दिवसभर प्रत्येकजण वेगवेगळ्या कामात अडकलेला असतो. वेगवेगळ्या मानसिक ताणतणावांना सामोरे जात असतो. या ताणतणावातून आणि दिवसभर काम करून आलेल्या थकव्यातून सुटका होण्यासाठी रात्रीची शांत झोप हा एक उत्तम उपाय आहे. पण इथेच तर सगळे घोडे अडते ना. अनेक जण असे असतात की दिवसभर काम करूनही त्यांना रात्रीची शांत झोप येत नाही. ही समस्या वरवर दिसते तेवढी साधी समजून सहज घेण्यासारखी मुळीच नाही. या समस्येवर योग्य उपचार करायलाच हवा.
तरूण वयात झोप न येण्याची अनेक कारणे आहेत. प्रेमात पडलं की झोप उडते, ही एक हिंदी सिनेमातलं घिसंपिटं वाक्य. पण असं नसतानाही म्हणजे कुणाच्या प्रेमाबिमात न पडताही अनेकांना रात्री लवकर झोपच लागत नाही. त्या उलट काही जणं असतात की ती प्रेमात पडली किंवा कितीही टेन्शनमध्ये असली, तरी रात्र मस्त झोपी जातात. ज्या लोकांना रात्री चटकन झोप लागत नाही, त्यांना अशा गाढ झोपणाऱ्या लोकांचा कमालीचा हेवा वाटत असतो.
शिवाय याबाबतीत एक महत्त्वाची बाब अशी की, रात्री शांत झोप न लागणे किंवा रात्री लवकर झोप न लागणे, मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास कधीतरी डोळा लागणे अशा समस्या पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये खूपच जास्त आढळून येतात. डोक्याला कसले तरी टेन्शन असणे, हे प्रत्येकवेळी झोप न येण्याचे कारण नसते. झोप न येण्यासाठी तुमचा आहार, तुमचे आरोग्य, रात्री झोपण्याआधी तुम्ही काय करता, अशा सगळ्या गोष्टी जबाबदार असतात. माझा आहार, आरोग्य, फिटनेस हे सगळे व्यवस्थित आहे, मला कसलेही टेन्शन नाही, तरी मला रात्री झोप येत नाही.... असे जर तुमचे म्हणणे असेल, तर हा एक सोपा उपाय झोपण्याआधी न चुकता करून बघा.
रात्री झोप न लागण्याचे दुष्परिणाम - रात्री झोप लागली नाही तर अपुऱ्या झोपेमुळे दिवसभर अस्वस्थता येते. - आराम व्यवस्थित होत नसल्याने दिवसभर खूप थकवा जाणवतो. कोणत्याही कामात लक्ष लागत नाही. - रात्री शांत झोप झाली नाही, तर शरीरातील हार्मोनल बॅलेन्स बिघडतो आणि त्यामुळे शरीरात अनेक अनावश्यक आणि शरीराल अपायकारक असणारे हार्मोनल बदल होऊ लागतात. - मधुमेह, बीपी, स्थुलता, डिप्रेशन असे अनेक आजार रात्री व्यवस्थित झोप न लागल्यामुळे जडतात. - रात्री पुरेशी झोप झाली नाही तर त्वचेवरही परिणाम होतो. अकाली त्वचेवर वार्धक्याच्या खुना दिसू लागतात आणि केसगळती सुरु होते.
रात्री शांत झोप लागण्यासाठी हा उपाय करून बघा प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजूता दिवेकर यांनी हा एक मस्त आणि अतिशय सोपा उपाय सांगितला आहे. हा उपाय रात्री झोपण्यापुर्वी केलात तर एखादे लहान बाळ जसे अगदी गाढ झोपी जाते, तशी झोप तुम्हाला लागेल, असेही त्यांनी सांगितले आहे. अगदी सहज कुणालाही हा उपाय जमण्यासारखा आहे. यासाठी फक्त एवढेच करा. साधारण १० वाजता झोपत असाल तर त्याच्या चार ते पाच तास आधी पाच ते सहा काजू अर्धा कप दुधात भिजत घाला.
झोपण्यापुर्वी हे काजू दुधातून बाहेर काढा. एखाद्या खलबत्त्यात घालून त्याची चांगली पेस्ट करून घ्या. ही पेस्ट एका पातेल्यात टाका. ज्या दुधात काजू भिजत घातले होते, ते दूध देखील त्या पातेल्यात टाका. यानंतर दुसरे थोडे आणखी दूध पातेल्यात टाका. जर पाहिजे असेल तर चवीनुसार थोडीशी साखर टाका. हे दूध गरम करा आणि झोपण्यापुर्वी पिऊन घ्या. हा सोपा उपाय जर दररोज केलात, तर काहीच दिवसात उत्तम बदल दिसू लागेल आणि रात्री अगदी शांत झोप घेता येईल, असे ऋजूता दिवेकर यांनी सांगितले.