सध्या उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. अशावेळी आपण बाहेर न पडता घरात किंवा ऑफीसमध्ये बसलो तरी अंगाची लाहीलाही होते. तळपायांची, डोळ्यांची आणि सर्वांगाची आग होते. दिवसा तर घामाच्या धारा वाहतातच, पण रात्रीच्या वेळीही प्रचंड उकडते. या उकाड्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी आपण पंखा, कूलर किंवा एसीचा सातत्याने वापर करतो. हवामानातील या गरमीचा सामना करण्यासाठी घरामध्ये, ऑफिसला किंवा अगदी कारमध्येही एसी वापरणे हल्ली बरेच सामान्य झाले आहे. असे असले तरी सतत एसीमध्ये बसल्याने आरोग्यावर त्याचे काय दुष्परिणाम होतात हे सांगत आहेत प्रसिद्ध जनरल फिजिशियन आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे...
१. त्वचा कोरडी पडते
दीर्घकाळ एसी वापरल्याने त्वचेतील अंतस्थ थरांवर परिणाम होऊन बाह्य त्वचेवर पांढरट पातळ पापुद्रे दिसू लागतात शिवाय त्वचेला खूप खाजही सुटते. यामध्ये त्वचेमध्ये जंतूसंसर्ग होऊ शकतात.
२. श्वसनाचे आजार
थंड हवा देणाऱ्या एसीचे सर्वात अधिक दुष्परिणाम म्हणजे गार हवा शरीरात घेणाऱ्या श्वसनसंस्थेवर होतात. आपल्या श्वसनसंस्थेच्या सर्व अवयवांच्या आत जे अंतस्थ आवरण असते, त्याला सततच्या थंड तपमानाने सूज येते. अशी सूज आल्यावर या अंतस्थ त्वचेत असलेल्या पेशींमधून एक द्राव पाझरू लागतो.
३. सर्दी होणे
घसा, कान, नाक, स्वरयंत्र, श्वसनयंत्रणा अशा सगळ्यांवर एसीच्या वाऱ्याचा परिणाम होऊन सर्दी होणे, सतत नाक गळणे, नाक चोंदणे असे त्रास होतात. याशिवाय घसा सुजून दुखू लागणे, श्वासनलिकेला सूज येऊन खोकला होणे, दम लागणे असे त्रास उद्भवू लागतात.
४. सायनस
एसीच्या सततच्या वापराने कपाळातील फ्रॉन्टल आणि डोळ्याखालील मॅक्झिलरी सायनसेसच्या अंतस्थ त्वचेला सूज येऊन त्यात पाणी जमा होते आणि सायन्युसायटिस हा कमालीच्या डोकेदुखीचा त्रासदायक व दीर्घकाळ सतावणारा विकार होऊ शकतो.
५. डोळ्यांचे त्रास
डोळे कोरडे पडणे, डोळ्यांना खाज सुटणे, डोळ्यांवर ताण पडणे असे त्रास प्रदीर्घकाळ एसी वापरल्याने होतात.
६. सांध्यांचे विकार
एसीच्या सततच्या वापराने सांध्यांकडे जाणारा रक्तप्रवाह मंदावतो. त्यातून खांदे, गुडघे, घोटे, पाठ, कंबर, खुबा यांच्या सांधेदुखीचा त्रास होऊ लागतो. ज्यांना आधीपासून संधिवात असतो त्यांचा त्रास बळावतो.
७. हृदयविकार
सेन्ट्रल आफ्रिकन जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रसिध्द झालेल्या एका संशोधनानुसार वातानुकुलीत हवेत सतत बसल्याने सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक (खालचे आणि वरचे) असे दोन्ही रक्तदाब वाढतात. साहजिकच यातून हृदयविकार निर्माण होतात. ज्यांना आधीपासून उच्च रक्तदाबाचा त्रास अशा व्यक्तींना आणि ज्येष्ठ नागरिकांना हा त्रास अधिक होऊ शकतो.
इतर गंभीर आजार
काही व्यक्तींमध्ये श्वासनलिका आकुंचन पावून अस्थम्याचा अॅटॅक येऊ शकतो. ही सूज पुढे फुफ्फुसात आणि वायुकोशात जाऊन कमालीचा खोकला येणे, न्युमोनिया होणे असे गंभीर आजारही उद्भवतात. नाक चोंदून घसा सुजल्यावर कानांच्या अंतर्भागात सूज येऊन कान खूप दुखू लागतो आणि कानाच्या पडद्याला इजा होऊन कान फुटू शकतो. असे सतत घडत राहिल्यास कानांनी कमी ऐकू येऊ लागते आणि बहिरेपणा उद्भवतो.
ग्लोबल वॉर्मिंगवर परिणाम
एअर कंडीशनर्स सर्वत्र मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहेत. या यंत्रांमधून हायड्रोफ़्लुरोकार्बन्स (एचएफसी), क्लोरोफ्लुरोकार्बन्स (सीएफसी) हे दूषित पदार्थ खूप जास्त प्रमाणात पर्यावरणात उत्सर्जित होतात. त्यांच्यामुळे पृथ्वीभोवतालच्या ओझोनच्या थराला भेगा पडतात. ओझोनचा हा थर सूर्याच्या कमालीच्या दाहक उष्णतेपासून पृथ्वीचे रक्षण करत असतो. साहजिकच ओझोनच्या थराला छिद्रे पाडणाऱ्या या एअर कंडीशनर्समुळे पृथ्वीचे तपमान वाढत जाते आहे.