नवऱ्याला, मुलांना किंवा घरातल्या इतर कोणालाही काहीही आजार झाला किंवा तब्येतीच्या बाबतीत थोडं काही खुट्ट झालं तरी घरातली स्त्री सगळ्यात आधी दक्ष होते.... पण तीच स्त्री स्वत:च्या तब्येतीकडे मात्र साफ दुर्लक्ष करते. डोकं सतत दुखणं, सतत थकल्यासारखं होणं... किंवा अशी इतर काही लक्षणं काही महिलांना सतत जाणवतात. पण कामाचा लोड येत आहे, असं वाटून त्या अशा लक्षणांकडे सर्रास दुर्लक्ष करतात. तज्ज्ञांचा सल्ला न घेता मनानेच काही घरगुती उपचार सुरू करतात. पण असं करणं कदाचित घातक ठरू शकतं...
या उपचारांकडे मुळीच दुर्लक्ष करू नका..
१. वजनात मोठा फरक पडणे..
बऱ्याच जणींच्या बाबतीत असं खूपदा होतं की दिनक्रमात, खाण्यापिण्यात काही फरक झालेला नसतो. तरी देखील वजन एक तर झपाट्याने कमी होतं किंवा झपाट्याने वाढतं... असं जर तुमच्या बाबतीत होत असेल, तर हा बदल वरवर दिसतो, तेवढा साधा नाही. रूटीन बदललं नसताना वजनात होणारी वाढ किंवा घट ही गांभिर्याने घेण्याची बाब आहे. हार्मोन्समध्ये झालेले असंतूलन यातून दिसून येते.
२. तोंड कोरडं पडणे
सतत तोंड कोरडं पडल्यासारखं वाटत असेल. पाणी पिऊनही पुन्हा पाणी प्यावं वाटत असेल, पाणी पिऊनही तोंड पुन्हा सुकल्यासारखंच वाटत असेल, तर हे काही चांगलं लक्षण नाही. असं होत असेल तर शरीरात जीवनसत्वांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे, हे लक्षात घ्यावं आणि त्यावर लवकर उपाय करावा...
३. केस गळणे, नखे तुटणे
बऱ्याच जणींना असं वाटतं की आपण सतत घरकाम करतो, त्यामुळे आपली नखं सारखी तुटतात. पण नखं वारंवार तुटणं, केस गळणं यातून तुमच्या प्रकृतीचा बराच अंदाज येतो. शरीरात कॅल्शियमची मोठ्या प्रमाणात कमतरता असेल, तर अशी लक्षणे दिसून येतात. कॅल्शियमची कमतरता हाडांची ठिसूळता, दातांचे दुखणे अशा अनेक आजारांसाठी कारणीभूत ठरू शकते.
४. खूप चिडचिड होते...
मुलांनी काही केलं किंवा घरात, बाहेर काहीही झालं तरी अनेक जणींची खूपच चिडचिड होते. लहान- सहान गोष्टींसाठीही या महिला खूप चिडतात. यातून शरीरात कॅल्शियम, व्हिटॅमिन्स आणि प्रथिनांची कमतरता आहे, हे दिसून येते. सतत हार्मोन्सचे असंतूलन होत असेल, तरी अशी लक्षणं दिसून येतात. असा स्वभाव कदाचित मानसिक आजारांमुळेही होऊ शकतो. त्यामुळे असे होत असल्यास व्यवस्थित तपासणी करून घ्यावी.
५. सतत थकवा येणे
हा त्रास तर बहुसंख्य महिलांना जाणवतो. त्यांना वाटतं की आपण घरकाम करतो, ऑफिसचं काम सांभाळतो, त्यामुळे आपण खूप थकून जातो. पण रोजच असा त्रास होत असेल, तर तुमचं रूटीन हे त्यासाठी कारणीभूत नसतं. सतत थकवा येत असल्यास शरीरात अत्यावश्यक घटकांची खूप जास्त कमतरता आहे, हे लक्षात घ्या आणि त्यावर त्वरीत उपाय करा.