही लघवीला वास येतो. याबाबत आपल्या डाॅक्टरांना सांगणं हे महत्त्वाचं मानलं गेलं आहे.
Image: Google
8. आजार आणि उपचार
मधुमेहासारख्या समस्येत, तसेच काही आजारांवर ॲण्टिबायोटिक्स घेत असल्यास,कर्करोगावर उपचार म्हणून केमोथेरेपी सुरु असणं यामुळेही लघवीला वास येतो.
9. पाणी कमी पिणे
पाणी कमी पिण्याची सवय असल्यास डिहायड्रेशनची समस्या निर्माण होते. यात लघवी कमी होते. तसेच अमोनिया वायू जास्त बाहेर पडतो. याचाच परिणाम म्हणजे लघवीला वास येतो. तसेच आहारात शतावरीसारखे घटक, काॅफी पिण्याचं प्रमाण जास्त असल्यास लघवीला वास येतो.
Image: Google
लघवीला वास येत असल्यास
लघवीला वास येत असल्यास तज्ज्ञ प्राथमिक उपचार म्हणून आधी पाणी भरपूर पिणं सुरु करायचं असं सांगतात. तरी देखील लघवीला वास येणं हे लक्षण दीर्घकाळ कायम राहिल्यास डाॅक्टरांकडे जावून ते सांगितल त्या प्रमाणे आवश्यक तपासण्या करुन घ्याव्यात, दुर्लक्ष केल्यास आजाराचं स्वरुप गंभीर होवू शकतं. त्यामुळे लघवीला वास येणं हे लक्षण समजून त्याबाबतीत जागरुक राहायला हवं असं तज्ज्ञ म्हणतात.