Join us   

ड्राय स्किनचा दोष फक्त थंडीला देऊ नका, रोजच्या ८ चुकांमुळे त्वचा होते कोरडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2022 5:07 PM

त्वचा कोरडी होणे ही समस्या फक्त हिवाळ्यातच होते, थंडीमुळेच होते असं नाही. खाण्यापिण्यात, रोजच्या सवयीत आपल्याकडून होणाऱ्या चुकाच आपल्या त्वचेसाठी ठरतात घातक.

ठळक मुद्दे भिन्न प्रकृतीचे , विरुध्द  समजले जाणारे पदार्थ एकत्र खाल्ल्याने त्वचा कोरडी होते.गरम तापमानात दीर्घकाळ काम करणं त्वचा कोरडी पडण्यास कारणीभूत् ठरतं.अति व्यायामाची सवय त्वचेसाठी घातकच!

त्वचा कोरडी पडणे याचा सहजसंबंध आपण हिवाळ्याशी, हवेतल्या कोरडेपणाशी, फेसवाॅश किंवा साबणातील रासायनिक घटकांशी जोडतो.  पण त्वचा कोरडी केवळ याच कारणांमुळे होत नाही. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी, दैनंदिन दिनचर्येतल्या सवयी आणि त्यातील चुका यामुळे देखील त्वचा कोरडी पडते. आणि आपल्या सवयीतल्या चुका जर आपण समजून घेऊन त्या बदलल्या नाहीतर् कोणतेही उपाय करा त्वचा कोरडी पडण्याची समस्या केवळ हिवाळ्यातच नाही तर इतर ऋतूतही कायम राहिल. म्हणूनच आयुर्वेदिक तज्ज्ञ वैद्य रेखा त्वचा कोरडी होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या आपल्या जाणत्या अजाणत्या चुकांकडे लक्ष वेधून या सवयी बदलण्याचा सल्ला देतात. 

Image: Google

त्वचा कोरडी पडण्यास कारणीभूत ठरणाऱ्या चुका

1. खाण्या पिण्याच्या आवडीतून काही चुका अशा घडतात की ज्या थेट त्वचेवर वाईट परिणाम करतात.  दोन भिन्न स्वभावाचे पदार्थ एकत्र खाणे ही सर्वात मोठी चूक. भिन्न स्वभावाचे पदार्थ एकत्र खाल्ल्याने शरीरात जी रासायनिक क्रिया घडते यामुळे शरीराच्या आत बाष्पीकरणाची प्रक्रिया वाढते. यामुळे शरीरातील आतील पाणी कमी होतं, शरीर आतून बाहेरुन कोरडं पडतं. त्याचा परिणाम म्हणजे त्वचा कोरडी होते. 

2. थंडीत काय इतर ऋतुतही अनेकजण पाणी पिण्याच्या योग्य प्रमाणाकडे दुर्लक्ष करतात. यामुळे शरीरात पाणी कमी जातं. बाहेरची हवा कोरडी असेल, थंड असेल तर त्वचेतला ओलसरपणा शोषून घेतला जातो. जर पुरेसं पाणी पिऊन शरीरात पाण्याचं प्रमाण योग्य राखलं गेलं तर त्वचेतला ओलावा टिकून राहातो. त्वचा मऊ राहाते, त्वचेवर चमक दिसते. पण पाणीच कमी पिलं तर त्वचा कोरडी पडते.

3.  वैद्य रेखा सांगतात, की थंड आणि गरम  पदार्थ एकत्र खाल्ल्यास त्याचा दुष्परिणाम त्वचेला भोगावा लागतो. गरमागरम सॅण्डविच,  वडापाव, समोसा यासोबत थंडं पेयं पिल्यानं त्वचेतला कोरडेपणा वाढतो आणि वयाचा प्रभाव चटकन त्वचेवर दिसतो. 

4.  प्रत्येकाला आपली पचन प्रकृती माहिती असते. जड पदार्थ पचत नाही हे माहिती असूनही मध, मुळे, मांसाहारी पदार्थ जास्त खाण्याच्या सवयीमुळे पचन व्यवस्थेवर अतिरिक्त ताण पडतो त्याचा परिणाम त्वचेवर होऊन त्वचा कोरडी पडते. 

5. दूध आणि सोबत पराठे खाणं, दुधासोबत चिवडा, भेळ, मीठ असलेली बिस्किटं खाणं, दुधासोबत वेफर्स खाणं या सवयींमुळे त्वचा कोरडी पडते. 

Image: Google

6. आपण कुठे काम करतो, कोणत्या वातावरणात जास्त राहातो याचाही परिणाम त्वचेवर होतो. जर आपण कोणतीही काळजी न घेता उन्हात जास्त वेळ फिरत अस्, काम करत असू किंवा जिथे तापमान जास्त आहे अशा गरम ठिकाणी दीर्घकाळ काम करत असल्यास त्वचेतील पाणी  बाहेर पडतं. अशा परिस्थितीत त्वचा मऊ, ओलसर राहाण्यासाठी आपण  माॅश्चरायझर लावणं, सनस्क्रीन लावणं, पुरेसं  पाणी पिणं, सनकोट आणि स्कार्फ न घालणं या सवयींमुळे त्वचेतला कोरडेपणा आणखीनच वाढतो. 

7. प्रमाणापेक्षा अति व्यायाम केल्याने शरीरातील पाणी कमी होतं आणि त्वचेचा कोरडेपणा वाढतो. 

Image: Google

8. खूप अंगमेहनतीचं काम केल्यानंतर शरीराला आलेला थकवा घालवण्यासाठी अनेकजणांना गरम पाण्यानं आंघोळ करण्याची सवय असते. ही सवय त्वचेसाठी घातक असते. कारण शारीरिक श्रमानं आधीच खूप घाम येऊन शरीरातील पाणी बाहेर पडलेलं असतं. त्यातच जर गर्म पाण्यानं आंघोळ केली तर त्वचा आणखी कोरडी होते. ही सवय जर सोडायची नसेल तर किमान आंघोळ झाल्यावर पाच मिनिटाच्या आत शरीराला माॅश्चरायझर लावायला हवं.  किंवा आंघोळीच्या आधी तिळाच्या तेलानं अंगाचा मसाज करुन मग गरम पाण्यानं आंघोळ करावी. 

टॅग्स : ब्यूटी टिप्सलाइफस्टाइलत्वचेची काळजीअन्न