Join us   

पाणी पिताना अजिबात करू नका 4 चुका, घटाघटा पाणी प्यायला तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2022 4:22 PM

उत्तम आरोग्यासाठी नुसते पाणी पिणे पुरेसे नसते, तर ते पाणी पिण्याची पद्धत योग्य असायला हवी. पाणी पिताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याविषयी...

ठळक मुद्दे शरीराचे चांगले पोषण व्हायचे असेल तर जेवणाच्या आधी पाणी पिणे टाळलेले बरे. शांतपणे बसून दोन दोन घोट पाणी प्यावे. 

पाणी ही आपल्याला जगण्यासाठी अत्यावश्यक गोष्ट आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. म्हणूनच पाण्याला जीवन म्हटले जाते. पाण्याविना आपण जास्त काळ जगू शकत नाही. उन्हाळ्याच्या दिवसांत तर पाणी आपल्यासाठी अमृतासारखेच असते. बाहेर कडाक्याचे ऊन असताना शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवायचे असेल तर पाण्याला पर्याय नाही. उन्हाळ्याच्या दिवसांत अंगाची लाहीलाही होत असताना जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक असते. भर उन्हात थंडगार पाणी प्यायल्यावर मन आणि शरीर शांत आणि तृप्त होते. पण हेच जर उन्हाळ्यात आपल्याला कित्येक तास पाणी मिळाले नाही तर आरोग्याच्या विविध तक्रारी निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी नुसते पाणी पिणे पुरेसे नसते, तर ते पाणी पिण्याची पद्धत योग्य असायला हवी. पाणी पिताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याविषयी....

(Image : Google)

१. उभं राहून पाणी पिणे 

अनेकदा बाहेरुन आल्यावर किंवा घाईगडबडीत आपण उभे राहून पाणी पितो. पण अशाप्रकारे उभे राहून पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले नसते. उभं राहून पाणी प्यायल्याने शरीराच्या नसांवर ताण येतो. यामुळे अपचन तर होतेच पण शरीरातील पाण्याची पातळी योग्य प्रमाणात राहण्यास यामुळे अडचणी येतात. 

२. गटागटा पाणी पिणे 

उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्याला खूप जास्त तहान लागलेली असते. त्यातच आपल्याला कुठे जायची किंवा कामांची घाई असेल तर आपण खूप गटागटा पाणी पितो. पण असे करणे योग्य नाही कारण त्यामुळे पोटातील स्नायूंना ताण येतो आणि अपचनाच्या तक्रारी उद्भवतात. त्यापेक्षा शांतपणे बसून दोन दोन घोट पाणी प्यावे. 

३.  जेवणाच्या आधी पाणी पिणे 

तुम्हाला तहान लागली आणि तुमची जेवायची वेळ झाली तर अगदी एखादा घोटच पाणी प्या. कारण जेवणाच्या आधी पाणी प्यायल्याने तुमचे पोट भरल्यासारखे होते आणि तुम्हाला जेवण जात नाही. जेवण न गेल्याने तुमच्या शरीराचे योग्य तसे पोषण होत नाही. त्यामुळे शरीराचे चांगले पोषण व्हायचे असेल तर जेवणाच्या आधी पाणी पिणे टाळलेले बरे. 

(Image : Google)

४. पाण्यात आर्टीफिशियल स्वीटनर्स घालू नका

अनेकदा आपण नुसते पाणी पिण्याऐवजी त्यामध्ये काहीतरी घालून पितो. परंतु हे घटक आपल्या आरोग्यासाठी चांगले नसतात. या स्वीटनर्समध्ये कॅलरीजचे प्रमाण अतिशय कमी असते असे म्हणतात. पण तरीही त्यामुळे आरोग्याच्या तक्रारी उद्भवण्याची शक्यता असल्याने पाण्यात अशाप्रकारचे स्वीटनर्स घालू नयेत.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सपाणीलाइफस्टाइल