उत्तम आरोग्यासाठी रोज किमान ७ ते ८ तास झोप मिळणं आवश्यक असतं हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. लहान बाळ जितका जास्त वेळ झोपेल तितकं ते उठल्यावर फ्रेश असतं आणि त्याच्या शरीराची आणि मेंदूची वाढ चांगली होते म्हणतात. आपण जसे मोठे होत जातो तशी आपली झोप काही प्रमाणात कमी होत जाते. मात्र तरीही रात्रीची किमान ७ ते ८ तासांची झोप प्रत्येकाला आवश्यक असते. याचे प्रमाण व्यक्तीपरत्वे कमी अधिक होऊ शकते. तसेच रात्री लवकर झोपल्यावर सकाळी लवकर जाग येते आणि उत्तम आरोग्याच्यादृष्टीने ते अतिशय चांगले असते. लवकर निजे, लवकर उठे तया आरोग्य संपत्ती लाभे असे म्हणतात ते चुकीचे नाही. पुरेशी झोप झाली नाही तर लठ्ठपणा, अॅसिडीटी, मूळव्याध, डोकेदुखी आणि भविष्यात इतर मोठ्या तक्रारी भेडसावतात. मात्र आपल्यातील अनेकांना रात्री अंथरुणात गेल्यावर बराच वेळ झोप येत नाही. याची वेगवेगळी कारणे असली तरी त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. पाहूयात रात्री पडल्या पडल्या झोप येण्यासाठी काय करावे.
१. जेवल्यावर लगेच झोपू नका
रात्रीचे जेवण झाल्यावर लगेच आडवे पडलो तर आपल्याला झोप येत नाही. त्यामुळे जेवण झाल्यावर मध्ये किमान १ ते दिड तास जायला हवा. जेवल्यानंतर इतर कामे करा म्हणजे खाल्लेले अन्न पचेल. इतकेच नाही तर जेवल्यावर शतपावली केल्यामुळे अन्न पचण्यास मदत होईल आणि वेळेत झोप येईल. रात्रीचे जेवण हलके असू द्या म्हणजे खाल्लेले खूप वर आल्यासारखे होणार नाही. झोप न येण्याचे तेही एक महत्त्वाचे कारण असू शकते.
२. मोबाइलचा वापर
सध्या मोबाइल हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाला आहे. सोशल मीडिया आणि विविध ओटीटी प्लॅटफॉर्म यांचे सर्वच वयोगटात व्यसन लागल्याचे चित्र पाहायला मिळते. एकदा मोबाइल हातात घेतला की आपला किती वेळ त्यावर जातो हे आपल्याच लक्षात येत नाही. एकानंतर एक असे आपण सर्फिंग करतच राहतो. त्यामुळे आपल्या डोळ्यावर झोप आली असेल तरी ती मोबाइलमुळे जाते, मग बराच वेळ झोप लागत नाही. त्यामुळे रात्री झोपताना ठरवून मोबाइल न वापरायचे ठरवायला हवे.
३. उशीरापर्यंत काम
आपल्या सगळ्यांनाच कामाचा बराच ताण असतो. पण आपण ऑफीसचे काम सकाळी लवकर सुरू केले तर रात्री लवकर संपवू शकतो. त्यामुळे आपल्याला रात्री झोपायला फारसा उशीर होणार नाही. म्हणूनच आपल्या कामाचे योग्य ते नियोजन करा. म्हणजे जेवण, झोप याला उशीर होणार नाही.
४. ताणतणाव
अनेकदा आपल्या डोक्यात सतत वेगवेगळ्या गोष्टींचे विचार सुरू असतात. कधी आरोग्याशी निगडीत तक्रारी तर कधी अर्थिक बाबतीत, कधी करीयरचा ताण तर कधी कौटुंबिक तक्रारी. या गोष्टींचे सतत विचार करत राहील्यास आपल्याला रात्री लवकर झोप येत नाही. पण त्याचा आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होताना दिसतो. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार न करता त्यावर मार्ग काढणे हा सर्वोत्तम उपाय ठरु शकतो.