Join us   

फटाके उडवताना सॅनिटायझर वापरू नका, लांब ठेवा! फटाके आणि सॅनिटायझर एकत्र आले तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2021 4:19 PM

फटाक्यातील दारु आणि सॅनिटायझरमधील अल्कोहोल यांचा एकमेकांशी संबंध आलेला अजिबात चांगले नाही. त्यामुळे उद्भवणाऱ्या धोक्यांची माहिती मुलांना वेळीच करुन द्यायला हवी.

ठळक मुद्दे सॅनिटायझरऐवजी दिवाळीत साबणाने हात धुवा सॅनिटायझर ज्वलनशील असल्याने फटाक्यांशी संबंध आल्यास घडू शकते दुर्घटना

फटाक्यांच्या आतषबाजीशिवाय दिवाळी पार पडत नाही. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनाच फटाके उडवायला आवडते. त्यामुळे पहाटे अभ्यंगस्नान झाल्यावर किंवा सायंकाळची दिवेलागण झाल्यावर मित्रमंडळींसोबत फटाके उडवायला जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. मागील दोन वर्षांपासून आपण सगळेच कोरोनानामक विषाणूशी सामना करत आहोत. अजूनही कोरोनाचे संकट पूर्णपणे गेलेले नाही. मात्र लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्याने आपण भारतात आणि विशेषत: महाराष्ट्रात सध्या तरी सगळे पूर्ववत सुरू झाले आहे. मात्र अजूनही मास्क वापरणे, सॅनिटायझर वापरणे या गोष्टी आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे. लहान मुलांना याबाबत विशेष माहिती नसते. मात्र त्यांना फटाके उडवण्याची भारी घाई असते. अशावेळी लहान मुलांना या धोक्याची माहिती देऊन ठेवणे आवश्यक आहे. नाहीतर अपघात घडू शकतो आणि सण आनंदाचा न राहता त्यावर ठिणगी पडू शकते. त्यामुळे तुम्ही नियमित सॅनिटायझर वापरत असाल आणि तुम्हाला फटाके उडवायचे  असतील तर सावधान! 

१. दिवाळीत पणत्या किंवा इतर दिवे लावत असताना हाताला सॅनिटायझर नाही ना याची खात्री करा अन्यथा अपघात घडण्याची शक्यता असू शकते. सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल असल्याने तो ज्वलनशील पदार्थ आहे. त्यामुळे सॅनिटायझर लावले असेल तर हात धुवा आणि मगच दिवे लावा.

२. फटाके उडवताना हाताला सॅनिटायझर नाही ना याची काळजी घ्या. फटाक्यातील दारु आणि सॅनिटायझर अल्कोहोल यांचा एकमेकांशी संपर्क आल्यास आग लागण्याची शक्यता असते. 

३. सध्या अनेकांच्या खिशात किंवा पर्समध्ये सॅनिटायझरच्या लहान बाटल्या असतात. फटाक्याची एखादी ठिणगी आपल्या कपड्यावर किंवा रस्त्याने जात असताना बॅगवर उडाली तर मोठा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे शक्यतो दिवाळीच्या दिवसांत सॅनिटायझर सोबत बाळगू नका.

( Image : Google)

४. अनेकदा हाताला सॅनिटायझर लावताना ते आपल्या कपड्यांना लागण्याची शक्यता असते. फटाके उडवताना अनेकदा कपडे फटाक्याच्या संपर्कात येतात आणि एखादी ठिणगी पडली तरी सगळे पेट घेऊ शकते. 

५. अनेक सोसायटीच्या बाहेर, हॉटेल, दुकानांच्या बाहेर सॅनिटायझरच्या बाटल्या ठेवलेल्या असतात. लहान मुले त्याचठिकाणी फटाके उडवत असतात. जास्त वेळ उडणारे आणि मोठ्या आकाराचे फटाके असतील तर त्यातील एखादी ठिणगी या सॅनिटायझरच्या बाटल्यांपर्यंत जाऊ शकते. यामुळे आग लागण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलांना याबाबत योग्य ती माहिती द्यावी

६. अनेकदा अभ्यंगस्नानाच्या वेळी घरात फुलबाजी किंवा इतर फटाके उडवले जातात. घरात सॅनिटायझरच्या बाटल्या असण्याची शक्यता असते. अशावेळी घरात अपघात घडू शकतो. त्यामुळे घरात अजिबात फटाके उडवू नयेत.

अनेक राज्यांमध्ये दिवाळीत फटाकेबंदीची घोषणा झाली आहे. महाराष्ट्रात ठाकरे सरकारनं फटाकेबंदी केली नसली तरी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा असं आवाहन केलंय. पण लोकांचा उत्साह पाहता असे होईल असे अजिबातच वाटत नाही. फटाक्यांच्या दुकानाबाहेर यंदा नेहमीप्रमाणे रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. फटाके फोडताना आकाशात उंच जाऊन फुटणारे फटाके टाळावेत आणि सॅनिटायझर ऐवजी साबणानं हात धुवावे असं आवाहन अग्निशामक दलाकडून करण्यात आले आहे. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सदिवाळी 2021फटाके